ग्रहांची स्थाने काढण्यासाठी उपयुक्त ठरलेले पहिले प्रारूप म्हणजे क्लॉडियस टॉलेमी या ग्रीक-इजिप्शियन विद्वानाने सुचवलेले ग्रहमालेचे पृथ्वीकेंद्रित प्रारूप. मात्र हे प्रारूप अतिशय गुंतागुंतीचे होते. या प्रारूपानुसार ग्रहमाला पृथ्वीकेंद्रित असली तरी, प्रत्यक्षात ग्रह हे पृथ्वीच्या केंद्रापासून दूर असणाऱ्या एका काल्पनिक बिंदूभोवती फिरत होते. ग्रहांच्या या काल्पनिक बिंदूभोवती फिरण्याला काही खगोलतज्ज्ञांचा आक्षेप होता. असा आक्षेप घेणाऱ्यांत एक नाव होते ते पोलंडच्या निकोलाऊस कोपर्निकस याचे. टॉलेमीच्या प्रारूपातील काल्पनिक बिंदूची गरज संपवण्यासाठी कोपर्निकसने ग्रहमालेच्या केंद्रावरून पृथ्वीला बाजूला सारले आणि तिथे सूर्याची स्थापना केली. पृथ्वीसह सर्व अवकाशस्थ वस्तू आता सूर्याभोवती फिरू लागल्या!

सर्व ग्रह हे अल्प काळासाठी नेहमीची दिशा सोडून उलटय़ा दिशेने मार्गक्रमण करत असतात. यात बुध आणि शुक्र यांचे उलटे मार्गक्रमण लक्षवेधी असते. कोपर्निकसने आपला सिद्धांत साकारण्यासाठी, जर्मन खगोलतज्ज्ञ बर्नहार्ड वाल्थेर याने केलेल्या बुधाच्याच निरीक्षणांचा वापर केला. या निरीक्षणांचे विश्लेषण करून कोपर्निकसने ग्रहमाला ही पृथ्वीकेंद्रित नसून सूर्यकेंद्रित असल्याचा निष्कर्ष काढला. सूर्याला ग्रहांच्या कक्षेच्या बरोब्बर केंद्रस्थानी ठेवून त्याने यशस्वीरीत्या आपले ग्रहगणित मांडले. परंतु आपल्या प्रारूपात त्यानेही टॉलेमीप्रमाणेच ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार असल्याचे मानले होते. परिणामी, त्यालाही टॉलेमीप्रमाणेच ‘वर्तुळावरच्या वर्तुळांची’ संकल्पना वापरावी लागली.

कोपर्निकसने आपल्या सूर्यकेंद्रित सिद्धांताद्वारे विश्वरचनाच बदलून टाकली आणि विज्ञानाच्या वाटचालीला वेगळे वळण दिले. एका वैज्ञानिक क्रांतीचीच ही सुरुवात होती. ग्रीक तत्त्वज्ञ आरिस्टार्कसनेही इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात सूर्यकेंद्रित ग्रहमालेची संकल्पना सुचवली होती. परंतु कोपर्निकसने या संकल्पनेला गणिती स्वरूप दिले आणि पुढची पायरी गाठली. कोपर्निकसने आपला हा सिद्धांत इ.स. १५०८ ते १५१४ या काळात विकसित केला असावा. परंतु यावरील सहा भागांचे सविस्तर ग्रंथलेखन त्याने १५३० सालच्या सुमारास पूर्ण केले. हा ग्रंथ अखेर प्रसिद्ध झाला तो १५४३ साली – कोपर्निकस मृत्युशय्येवर असताना! या ग्रंथाचे नाव होते ‘डीरिव्होल्यूशनरीबस ऑर्बियम सिलिशियम’ – म्हणजे ‘अवकाशस्थ वस्तूंच्या प्रदक्षिणांबद्दल’. कोपर्निकसने आपल्या सिद्धांताद्वारे सूर्याला दिलेले ग्रहमालेचे केंद्रस्थान धर्मसत्तेच्या विरोधामुळे लगेच स्वीकारले मात्र गेले नाही. ते स्वीकारले जाण्यास त्यानंतरचा सुमारे दीड शतकाचा काळ जावा लागला.

डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org