शेतीमध्ये पारंपरिक ज्ञान व शास्त्रज्ञांच्या शिफारशी यांच्या जोडीला स्वत:ची कल्पकताही आवश्यक असते. विविध शेतकऱ्यांच्या उदाहरणांमधून अशा कल्पना सर्वाच्या पुढे येत असतात. जिल्हा अमरावती, तालुका दर्यापूर येथील आमला गावचे असेच एक कल्पक शेतकरी बाबुराव वानखेडे. त्यांनी अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात इंटर कॉमर्सपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर स्वत: शेती करण्यास सुरुवात केली. काही वष्रे बाबुराव दर्यापूर पंचायत समितीचे सभापती होते. त्या वेळी सरकारी धोरणाप्रमाणे त्यांना रासायनिक खते व कीटकनाशके यांचा प्रसार करावा लागत असे आणि स्वत:च्या शेतीत त्याचा वापर ते करीत असत. पण अनुभव घेतल्यानंतर त्यांनी या निविष्ठांचा त्याग करून १९७७-७८ साली सुरुवात करून सेंद्रीय शेती पद्धत विकसित केली आहे.
 एका वर्षी ते शेतात तूर आणि मूग अशी एकत्रित पिके घेतात. दुसऱ्या वर्षी त्याच शेतात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या डीएचवाय-२८६ या कापसाच्या जातीची लागवड करतात. या जातीच्या पानांवर जास्त दाट लव असते. त्यामुळे नसíगकपणे मावा, तुडतुडे व पांढरी माशी या किडींपासून पिकांचे संरक्षण होते. कीटकनाशके वापरायची गरज पडत नाही. झाडांची उंची ७०-७५ सेमी असल्याने कापसाची वेचणी सहज करता येते. बाबुराव कोणत्याही पिकाला रासायनिक खत देत नाहीत किंवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करीत नाहीत. तरीही त्यांच्या पिकांवर किडी आढळत नाहीत. या कापसाच्या शेतात आदल्या वर्षी तूर आणि मूग घेतल्याने या पिकांची पाने शेतात गळालेली असतात. त्या पानांचे खत कापसाच्या पिकाला मिळते. त्यामुळे वेगळे खत देण्याची गरज पडत नाही.
बाबुरावांनी काही वष्रे सोयाबीनचे पीक घेतले. या पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. शिवाय सोयाबीनच्या पिकाला बाजारभाव कमी मिळतो. त्यामुळे हे पीक घेण्याचे बंद केले. बाबुराव वानखेडे विदर्भ सेंद्रीय कापूस उत्पादक शेतकरी संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या कापसाची निर्यात होते आणि भाव जास्त मिळतो.
-शुभदा वक्टे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..   –   उपद्व्याप
हल्ली माझी रोजनिशी माझ्या प्लास्टिक सर्जरीवरच्या पुस्तकाने आणि या स्तंभातल्या लिखाणाने भरली आहे. स्तंभाचे आणखी काही लेखच राहिले आहेत, पण ते प्लास्टिक सर्जरीवरचे पुस्तक तसेच चालू राहील. मला लोक विचारतात की हे कधी संपेल? हे पुस्तक माझा मेंदू थांबेल तेव्हा थांबेल.
 विज्ञान एक तर सारखी प्रगती करते तेव्हा नव्या नोंदी होत राहतील आणि प्लास्टिक सर्जरीचा आवाका डोक्यावरच्या केसापासून पायांच्या अंगठय़ापर्यंत आहे. तसे बघता प्राध्यापक म्हणून मी सोळा वर्षांपूर्वी निवृत्त झालो, परंतु हे पुस्तक लिहायला घेतल्यापासून तिशीचा उत्साह संचारला आहे. पुस्तक सुरू करताना जग केवढे पुढे गेले आपण काय लिहिणार हा न्यूनगंड आधी हद्दपार करावा लागला.  पुस्तके वाचावी लागली. आपले विद्यार्थी शस्त्रक्रिया करताना बघताना मास्तरकीचा मुखवटा काढून विद्यार्थीदशेत जावे लागले. त्यांच्याबरोबर चर्चा करताना त्यांचे म्हणणे स्वत:चा आग्रह सोडून ऐकावे लागले. कधी कधी त्यांनी चुका केल्या तर त्या दुरुस्त करताना समजुतीची भाषा वापरावी लागली. ते सगळे उमेदीच्या काळातले आहेत तरी त्यांनी वेळ काढून माझ्याकडे यावे कारण मी ज्येष्ठ या कल्पनेचा त्याग करावा लागला.
E mail  ची मदत प्रचंड होती पण बरेच वेळा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी फेऱ्या मारल्या. मी जेवढा वाकत गेलो तेवढे ते माझे तरुण साहायक जास्तच स्फुरण पावले. प्रकरणाचा माल तयार केल्यानंतर ते अचूक आणि लहान सुटसुटीत भाषेत लिहिणे जिकिरीचे काम होते. तेव्हा मानेवर खडा नव्हे दगड ठेवला. मजकूर संपल्यावर तोच दगड एखाद्या मऊ पिसासारखा गोंजारू लागला. स्वखर्चाने परिषदेला जाणे चालू केले. तिथे कोण कशात वाकबगार आहे हे शोधून काढले.
माझ्या उत्साहामुळे माझ्या एका दिवंगत मित्राचा मुलगा संगणकावर मला दररोज अर्धा तास स्वत:हून देऊ लागला त्याला स्वखर्चाने मानधन द्यायला सुरुवात केली. कामाचा आवाका वाढला तसे हळूच आमच्या परिषदेला ‘मला नव्हे त्याला पैसे द्यावेत,’ असे सुचवले.
 सगळ्यात महत्त्वाचे माझ्या बुद्धीला चालना मिळाली. दमून रात्री गाढ झोप लागू लागली आणि माझे सहकारी जे सगळे माझ्याहून तरुण आहेत त्यांनी तुमच्या अनुभवामुळे प्लास्टिक सर्जरी नावाच्या फळातला खरा गर इथे उतरला आहे, अशी दाद दिली.
 हा कर्मयोगच?
एक दिडकीही यातून मिळू नये अशी प्रार्थना आहे. हे संगणक अवकाशातले पुस्तक परदेशात वाचले जाऊ लागले. पुन्हा एकदा अटकेपार गेलो. या पुस्तकाला माझ्याहून दुप्पट कर्मयोगी संपादक मिळाला त्याचे नाव टोनी वॉटसन. त्याच्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस –   हट्टी एमडीआर क्षयरोग : आयुर्वेदीय दिलासा
औषधांचा खर्च न परवडल्यामुळे उपचार अर्धवट सोडून देणाऱ्या रुग्णांमध्ये साध्या क्षयरोगाचे रूपांतर ‘मल्टी ड्रग रेझिस्टंट’ म्हणजे औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगात होण्याचे प्रमाण वाढले आहे. सरकारच्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांना ‘डॉट्स’ या औषधांचा डोस पूर्ण करायचा असतो. ही औषधे प्रभावी असून त्यांचा डोस रुग्णांना मोफत दिला जातो. हा डोस पूर्ण न केल्यामुळे एमडीआर क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या रुग्णांना पुन्हा उपचार घेताना २४ ते २७ महिन्यांचे उपचार घ्यावे लागतात. क्षयरोग बरा न झाल्यामुळे तो रुग्ण आधीच त्रस्त झालेला असतो. त्यामुळे त्याने उपचार घ्यावेत, यासाठी समुपदेशनाची गरज भासते. एमडीआर क्षयरोगातही उपचारांचा डोस पूर्ण न केल्यास त्याचे रूपांतर आणखी गुंतागुंतीचा ‘एक्स्ट्रीम मल्टी ड्रग रेझिस्टंट एक्सडीआर’ क्षयरोगात होते.
आयुर्वेदाप्रमाणे क्षयविकाराचे वर्गीकरण त्रिरूप, षड्रूप, एकादशरूप असे केले जाते. राजयक्ष्मा विकाराबद्दल प्राचीन काळापासून अनेकानेक ग्रंथांत खूपच ऊहापोह केलेला आहे. चंद्रालाही महिन्यातून पंधरा दिवस (वद्यपक्षात) क्षयाची बाधा होते.  ही आठवण अशाकरिता करून दिली की क्षयग्रस्त रुग्णांनी मनाची उभारी धरावी. अमावास्येनंतर, चंद्र कलेकलेने वाढतो, यातून क्षयग्रस्त रुग्णांनी जरूर धडा घ्यावा.
क्षयरोगाच्या आयुर्वेदीय उपचारात रिअ‍ॅक्शन, वजन घटण्याचा धोका अजिबात नाही. क्षयरोगाकरिता आयुर्वेदीय उपचारात विविधता आहे. उपचार घेणाऱ्यांनी चार गोष्टींचे भान ठेवावे लागते. अरुची, ज्वर, वजन, रक्त घटणे याचा सामना यशस्वीपणे करण्याकरिता पुढील उपचार करावेत. चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादि, शृंग,  अभ्रकमिश्रण, लघुमालिनीवसंत सकाळ- संध्याकाळ, जेवणानंतर पिप्पलादिकाढा, आमलक्यादि चूर्ण, कफ खोकला असल्यास वासापाक, नागरादिकषाय, एलादिवटी, पुदिना, आले-लसूण, ओली हळद, तुळशी पाने, मनुका यांची मदत घ्यावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत –  ३ डिसेंबर
१८७६ > नाटककार आणि महाराष्ट्र नाटक मंडळीचे एक संस्थापक सदस्य यशवंत नारायण टिपणीस यांचा जन्म. यल्मा या इंग्रजी कादंबरीच्या आधारे कमला हे नाटक त्यांनी लिहिले. काही पौराणिक, सामाजिक  तसेच शहाशिवाजी, दख्खनचा दिवा  आदी  ऐतिहासिक नाटके त्यांनी लिहिली होती.
१९३१ > नाटय़समीक्षक, टीकाकार, भाषाअभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार मुकुंद श्रीनिवास कानडे यांचा जन्म. ‘दासबोधाचा भाषाशास्त्रीय अभ्यास’ ह्य़ा विषयावर पीएच.डी. त्यांचे नाटय़विषयक ग्रंथ याप्रमाणे- ‘प्रयोगक्षम मराठी नाटके’ यातून १०० वर्षांच्या काळातील नाटकांची वर्णनात्मक सूची. ‘कालचे नाटककार’ हे समीक्षात्मक आणि ‘मराठी रंगभूमीचा उष:काल’ हे त्यांचे प्रमुख लेखन.
१९५१> प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई नथूजी चौधरी यांचे निधन. निरक्षर बहिणाबाईंचे काव्य संसारी स्त्रीची सुखदु:खे जगत असताना फुलले; ती शहाणिवेची कविता होती, याची प्रचीती ‘मानसा मानसा कधी व्हशील मानूस’ यासारख्या ओळींतून येते. बहिणाबाईची गाणी  हा त्यांचा संग्रह.
१९५८> कवयित्री, कथाकार मेघना मोरेश्वर पेठे यांचा जन्म. ‘हंस अकेला’ आणि ‘आंधळ्यांच्या गायी’ हे कथासंग्रह प्रसिद्ध
– संजय वझरेकर