सुरुवातीला कॅरोथर्सने ९-कार्बन अमाइनो अ‍ॅसिडपासून पॉलीअमाइड बनविले. या बहुवारिकापासून तंतू बनविले गेले आणि हे तंतू रेशमाच्या तंतूपेक्षा सरस होते. त्यांना चांगली ताकद होती, ते २००अंश से.पर्यंत वितळत नसत आणि त्यांना चांगली लवचीकता होती. हे तंतू बाजारात चांगले लोकप्रिय होतील, असे वाटले होते. परंतु कॅरोथर्सच्या हे लक्षात आले की ह्या तंतूची उत्पादन प्रक्रिया फारच किचकट आहे आणि प्रयोगशाळेत जरी ती यशस्वीरीत्या राबवता आली तरी मोठय़ा स्तरावर ते अशक्य आहे. यामुळे त्याने आपला मोर्चा इतर अमाइनो अ‍ॅसिडकडे वळविला.
 अनेक प्रकारच्या अमाइनो अ‍ॅसिडवर प्रयत्न केल्यावर शेवटी हेक्सामिथिलिन डाय माइन आणि अ‍ॅडिपिक अ‍ॅसिड यांच्या प्रक्रियेतून बनलेले बहुवारिक पॉली अमाइड हे तंतू बनविण्यास योग्य असल्याचे आढळले. या दोन्ही मूळ रसायनांमध्ये ६-६ कार्बनचे अणू असल्यामुळे या बहुवारिकास पॉली अमाइड ६६ असे नाव दिले गेले. या बहुवारिकापासून तंतू बनविण्याची प्रक्रिया विकसित करण्यात आली. बहुवारिकाचे वितळलेले द्रव तनित्रामधून धारांच्या रूपात बाहेर काढून नंतर त्यांना थंड करून घनरूप देऊन तंतू बनविले जातात. या प्रक्रियेस ‘वितळ कताई’ असे संबोधले जाते. या बहुवारिकापासून बनविलेल्या तंतूस नायलॉन असे नाव पडले.
सुरुवातीच्या काळात नायलॉनचे उत्पादन प्रयोगशाळेच्या स्तरावर केले जात असे. आठवडय़ाला फक्त १०० पौंड इतकेच नायलॉन प्रयोगशाळेत बनविले जात असे. १९३८ मध्ये ५०० पौंड नायलॉन तंतूंचे उत्पादन होईल अशा प्रायोगिक स्तरावरील (पायलट) कारखान्याची उभारणी करण्यात आली. ह्या  सर्व संशोधनाबाबत सुरुवातीला अत्यंत गुप्तता राखण्यात आली होती. वस्त्रोद्योगात या नवीन तंतूबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. परंतु सप्टेंबर १९३९ मध्ये या संशोधनाला पेटंट मिळेपर्यंत डूय पॉन्ट कंपनीने गुप्तता पाळली होती. नंतर ऑक्टोबर १९३९ मध्ये सी फोर्ड येथील त्यांच्या कारखान्याला नायलॉन तंतूंच्या उत्पादनास अधिकार देण्यात आले. दोनच आठवडय़ांनी कंपनीचे अधिकारी स्टाइन यांनी रेडिओवरील देशभरातील प्रसारणात कंपनीने नायलॉन हा नवीन तंतू विकसित केल्याचे जाहीर केले. डिसेंबर १९३९ मध्ये या कारखान्यात नायलॉन तंतूचे उत्पादन सुरू झाले. यापूर्वी कधीही अस्तित्वात न आलेले तंत्रज्ञान या कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेसाठी उभे करण्यात आले आणि यासाठी कंपनीला ८ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका खर्च आला.  
 चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – महाराजा जगतजीतसिंग
‘मेजर जनरल, हिज हायनेस, र्फजद-इ-दिलबंद रसीख-अल-इक्तिदाद-इ-दौलत-इ-इंग्लीशिया, राजा-इ-रांजगण, महाराजा सर जगतजीतसिंग बहादूर, महाराजा ऑफ कपुरथाळा, जी.सी.एस.आय.’ अशी लांबच लांब बिरुदावली आपल्या नावाआधी लावणारे कपुरथाळा संस्थानचे महाराजा जगतजीतसिंग हे अनेक चांगल्या व वाईट गुणांचे एक अजब रसायन होते.
 वयाच्या पाचवा वर्षी वडील राजा खडकसिंगच्या मृत्यूमुळे बालवयात राजेपदाची जबाबदारी जगतजीतसिंग यांच्या अंगावर पडली. त्यांच्या वयाची १८ वष्रे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच इ.स. १८७७ ते १८९० या काळात राज्यकारभार आणि बालराजाचे पालनपोषण, शिक्षण आणि पालकत्व यांची जबाबदारी संस्थानाच्या ब्रिटिश रेसिडेंटने घेतली. जगतजीतच्या सर्वागीण विकासासाठी तज्ज्ञांची एक समितीच नेमली गेली होती. इंग्लिश, फ्रेंच आणि स्पॅनिश या युरोपीय भाषांबरोबरच त्याला संस्कृत, िहदी, पíशयन, उर्दू, पंजाबीचे सखोल ज्ञान दिले गेले. शिक्षणाबरोबरच उच्चवर्गाच्या वर्तुळात जपण्याच्या रीतिभाती, त्यांच्यातील संभाषण यामध्ये जगतजीतला तरबेज केले गेले.  
जगतजीतसिंग यांनी वयाच्या अठराव्या वर्षी, १८९० साली राज्याचे प्रशासन हाती घेतले व २० ऑगस्ट १९४८ रोजी संस्थान विलीन केले. प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत या राजाने राज्यात शैक्षणिक सुधारणा केल्या. जगभर अनेक वेळा भ्रमण केल्यामुळे बहुश्रुत आणि दूरदर्शी झालेल्या राजाने आपल्या राज्यात न्यायालये, सरकारी कचेऱ्या यांच्या इमारती फ्रेंच स्थापत्यशास्त्रावर आधारित बांधल्या. कपुरथाळ्याची मुरिश मशीद आणि गुरुद्वारा, तसेच सुलतानपूरचा गुरुद्वारा ही त्याने केलेली महत्त्वाची बांधकामे. शास्त्रीय शेत लागवडीचा पुरस्कर्ता असलेल्या जगतजीतसिंगने एक आदर्श, नमुना शेत तयार करून घेतले व राज्यातील खेडय़ांमध्ये ‘सहकारी शेती सोसायटय़ा’ स्थापन केल्या. राज्यातील फगवाडा आणि हमीरा येथे साखर कारखाने सुरू करण्याचे श्रेयही या महाराजालाच जाते.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com