ब्रिटिशांनी १९१४ साली उत्तर आणि दक्षिण नायजेरियाचे संरक्षित प्रदेश एकत्र करून एकसंध नायजेरिया हा ब्रिटिश अंकीत देश स्वत:ची वसाहत म्हणून स्थापला. ब्रिटिशांनी जरी नायजेरीचे उत्तर, दक्षिण विभाग प्रशासकीय सोयीसाठी संयुक्त केले, तरीही उत्तर नायजेरिया, दक्षिण नायजेरिया आणि लागोस वसाहत या तीन प्रदेशांतील लोकांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या धार्मिक आणि जीवनशैलीत मोठी भिन्नता होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आफ्रिकेतील अनेक वसाहतींमध्ये राष्ट्रीयत्वाचा नवा विचार रुजला होता. स्वातंत्र्य आणि स्वयंशासन या संकल्पना बाळसे धरू लागल्या होत्या. नायजेरियातही ब्रिटिशविरोधी मतप्रवाह तयार होऊन लोक ब्रिटिश वसाहतीपासून मुक्त होण्यासाठी सरकारवर दबाव टाकू लागले. जनतेत अधिक उद्रेक होण्यापूर्वी, १ ऑक्टोबर १९६० रोजी ब्रिटिश सरकारने नायजेरियन प्रदेश ब्रिटिश वसाहतीतून मुक्त केल्याची घोषणा केली. नायजेरियात ब्रिटिशांनी स्वातंत्र्याची घोषणा केल्यावर नवी राजकीय व्यवस्था रुळेपर्यंत ब्रिटिश साम्राज्याची महाराणी एलिझाबेथ द्वितीय हिच्याकडे नायजेरियन प्रजासत्ताकाचे नामधारी प्रमुखपद देण्यात आले. १ ऑक्टोबर १९६३ रोजी अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धतीची राजकीय व्यवस्था नायजेरियात स्थापन होऊन एन्नाम्दी एझिकिवे हे पहिले नियुक्त राष्ट्राध्यक्ष बनले.

स्वातंत्र्य मिळाल्यावर इतर आफ्रिकी देशांमध्ये जे घडत आले तेच पुढे नायजेरियातही घडले. काही काळ शांततेत गेल्यावर नायजेरियातला वंशवाद, प्रादेशिक वाद उफाळून आला. पूर्वीपासूनच तीन वांशिक गटांकडे तीन मोठ्या प्रदेशांचे नियंत्रण असल्यामुळे नायजेरिया तीन प्रदेशांमध्ये विभागला गेला होता. १९६४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची सरकारची योजना होती; परंतु आपसातल्या दुफळीमुळे दोन वांशिक गटांनी निवडणुकीवर बळाचा वापर करून बंदी घातली. त्यातच लष्करी अधिकाऱ्यांच्या एका गटाने तत्कालीन सरकार उलथविण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान व दोन मंत्र्यांची हत्या करून उठाव केला. त्यातून सुरू झालेले गृहयुद्ध तीन वर्षे चालले. १९६६ ते १९९९ या काळात नायजेरियात लष्करी राजवट सत्तेवर होती.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com