इ.स. १९३२मध्ये जेम्स चॅडविक याने न्यूट्रॉनचा शोध लावला. कोणताही विद्युतभार नसल्याने, न्यूट्रॉन हा कोणत्याही अणूच्या केंद्रकात विनाअडथळा शिरू शकणार होता. त्यामुळे न्यूट्रॉनच्या माऱ्याद्वारे मूलद्रव्यांचे विविध समस्थानिक निर्माण करणे शक्य होणार होते. इटलीत एन्रिको फर्मी याने १९३४ सालच्या सुमारास विविध अणूंवर होणारा न्यूट्रॉनचा परिणाम अभ्यासण्यास सुरुवात केली. यात फर्मी याने युरेनियमच्या अणूंवर न्यूट्रॉनचा मारा केला. या माऱ्यामुळे युरेनियममध्ये अनेक नवीन किरणोत्सारी स्रोत निर्माण होत होते. किरणोत्साराचे हे स्रोत म्हणजे, युरेनियमपेक्षा मोठा अणुक्रमांक असणाऱ्या मूलद्रव्यांचे समस्थानिक असल्याचे त्याचे मत झाले.

याच काळात ऑट्टो हान आणि फ्रिट्झ स्ट्रासमान यांनीही जर्मनीतील कैसर विल्हेम इन्स्टिटय़ूटमध्ये अशाच प्रयोगांना सुरुवात केली होती. सन १९३८मधील या प्रयोगांत या संशोधकांनीही युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला. त्यातून निर्माण होणाऱ्या तीव्र किरणोत्साराचे त्यांनी मापन केले, तसेच न्यूट्रॉनचा मारा केलेल्या नमुन्यांचे रासायनिक विश्लेषणही केले. या विश्लेषणात त्यांना युरेनियमपेक्षा जड असणारी नवी मूलद्रव्ये काही सापडली नाहीत. मात्र, आयरिन क्यूरी-जोलिओ आणि पावले साविक यांनी सुचवल्यानुसार बेरियम, लँथनमसारखी मूलद्रव्ये त्यांना त्यात आढळली. युरेनियमच्या तुलनेत जवळपास निम्मा अणुभार असणारी ही मूलद्रव्ये युरेनियमच्या अणूचे विखंडन (फिशन) होत असल्याचे दर्शवत होती.

सुरुवातीच्या काळात हानबरोबर संशोधन करणाऱ्या लिझ माइटनरला तिच्या ज्यू पूर्वजांमुळे जर्मनी सोडून स्वीडनमध्ये आश्रय घ्यावा लागला. मात्र तिथे असतानासुद्धा ऑट्टो हान आणि फ्रिट्झ स्ट्रासमान यांनी पाठवलेल्या माहितीचे आपल्या ऑट्टो फ्रिश या पुतण्याच्या सहकार्याने तिने विश्लेषण करण्यास सुरुवात केली. नील्स बोहर याने सुचवल्याप्रमाणे, माइटनर आणि फ्रिश यांनीही युरेनियमचे अणुकेंद्रक द्रवाच्या थेंबासारखे असल्याचे मानले. या केंद्रकात न्यूट्रॉन शिरताच हे केंद्रक अस्थिर होऊन या अणुकेंद्रकाचे दोन ऊर्जाधारी भागांत विभाजन होत असल्याचा निष्कर्ष माइटरने काढला. या विखंडनानंतर आइन्स्टाइनच्या सूत्रानुसार, युरेनियमच्या अणूतील किती वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होत असावे याचे गणितही माइटनरने मांडले. १९३९ साली फ्रेडेरिक जोलिओ आणि इतरांनी या विखंडनात कित्येक न्यूट्रॉनही निर्माण होत असल्याचे दाखवून दिले. अणुऊर्जा निर्मिती शक्य करणाऱ्या या संशोधनाचा पाया घालणाऱ्या ऑट्टो हान याला १९४४ साली नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२   office@mavipamumbai.org