आम्ही ‘तानसेन’ नसलो तरी ‘कानसेन’ मात्र नक्की आहोत, असं अनेक जण सांगतात. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा असतो की, आम्हाला गाता येत नसलं तरी समोरचा गायक कसा गातोय, याचं मात्र पक्कं भान असतं. त्याचा एखादा सूर चुकीचा लागला तरी लगेच आमच्या कानाला खटकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर लावणे, सूर चुकणे, सुरात गाणे असे अनेक शब्दप्रयोग आपण ऐकतो. हे सूर म्हणजे नेमकं काय आणि सूर चुकतो म्हणजे काय होतं? बरं, अचूक सूर कसा काय ठरवायचा? असे अनेक प्रश्न आपल्या मनात कुतूहल निर्माण करतात.

मुळात सूर म्हणजे आवाज किंवा ध्वनी होय. आघात झाला की आवाज निर्माण होतो. अर्थात, सगळ्याच आघातांचे आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत. नाही तर हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या पदार्थाच्या कणांची हालचाल होऊन त्यांच्यात होणाऱ्या टकरींचेसुद्धा आवाज आपल्याला ऐकू आले असते आणि मोठाच घोळ झाला असता. ध्वनी किंवा आवाज लहरींच्या स्वरूपात असल्याने त्याला लहरींची वैशिष्टय़े प्राप्त झालेली असतात. यातलं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे कंप्रता किंवा वारंवारता. कोणत्याही ध्वनीला कंप्रता ही असतेच. ही कंप्रता ध्वनीचा स्रोत किती वेगाने कंपन पावतो यावर अवलंबून असते. एका सेकंदात ध्वनीच्या स्रोताची जेवढी कंपनं होतात, ती त्या स्रोताने निर्माण केलेल्या ध्वनीची कंप्रता होय. हेन्रीच हर्ट्झ या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ कंप्रता ‘हर्ट्झ’ या एककात मोजली जाते. सुमारे वीस हर्ट्झ ते वीस हजार हर्ट्झ या मर्यादेत असलेल्या कंप्रतेचेच आवाज आपण ऐकू शकतो. मानवी श्रवणेंद्रियाच्या या मर्यादा आहेत.

संगीतातल्या सुरांचा विचार केला तर त्या प्रत्येक सुराला विशिष्ट अशी कंप्रता आहे. सा, रे, ग, म, प, ध, नी या सात सुरांनंतर येणारा ‘सां’ हा वरच्या पट्टीतला म्हणतात. या ‘सां’ची कंप्रता ही पहिल्या ‘सा’च्या कंप्रतेच्या बरोबर दुप्पट असते. म्हणजेच आता इथून पुढे दुसरं सप्तक सुरू होतं.  प्रयोगशाळेत आठ नादकाटय़ांचा एक संच वापरला जातो. प्रत्येक नादकाटा (Tuning fork)  विशिष्ट कंप्रतेचा ध्वनी निर्माण करू शकतो. चढत्या क्रमाने मांडणी केली तर पहिल्या नादकाटय़ाची कंप्रता २५६ हर्ट्झ असते आणि शेवटच्या नादकाटय़ाची कंप्रता ५१२ हर्ट्झ असते. याचाच अर्थ, पहिल्या नादकाटय़ाने ‘सा’ हा सूर निर्माण होतो. त्यानंतर पुढचे नादकाटे क्रमश: ‘नी’पर्यंतचे सूर निर्माण करतात आणि शेवटचा नादकाटा हा पुढच्या सप्तकातला ‘सां’ हा सूर निर्माण करतो. थोडक्यात, सुरांत गाणे म्हणजे अचूक कंप्रतेचे सूर आपल्या गळ्यातून निर्माण करणे आणि ही कंप्रता चुकली तर अर्थातच तो सूर कानाला खटकतो.

– हेमंत लागवणकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : ‘लेखकाचे प्रत्येक लेखन हा अंत नसलेला शोध’

ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रतिभा राय यांनी आपल्या भाषणातून मौलिक विचार मांडले. त्या म्हणाल्या, ‘‘प्राचीन आणि समृद्ध अशा माझ्या ओडिया या मातृभाषेला खूप वर्षांनंतर सन्मान प्राप्त झाला आहे म्हणून मी भारतीय ज्ञानपीठ आणि त्यांच्या निर्णायक समितीचे विशेष आभार मानते.

माझ्या लेखनातच तत्त्वज्ञान आहे. भारत वर्ष, ज्याने मला ‘हे विश्व माझे कुटुंब’ असे शिकवले. माझ्या चैतन्यामध्येच माझा परमेश्वर आहे, तो एक आहे हे शिकवलं. माझ्या भाषेचे नाव आहे- प्रेम. ज्यामध्ये ही चराचर सृष्टी, जीवात्मा माझ्याशी संवाद साधतात. विश्वकवी रवींद्रनाथांनी मानवतेची उदात्त भाषा साऱ्या विश्वाला ऐकवली होती. १९व्या शतकातील ओडिया संतकवी भीम भोईंनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली आहे. ‘मेरा जीवन भलेही नरक में पडा रहे, पर जगत का उद्धार हो।’ या पूर्वसूरींना नमस्कार करीत मी एवढंच सांगू इच्छिते, की माझा वाद ‘मानवतावाद’ आहे. माणसाचं अतीव दु:ख आणि त्याची जगण्याची धडपड मला लेखनाला प्रवृत्त करते. या भूतलावरील प्रागैतिहासिक युगातील होमोसैपियन मानवाच्या जीवनसंघर्षांपासून ते ओदिशातील आदिम बोंडा जनजातीच्या जीवनसंग्रामापर्यंत, जगप्रसिद्ध कोणार्क मंदिराच्या कलानिर्मितीपासून ते बाबरी मशिदीच्या विध्वंसापर्यंत आणि विज्ञानाच्या यशस्वी विकासापासून ते अमेरिकेच्या ट्विन टॉवरच्या विध्वंसापर्यंत, मानव क्लोनिंग ते स्त्री भ्रूणहत्येपर्यंत माझा कथाप्रवास आहे. माझ्या ‘मग्नमाटी’ कादंबरीचा विषय १९९९चे ओदिशातील प्रलयंकारी वादळ, झालेली मनुष्यहानी एवढाच नाही तर येणाऱ्या प्रलयीकाळाचा स्वच्छ इशारा आहे.  माणूस हा देश, जात, संप्रदाय, वर्ण, भाषा, इतिहास, भूगोल, संस्कृती आणि पूर्वजांचा अंश (जीन्स) या चक्रव्यूहात अडकलेलाच जन्माला येतो. त्यामुळे जन्माला आल्यापासूनच मुक्तीसाठी त्याच्या संघर्षांला सुरुवात होते. माणसाची ही लढवय्या वृत्तीच लेखकाला प्रिय असते आणि तोच त्याचा विचार बनतो. तेव्हा लेखकाचे प्रत्येक लेखन हे मानवमुक्तीची सकारात्मक उक्ती असते. ही बांधिलकी सामाजिक नाही तर विशुद्ध साहित्यिक आहे. हीच लेखकाची सगळ्यात महत्त्वाची बांधिलकी आहे. लेखकाचे प्रत्येक लेखन हा अंत नसलेला शोध असतो. या शोधयात्रेचा शेवट न होणे हीच लेखकाची ऊर्जा असते.’’

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notes identify in a song
First published on: 11-12-2017 at 01:01 IST