संगणकशास्त्र हे संगणकाच्या विकासाचा पाया आहे. त्याला आवश्यक ती वैचारिक बैठक देण्याचे महत्त्वाचे कार्य डच गणितज्ज्ञ एड्सगेर दायेस्त्रा याने केले. तसेच आज्ञावली (प्रोग्राम) अधिकाधिक साधी आणि प्रभावी करण्यावर त्याचा रोख होता. संगणकशास्त्राच्या उत्तम शिक्षणाच्या दृष्टीने हा दृष्टिकोन पायाभूत मानला जातो. उच्च दर्जाचा आज्ञावलीकार असणाऱ्या दायेस्त्राने ‘अलगोल ६०’ या संगणकीय भाषेची अतिशय काटेकोरपणे रचना केली. यामुळे संगणकाची कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत झाली. संगणकावर एकाच वेळी अनेक आज्ञावल्या कशा हाताळल्या जाऊ  शकतील, यासंबंधीच्या अभिनव कल्पना त्याने साकारल्या.

दायेस्त्राचे नाव जगभर होण्यास त्याचा आलेख सिद्धांतात भर घालणारा, १९५९ साली प्रसिद्ध झालेला शोधलेख कारणीभूत ठरला. ‘न्यूमेरिश मॅथेमॅटिक’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या लेखात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात किमान अंतराचा रस्ता कोणता आहे, हे शोधण्यासाठी दायेस्त्राने गणिती रीत सुचवली. अनेक वेळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वाटेत वेगवेगळे रस्ते लागतात. यातील कोणत्या रस्त्याने गेल्यास जलद पोहोचू, याचे गणित मांडणे दायेस्त्राच्या गणिती पद्धतीमुळे शक्य झाले. दायेस्त्राची पद्धत एका साध्या तर्कशास्त्रावर आधारली होती. समजा, एखाद्या व्यक्तीला ‘अ’ या ठिकाणाहून ‘ड’ या ठिकाणी जायचे आहे. यासाठी अ-ब-क-ड हा सर्वात जवळचा रस्ता आहे. अशा वेळी याच रस्त्यावरील कोणत्याही दोन ठिकाणांतील रस्ता, उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘ड’मधील ब-ड हा रस्तासुद्धा किमान अंतराचाच असेल. दायेस्त्राची ही गणिती रीत फक्त अंतरासाठीच नव्हे, तर इतर घटकांसाठीही लागू होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला गर्दी टाळून वेळेच्या दृष्टीने लवकर पोहोचायचे आहे. त्यासाठी अधिक अंतर कापण्याची त्याची तयारी आहे. अशा वेळी ही पद्धत वापरताना, अंतरांच्या ऐवजी वेगवेगळ्या रस्त्यांवर लागणारा वेळ लक्षात घेतला जातो. दायेस्त्राची ही पद्धत प्रवासाच्या आखणीपासून ते अगदी रस्तेबांधणी तसेच संदेशवहनातील नेटवर्किंगच्या आखणीसाठीही वापरली जाते.

दायेस्त्राच्या या सर्व कार्यामुळे, त्या काळात नव्याने सुरू झालेल्या संगणकशास्त्राला आणि त्याच्या शिक्षणाला सुदृढ बळकटी मिळाली. दायेस्त्रा याला १९७२ सालचे ‘अ‍ॅलन एम. टय़ूरिंग पारितोषिक’ देण्यात आले, जे संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोबेल पारितोषिकासारखे मानले जाते!

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org