न्यूयॉर्क शहराविषयी पहिला लिखित संदर्भ मिळतो तो युरोपीय प्रवासी ग्योवनी डा वेरॅझनो याच्याकडून. कोलंबसाप्रमाणेच वेरॅझनोसुद्धा भारतीय प्रदेशाचा शोध घेण्यासाठी १५२४ साली जलमार्गाने निघाला आणि चुकून पोहोचला तो सध्याच्या न्यूयॉर्कमध्ये. त्या काळात तिथे राहात असलेले लेनॉप या जमातीचे आदिवासी हेच न्यूयॉर्कचे मूळ रहिवासी. डेलावेर आणि हडसन नद्यांच्या खोऱ्यात राहून ते मच्छीमारी, व्यापार, शेती करीत. डच वेस्ट इंडिया कंपनी या व्यापारी कंपनीने प्रथम १६०९ साली हॉलंडमधील ३० कुटुंबांना न्यूटेन या ठिकाणी पाठवून पहिली डच वसाहत स्थापन केली. या प्रदेशात त्यांना बीव्हर हा छोटासा पण अत्यंत केसाळ प्राणी मोठय़ा प्रमाणात आढळला. त्यापासून निघणाऱ्या फरचा व्यवसाय त्या काळात तेजीत चालत असे. डच वेस्ट इंडिया कंपनीचा कर्मचारी हेन्री हडसन याला प्रथम या बीव्हरपासून फरच्या व्यवसायाची कल्पना सुचून त्याने कंपनीला इथे वसाहत स्थापन करण्याबद्दल सुचविले. कंपनीने त्याच्या नावावरून नदीचे नाव ‘हडसन रिव्हर’ केले. इथे तयार झालेल्या वस्तीला कंपनीने १६२४ साली नाव दिले ‘न्यू अ‍ॅमस्टरडॅम’. पुढे १६२६ साली डच वेस्ट कंपनीने इथे फोर्ट अ‍ॅमस्टरडॅम हा किल्ला बांधला. डच लोकवस्तीवर ब्रिटिश वसाहतवाले आणि या प्रदेशातले मूळ रहिवासी हल्ले करीत, म्हणून न्यू अ‍ॅमस्टरडॅमभोवती तटबंदी बांधली गेली. डच कंपनीचा त्या काळात फर आणि आफ्रिकन गुलामांचा व्यवसाय तेजीत होता. १६५३च्या सुमारास न्यू अ‍ॅमस्टरडॅमला शहराचे स्वरूप येऊन लोकांनी त्यांचे प्रशासकीय मंडळ स्थापन करून शहरासाठी मेयरचीही नियुक्ती केली. या काळापर्यंत आफ्रिका आणि कॅरेबियन बेटांवरून येऊन इथे स्थायिक झालेल्या लोकांची संख्या ४० टक्के झाली. १६६४ साली ब्रिटिश वसाहतवाल्यांनी डच लोकांवर आक्रमण करून त्यांची न्यू अ‍ॅमस्टरडॅम ही वसाहत आणि शहरावर कब्जा केला आणि इंग्लंडमधील यॉर्कच्या डय़ूकच्या गौरवार्थ वसाहतीचे नाव केले न्यूयॉर्क!
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com 

 

शुष्क प्रदेशातील वनस्पती
ऑस्ट्रेलियन अकॅशिया या शुष्कपेशीय वृक्षाचे बी रुजून जेव्हा नवीन झाड उगवते तेव्हा त्याची संयुक्त पाने बाभळीप्रमाणे बारीक पर्णिकांची असतात. झाडाची वाढ होऊ लागताच पानांचे देठ चपटे व तलवारीसारख़े वक्राकार होतात व पानांप्रमाणे भासतात, पर्णिका मात्र नाहीशा होतात व त्याचे प्रकाशसंश्लेषणाचे कार्य चपटे देठ करतात. या रूपांतरित देठांना इंग्रजीत ‘फायलोड’ म्हणतात. श्वसनरंध्रे खोलवर वसलेली असल्यामुळे बाष्पोच्छ्वसन कमी होते.
सुरू व शतावरी वनस्पतींमध्ये पाने खवल्यासारखी सूक्ष्म असून प्रकाशसंश्लेषणाचे कार्य त्यांच्या हिरव्या कांडाद्वारे होते. शतावरीच्या हिरव्या कांडांना ‘क्लेडोड’ ही संज्ञा आहे. पाने सूक्ष्म असल्याने कार्य बाष्पोच्छ्वसन अत्यल्प होते व त्याच वेळी पानाचे कार्य स्थंभ / खोड करते.
शुष्क प्रदेशातील कोरफडीची खोडे तोकडी असून पाने मांसल असतात, त्यांच्यात असलेल्या पाणी साठवणाऱ्या पेशीजालामुळे पाण्याच्या अभावामध्ये ही वनस्पती तग धरून राहते.
शुष्क प्रदेशातील अ‍ॅम्मोफिला या गवताच्या पानांत श्वसनरंध्रे वरच्या पृष्ठभागाच्या त्वचेत असतात. त्वचेमध्ये एक खास पेशी मोटर सेल्स असते. पाणी कमी झाल्याबरोबर ती आक्रसते. त्यामुळे पानांची गुंडाळी होते व साहजिकच श्वसनरंध्रे पानाच्या गुंडाळीच्या आत बंदिस्त होऊन बाष्पोच्छ्वसन एकदम थांबते व गवत वाळण्यापासून वाचते.
वरील वर्णनावरून लक्षात आले असेल की, वनस्पती या ‘जड’ अर्थात स्थलांतर करू न शकणाऱ्या असतात. सभोवतालच्या परिस्थितीशी मिळते घेऊन अनुकूलनाद्वारे वनस्पती त्या त्या वातावरणात केवळ जगतच नाहीत तर उत्तम प्रजा वाढवण्याचे कार्य पण करतात.
वनस्पतींवरील अभ्यासासाठी सतत भ्रमण करणाऱ्या व्यक्तींना या बदलासंबंधी माहिती मिळत असते. उदा. बागेत वाढणाऱ्या कुंपणावरील मेंदीची पाने लांब व पातळ असतात तर समुद्रकिनाऱ्यावर मेंदीची पाने जाड आणि आखूड असतात. आजूबाजूला भरपूर पाणी दिसत असले तरी त्यातील क्षाराच्या जास्त प्रमाणामुळे वनस्पती ते पाणी घेऊ शकत नाहीत. एक प्रकारे वाळवंटासारखीच परिस्थिती निर्माण झालेली असते.

– डॉ. रंजन देसाई
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org