१७७७ साली न्यूयॉर्क शहराची घटना तयार होऊन न्यूयॉर्कचे गव्हर्नर म्हणून जॉर्ज क्लिंटनची नियुक्ती झाली. यापूर्वीच १७५४ साली न्यूयॉर्कमध्ये किंग्ज कॉलेज स्थापन होऊन पुढे त्याचे रूपांतर कोलंबिया विद्यापीठात झाले. न्यूयॉर्क शहराच्या भौगोलिक स्थानामुळे, नद्या आणि कालव्यांमधून सागरी बंदरापर्यंत जलवाहतूक करणे सोयीचे झाले आणि न्यूयॉर्कचा एक व्यापारी केंग्र आणि बाजारपेठ म्हणून उदय झाला. १८६१ ते १८६५ या काळात झालेल्या अमेरिकन यादवी युद्धानंतर युरोपातून अमेरिकेत फार मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले. हे सर्व स्थलांतरित प्रथम न्यूयॉर्कलाच येत. त्यातील निम्मेअधिक युरोपियन न्यूयॉर्क आणि आसपासच्या शहरांमध्येच स्थायिक होत. न्यूयॉर्क शहर, स्थलांतरितांसाठी अमेरिकेचे प्रवेशद्वारच बनले होते. १८४० ते १८५०च्या दशकात न्यूयॉर्कमध्ये रेल्वे सेवा सुरू होऊन प्रवासी वाहतूक सोयीची झाली. याच काळात अनेक नवीन उद्योग सुरू होऊन त्यापाठोपाठ न्यूयॉर्कमधील कारखानदारी वाढली आणि कारखान्यांमधून काम करणारा कामगारवर्ग तयार झाला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत न्यूयॉर्क शहराचे स्वरूप पूर्णपणे बदलले. १८९० ते १९३० या काळात न्यूयॉर्क हे एक महत्त्वाचे जागतिक व्यापारी, औद्योगिक आणि दळणवळण केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. १९२० साली तत्कालीन जागतिक बडय़ा ३०० औद्योगिक कंपन्यांपकी ७५ कंपन्यांची मुख्यालये न्यूयॉर्क शहरात होती. न्यूयॉर्क शहराची औद्योगिक वाटचाल सुरू होण्यापूर्वी, बरेच आधी १७९२ मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज सुरू झाले. १८८६ साली न्यूयॉर्कच्या एका बेटावर, फ्रान्सने भेट केलेल्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याचे अनावरण झाले. १९५२ साली युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या मुख्यालयाचे न्यूयॉर्क शहरात उद्घाटन झाले. १९७३ साली वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर या इमारतीचे उद्घाटन झाले. १९९३ साली या ट्विन टॉवरवर पहिल्या दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला. ११ सप्टेंबर २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांच्या झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात ३००० जणांच्या मृत्यूने सर्व जगाला हादरवून टाकले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

अशोक नव्हे आशुपल्लव
भारत, श्रीलंकेत मूळ असलेल्या या सदाहरित वृक्षाला बरेच जण ‘अशोक’ म्हणतात. वारा, ऊन, धूळ यांपासून रक्षण करण्यासाठी सोसायटय़ांमध्ये हे वृक्ष लावलेले आढळतात. याच्या पानांचे अशोकाच्या पानांशी साम्य आहे म्हणून ही गफलत होत असावी. या झाडाला ‘खोटा अशोक’ असंही म्हटलं जातं. अशा ‘साध्या सरळ’, सुंदर झाडाला ‘खोटा’ म्हणायला जीभ रेटत नाही, तेही त्याला आशुपल्लव, आसुपालव, आसुपाला, आसुफल अशी किती तरी चांगली नावं असताना? इंग्रजीत या झाडाला ‘मास्ट ट्री’ म्हणतात. मास्ट म्हणजे बोटीवरची उंच डोलकाठी. ती याच झाडापासून तयार करतात. अ‍ॅ नोनेसी (सीताफलादी) कुळातल्या या वृक्षाचं शास्त्रीय नाव आहे, ‘पॉलिअल्थिया लाँगिफोलिया’. यात अनेक औषधी गुणधर्म असावेत, या समजुतीने, पॉलिअल्थिया हे नाव दिलंय. लाँगिफोलिया म्हणजे लांबट पानं. त्याची पानं भाल्याच्या पात्यासारखी लांब, टोकदार आणि नागमोडी कडांची असतात. कोवळी असताना पानं पोपटी असतात आणि मग गडद हिरव्या रंगाची होतात.
१२-१५ मीटर उंचीच्या सरळसोट खोडाला लोंबत्या फांद्या असल्याने वर निमुळता, खाली घेर असा पिरॅमिडसारखा आकार येतो. आपल्याला नेहमी दिसणारी आशुपल्लवची ही एक प्रकारची जात; पण आशुपल्लवच्या काही जातींत फांद्या लोंबत्या नसल्यामुळे ती सर्वसाधारण झाडाप्रमाणे घुमटाकार दिसतात.
मार्च-एप्रिलमध्ये आशुपल्लवला बहर येतो. फुलांचा दिखाऊपणा नसतो. पानं सारून पाहिलं की पानांखाली फांद्यांना लगडलेल्या हिरवट-पांढऱ्या, चिमुकल्या फुलांचं वैभव नजरेस पडतं. फुलामध्ये अनेक पुंकेसर, स्त्रीकेसर आणि बिजांडकोष असतात ते एकत्र असल्याने बटणासारखे वाटतात. टोकाला निमुळत्या होत जाणाऱ्यास सहा पाकळ्यांमुळे फुले चांदणीसारखी भासतात. फळेही पानांखाली असल्याने दिसत नाहीत. झाडाखाली पांढरट बियांचा सडा पडल्यानंतर कळते की, झाडाला फळे आली आहेत. साधारण जांभळाइतक्या आकाराची फळे कच्ची असताना हिरवी आणि पिकल्यावर जांभळट काळी होतात. फळे मांसल नसली तरी कोकीळसारखे पक्षी, वटवाघळे आवडीने खातात.
आशुपल्लवचे लाकूड हलके, लवचीक असते. त्याचा उपयोग, काडेपेटय़ा, पेन्सिली, फíनचर बनवण्यासाठी केला जातो. सालीपासून चांगला धागाही मिळतो. पानं सजावटीसाठी, तोरणांमध्ये वापरतात; परंतु सदाहरित शोभिवंत असल्याने हे वृक्ष उद्यानात प्रामुख्याने लावले जातात.
चारुशीला जुईकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org