वनस्पतींची ओळख आणि मांडणी या विषयावर विविध संस्थांमध्ये अनेक पुस्तके मुंबईत उपलब्ध आहेत. त्यातील काही साहित्य अगदी नवीन तर काही खूप जुने आणि दुर्मीळ स्वरूपातील आहे.

या विषयावरील सर्वात जुना ग्रंथसाठा संशोधनाच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहे. हा साठा मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजच्या ब्लॅटर हब्रेरियममधील ग्रंथालयात आहे. ‘स्पेसीज प्लॅटेरम’, ‘जिनेरा प्लँटेरम’, ‘हारटूस मलाबारीकुस’, टेक्सॉन, क्यू बुलेटिन ही दोन महत्त्वाची जर्नलस ‘फर्नस ऑफ इंडिया’, ‘पामस ऑफ ब्रिटिश इंडिया’, ‘ऑकिडस ऑफ इंडिया’, ‘बॉटॅनिकल मॅगेझिन’, इत्यादी.

मुंबईतील विज्ञानसंस्थेच्या भव्य आणि सुसज्ज ग्रंथालयातदेखील अनेक दुर्मीळ पुस्तके उपलब्ध आहेत. ‘मसाय् इक्झोटिका’ हा १८१८ मधील सचित्र ग्रंथ. ‘एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका’ २४ भाग, सी.एस.आय.आर.चे ‘वेल्थ ऑफ इंडिया’ (रॉमटेरियल्स) सर्व भाग, वर्गीकरणावरील जर्मन भाषेतील अ‍ॅगलर व प्राँक्टलचे ग्रंथ, ‘एनसायक्लोपीडिया ऑफ गार्डिनग’, ‘फॉरेस्ट फ्लोरा ऑफ बॉबे प्रेसिडन्सी अ‍ॅण्ड सिंध’, ब्लू ए. टॉल्बट, इंडेक्स क्यूएंसीस,  इंडेक्स लंडनेंसिस इत्यादी.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेच्या ग्रंथालयात नॅचरल हिस्ट्रीवरील मोठे ग्रंथ आहेत. ‘फ्लोरा ऑफ इंडिया’, ‘फ्लोरा ऑफ महाराष्ट्र स्टेट’, द्विबीजपत्री वनस्पती, फ्लोरा ऑफ संजय गांधी नॅशनल पार्क- बोरिवली, मुंबई, ‘दि सिव्ही कल्चर ऑफ इंडियन ट्रीज’ इत्यादी. अनेक राज्यांचे जनरल्स  प्लोरा याचप्रमाणे वनस्पतींवरील शोधप्रबंध, संस्थेच्या  १८८६ पासूनच्या सर्व पत्रिका, सामान्यांमध्ये निसर्गप्रेम आणि अभ्यासासाठी उत्कृष्ट छायाचित्रांचे हॉर्नबिल मॅगेझिन तसेच अनेक देशांतील निसर्गावरील मॅगेझिन्सची उपलब्धता हे या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ आहे.

मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाच्या ग्रंथालयात फ्लोराज आणि इकॉलोजी या विषयांची पुस्तके आहेत. तसेच वरील विषयांतील सामान्यांना भावणारी पुस्तकेही आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे उद्यानकला, उद्यानमांडणी या विषयांवरील ग्रंथ उपलब्ध आहेत. ट्रोपिका आणि हॉर्टिकासारखे मौल्यवान ग्रंथ. वनस्पतींवरील महाराष्ट्र शासनाची दर्शनिका (वनस्पतिशास्त्र आणि औषधी वनस्पती) असे विविध साहित्य उपलब्ध आहे.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org 

 

अलेक्झांडर पुश्कीन

आधुनिक रशियन कवितेचा जनक, एकोणिसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ रशियन कवी अशी ओळख आहे मॉस्कोत १७९९ साली जन्मलेल्या अलेक्झांडर सेग्रेयेविच पुश्कीन यांची. कविता, कथा, नाटक वगरे सर्व साहित्य प्रकारांमध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या पुश्कीन यांना केवळ ३८ वर्षांचे आयुष्य लाभले. पुश्कीननी आधुनिक रशियन साहित्याचा पाया घालताना रशियन भूतकाळ आणि इतिहास तसेच लोकजीवन आणि लोकसाहित्य, तत्कालीन वर्तमान परिस्थिती यांची सांगड घालून नवा साहित्यिक पायंडा पाडला. त्यामुळेच त्यांना ‘रशियन राष्ट्रकवी’ म्हणून ओळखले जाते. शालेय जीवनातच त्यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला. क्रांतिकार्य आणि क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती असलेल्या पुश्कीननी स्वत: क्रांतिकार्यात भाग घेतला नाही, परंतु आपल्या साहित्यनिर्मितीत त्यांनी क्रांतीची आवश्यकता कथन केल्यामुळे त्यांची विदेश मंत्रालयातील नोकरी गेली. १८२५ ते १८३१ या कालखंडात त्यांनी त्यांच्या साहित्यनिर्मितीतली सर्वोत्कृष्ट समजली जाणारी ‘युजीन ओनेजिन’ ही पद्यात्मक कादंबरी लिहिली. रशियन साहित्यातील ही पहिली वास्तववादी कादंबरी. त्यांच्या सुरुवातीच्या साहित्यापकी ‘रसलान अँड लुडमिला’, ‘द जिप्सीज’, ‘द ब्राँझ हॉर्समेन’ या काव्यसंग्रहांनाही वाचकांनी दाद दिली. पुश्कीननी लिहिलेल्या नाटकांपकी ‘बोरिस गोद्युनेव्ह’ हे सर्वात अधिक प्रसिद्ध आहे. १८३० नंतर पुश्कीननी केलेली साहित्यनिर्मिती प्रामुख्याने गद्यात्मक आहे. ‘द टेल्स ऑफ बेल्किन’ हा कथासंग्रह, ‘द क्वीन ऑफ स्पेड्स’ ही दीर्घकथा आणि ‘द कॅप्टन्स डॉटर’ ही लघु कादंबरी या पुश्कीनच्या गद्यात्मक साहित्यकृती विख्यात झाल्या. ‘सवरेमेग्निक’ या नावाचं पुरोगामी विचारप्रणालीचं नियतकालिकही त्यांनी प्रसिद्ध केलं. एकोणिसाव्या शतकातील पुश्कीनच्या काळातील शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसाची हलाखीची परिस्थिती आणि तिला कारणीभूत असलेल्या झार राजवटीविरुद्ध १८२६ डिसेंबरात झालेला उठाव यांचे पुश्कीन साक्षीदार होते. या सर्व घटनांचं सखोल चित्रण पुश्कीनच्या साहित्यात झालंय. टॉलस्टॉय, चेकॉव्ह यांच्यासारख्या श्रेष्ठ साहित्यिकांनाही पुश्कीनच्या साहित्याने मोहिनी घातली. पत्नीच्या प्रियकराशी झालेल्या द्वंद्वयुद्धात जखमी होऊन १८३७ साली पुश्कीन मरण पावले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com