नैसर्गिक संख्या दर्शविण्यासाठी एक, द्वि, त्रि.. दश, शत, इत्यादी शब्द संस्कृतमध्ये आहेत. पण जुने संस्कृत गणितग्रंथ पद्यात असल्यामुळे त्यासाठी संख्यात्मक शब्द कल्पकतेने तयार करणाऱ्या तार्किक चौकटी विकसित झाल्या. यामध्ये तीन पद्धती उल्लेखनीय आहेत. या सर्व पद्धतींत अंक उजवीकडून डावीकडे वाचले/ लिहिले जातात.

आर्यभटांनी वर्णाक्षरे आणि अंक यांची सांगड घालून व स्थानिक किंमतीची जोड देऊन शोधलेल्या पद्धतीत क, च, ट, त, प गटांतील २५ अक्षरांना १ ते २५ आणि य ते ह या ८ अक्षरांना अनुक्रमे ३०, ४०, ५०..१०० अशा किंमती दिल्या. नऊ स्वरांचा उपयोग नऊ वर्ग/ अवर्ग स्थानांच्या स्थानिक किंमती दर्शविण्यासाठी केला. यामुळे कोणतीही संख्या वर्णाक्षरांनी लिहिता येऊ लागली. जसे की, मखि = २२५; कारण म = २५, ख = २, इ = १०२. म्हणून २००+२५ = २२५. मात्र या पद्धतीत काही शब्द उच्चारण्यास कठीण झाल्याने ती लोकप्रिय झाली नाही.

कटपयादि या दुसऱ्या पद्धतीत स्वरांची तसेच न आणि ञ यांची किंमत शून्य घेतात. जोडाक्षरात फक्त शेवटचे व्यंजन गृहीत धरले जाते. क, ट प, य = १; ख, ठ, फ, र = २.. ङ्, ण, म, श = ५; च, त, ष = ६; छ, थ, स = ७; ज, द, ह = ८.. अशा किंमती येतात. यामुळे भवति = ६४४ किंवा राम = ५२ असे शब्द होतात. या पद्धतीत उच्चारण्यास सोपे अर्थपूर्ण शब्दसमूह संख्यांसाठी तयार करता येतात.

याशिवाय संख्यांसाठी संकेतार्थी शब्द वापरण्याची पद्धतही लोकप्रिय झाली. उदाहरणार्थ, वेद चार आहेत म्हणून वेद = ४. अर्थातच संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान असे सांकेतिक गणित शिकण्यासाठी जरूरी होते. यामुळे प्रचलित शब्दांचे पर्याय उपलब्ध झाल्याने छंदोबद्ध ग्रंथ मुखोद्गत करणे सोपे झाले. जसे की, वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांच्या पाय या गुणोत्तराचे सूत्र ‘लीलावती’त असे आहे : ‘‘व्यासे भनन्दाग्निहते विभक्ते खबाणसूर्यै: परिधि: स सूक्ष्म:।’’

येथे भ = २७ (नक्षत्रे), नन्द = ९

(नंद कुळातील राजे), अग्नि = ३ (यज्ञीय अग्नि). म्हणून भनन्दाग्नि = ३९२७ ही संख्या येते. ख = ० (आकाश), बाण = ५ (मदनाचे बाण), सूर्य = १२ (आदित्यदेवता) म्हणून खबाणसूर्य म्हणजे १२५०. त्यामुळे परीघ = व्यास गुणिले ३९२७ भागिले १२५०. यावरून पाय = ३९२७/१२५० = ३.१४१६!

– डॉ. मेधा लिमये  

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org