आपल्या आकाशगंगेत सुमारे अडीचशे अब्ज तारे आहेत. त्यापैकी कित्येक ताऱ्यांभोवती त्यांचे स्वतचे ग्रह फिरताहेत. या ग्रहांना ‘बाह्यग्रह’ म्हणतात. बाह्यग्रहांच्या अस्तित्वाबद्दल पहिल्यांदा अंदाज बांधला तो सोळाव्या शतकातील इटलीचा तत्त्वज्ञ जिओर्दानो ब्रूनो याने. त्याच्या मते, दूरचे तारे म्हणजे प्रत्यक्षात आपल्या सूर्यासारखे सूर्यच आहेत. या ताऱ्यांनाही सूर्याप्रमाणेच स्वतच्या ग्रहमाला असू शकतात.आयझॅक न्यूटननेही अठराव्या शतकात याच म्हणण्याला दुजोरा दिला. बाह्यग्रहांच्या अस्तित्वाची शक्यता जरी अशी पूर्वीच मांडली गेली असली, तरी त्यांचा प्रत्यक्ष शोध लागेपर्यंत १९९२ साल उजाडले. या संशोधनाला अंतराळ दुर्बणिींची जोड लाभल्याने, त्यानंतरच्या सुमारे तीन दशकांच्या काळात मात्र शोध लागलेल्या बाह्यग्रहांची संख्या चार हजारांच्या वर गेली.

सन १९९२मध्ये प्युर्तो रिको येथील अरसिबो या रेडिओ दुर्बिणिद्वारे आकाशातील रेडिओस्रोतांचे सर्वेक्षण चालू होते. या सर्वेक्षणात कन्या तारकासमूहातील, स्पंदांच्या स्वरूपात रेडिओलहरी उत्सर्जति करणारा एक तारा (पल्सार) वैशिष्टय़पूर्ण ठरला. या ताऱ्याकडून येणाऱ्या रेडिओलहरींतील स्पंदांच्या वारंवारतेत विशिष्ट प्रकारचा फरक पडत होता.  रेडिओलहरींच्या उत्सर्जनाची दिशा सतत किंचितशी बदलत असल्याने हा फरक पडत होता. रेडिओलहरींच्या उत्सर्जनाची दिशा ही या ताऱ्याच्या हिंदकळण्यामुळे बदलत होती. अधिक अभ्यासानंतर, या हिदंकळण्याला ताऱ्याभोवती फिरणाऱ्या तीन बाह्यग्रहांचे गुरुत्वाकर्षण कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. बाह्यग्रहांचा हा पहिलावहिला शोध ठरला.

युक्रेनियन-अमेरिकन खगोल संशोधक ऑट्टो स्ट्रव्ह याने १९५२ साली ‘दि ऑब्झव्‍‌र्हेटरी’ या नियतकालिकात छोटासा लेख लिहून, या बाह्यग्रहांच्या शोधासाठी दोन पद्धती सुचवल्या होत्या. बाह्यग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे मातृग्रह जो हिंदकळत असतो, त्यामुळे मातृग्रहाच्या आपल्यापासूनच्या अंतरात किंचितसा बदल होत असतो. अंतरातील या बदलाचे वर्णपटशास्त्राद्वारे मापन करणे शक्य आहे व त्याद्वारे बाह्यग्रहांचा शोध लागणेही शक्य आहे. १९९५ साली फ्रान्समधील ‘एलोडी’ या दुर्बणिीद्वारे, महाश्व तारकासमूहातील सूर्यासारख्या एका ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह याच पद्धतीने शोधला गेला. पृथ्वी व मातृतारा या दरम्यान त्या ताऱ्याचा बाह्यग्रह आल्यास, मातृताऱ्याचे तेज किंचितसे कमी होते. स्ट्रव्हच्या मते, मातृताऱ्याच्या तेजातील या किचिंतशा फरकावरूनही बाह्यग्रह सापडणे शक्य होणार होते. २००२ साली वॉर्सा विद्यापीठाच्या दुर्बणिीद्वारे, धनू तारकासमूहातील एका ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह याच पद्धतीने प्रथमच शोधला गेला.

– मृणालिनी नायक ,  मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org