X
X

कुतूहल : निओबिअम – जुळ्यांचे दुखणे

१८०२मध्ये एकबर्ग या स्वीडनच्या शास्त्रज्ञास स्कँडेनेव्हियात सापडलेल्या खनिजांमध्ये एक नवीन मूलद्रव्य सापडले.

सतराव्या शतकाच्या मध्यावर कोलंबिया नदीच्या पात्रात काळसर रंगाचे सोनेरी छटा असणारे वजनदार असे एक खनिज मिळाले. इतर नमुन्यांबरोबर लोहयुक्त खनिज म्हणून ते ब्रिटिश वस्तुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आले. हे खनिज कोलंबाइट म्हणून ओळखले जाऊ लागले. तब्बल १५० वर्षांनंतर १८०१मध्ये चार्ल्स हँचेटचे या खनिजाकडे लक्ष गेले. याचा अभ्यास करताना लोहाबरोबर यात मँगनिज आणि ऑक्सिजनही सापडले. याशिवाय एक अज्ञात मूलद्रव्यही या खनिजात असल्याचे हँचेटला आढळले. या मूलद्रव्याचे नाव हँचेटने कोलंबिअम असे केले.

१८०२मध्ये एकबर्ग या स्वीडनच्या शास्त्रज्ञास स्कँडेनेव्हियात सापडलेल्या खनिजांमध्ये एक नवीन मूलद्रव्य सापडले. ग्रीक पुराणकथेचा आधार घेऊन त्याला टँटॅलम हे नाव देण्यात आले. या टँटॅलमचे आणि कोलंबिअमचे बरेच गुणधर्म सारखे होते. बर्झेलिअससह अनेक रसायनशास्त्रज्ञांना वाटले एकाच मूलद्रव्यावर दोन ठिकाणी संशोधन चालू आहे. काही काळानंतर बर्झेलिअसला आपल्या निष्कर्षांबद्दल शंका आली आणि त्यांनी आपल्या शिष्याला, फ्रेडरिक वोलरला पत्राद्वारे आपली शंका कळविली आणि पुढील संशोधन करण्यास सांगितले. वोलरलाही या दोन मूलद्रव्यांचे नाते कळले नाही.

अखेर १८४४मध्ये हेंरिक रोझ या जर्मन रसायनशास्त्रज्ञाला हा उलगडा झाला. कोलंबाइट या खनिजात टँटॅलम आणि कोलंबिअम ही दोन मूलद्रव्ये असल्याचे त्याने सिद्ध केले. ग्रीक पुराणाचा आधार घेत कोलंबिअमला निओबिअम हे नाव देण्यात आले. टँटॅलम आणि कोलंबिअम या जुळ्यांचे गुणधर्म सारखे असल्यामुळे यांचे औद्योगिक उत्पादन दीर्घकाळ लांबले. १८६६मध्ये स्विस रसायनशास्त्रज्ञ जे. सी. गॅलिअर्ड द मेरिग्नॅक याला या जुळ्यांना वेगळं करण्याची औद्योगिक रीत मिळाली. निओबिअम धातूस्वरूपात मिळविण्यासाठी असलेली प्रक्रिया थोडी किचकट स्वरूपाची आहे. पोलादात निओबिअम मिसळल्यास त्याची तन्यता आणि गंजरोधकता वाढते. अणुभट्टीत झिर्कोनिअमबरोबर त्याचा वापर होतो. झिर्कोनिअमचे न्युट्रॉन शोषकता, उच्च वितळणिबदू तसेच उष्णता रोधकता हे सारे गुणधर्म निओबिअममध्ये आहेत. याशिवाय एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे निओबिअम हा वायू शोषक आहे. निर्वात इलेक्ट्रॉन नळ्या करताना या गुणधर्माचा उपयोग होतो. नळ्या निर्वात करताना काही वायू शिल्लक राहिला तरी नळ्यांवर अल्पसे निओबिअमचे आवरण असले तरी ते उरलासुरला वायू शोषून घेऊन नळ्या निर्वात करतो.

अनघा अमोल वक्टे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

24
Just Now!
X