प्राणी जगतामध्ये अतिशय साधी शरीररचना असलेल्या आणि म्हणून तुलनेने अप्रगत असणाऱ्या जीवांमध्ये प्रकाशाचे असणे-नसणे वा त्याच्या प्रखरतेचे आकलन होत असले तरी रंग, आकार, मिती, हालचाली व अभिव्यक्ती अशा प्रकाशीय संकेतांशी निगडित गोष्टींचे ज्ञान त्यांना होत नसल्याने संदेशनासाठी ते प्रकाशीय संकेत प्रभावीपणे वापरू शकत नाहीत. गांडुळासारख्या निशाचर व नेत्रविहीन प्राण्यांनाही रात्र पडल्याचे समजते. काही विकसित अपृष्ठवंशीय (ऑक्टोपस, सेपिया यांसारखे) व सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये नेत्र उत्क्रांत झालेले असतात व ते भवतालची दृश्ये कृष्णधवल ते विविधरंगी स्वरूपात पाहू शकतात.

काजवे जैवप्रदीप्तीकर असून प्रकाशित असण्या/नसण्याच्या कालावधीवर व वारंवारतेवर त्यांच्या प्रजाती ओळखता येतात. या गुणधर्माचा वापर करून ते प्रजननासाठी जोडीदार शोधतात. त्यांच्या एका प्रजातीची मादी विजातीय माद्यांच्या प्रकाशीय संकेतांची नक्कल करून भिन्न प्रजातीच्या नरांना आकृष्ट करून त्यांना ठार करतात, ज्यामुळे स्पर्धा कमी होते. अनेक पतंग (मॉथ) व फुलपाखरे तसेच त्यांच्या अळ्या पंखांवर वा शरीरावर असणारे वर्तुळाकार गडद ठिपके आकस्मिक रीतीने- उघडणाऱ्या डोळ्यांसारखे- शत्रूसमोर आणून त्यांना दचकवतात. अनेक माश्या डंख करणाऱ्या गांधिल माशी किंवा मधमाशीसारखा रंग व रूप धारण करून शत्रूपासून संरक्षण मिळवतात.

अनेक मासे वयानुसार गटाने पोहतात. आपल्या वयाच्या गटातील मासे त्यांच्या शरीरावर असणाऱ्या हंगामी ठिपके वा चट्टे यांवरून ओळखतात. ‘हेरिंग गल’मध्ये पालक पक्ष्यांच्या चोचीवरील लाल ठिपका पिलांना त्यांच्याकडे अन्न मागण्यास प्रवृत्त करतो. अनेक मासे, पक्षी व सस्तन प्राणी आपल्या शरीरावरील विशिष्ट रंगाचे भाग स्पर्धकांना दाखवीत स्वत:च्या इलाख्याचे वा घरटय़ाचे त्यांच्यापासून रक्षण करतात. जवळपास सर्वच पक्ष्यांमध्ये नर हे माद्यांना आकृष्ट करण्यासाठी अधिक गडद रंगाचे व आकर्षक असतात.

मोर, क्रौंच, हंस यांचे नर पक्षी नृत्य करून माद्यांना आकृष्ट करतात. वानरांमध्ये नितंबावरील रंगीत चट्टे किती फुगीर, मोठे व गडद रंगाचे आहेत यावरून त्यांचा सामाजिक दर्जा ठरतो. चंदेरी पाठीच्या (सिल्व्हर बॅक) गोरिलाला गटाचे नेतृत्व मिळते. माकडे व इतर समूहाने राहणारे प्राणी इतर स्वजातीयांचे लक्ष विशिष्ट गोष्टींकडे वळवू शकतात. रंग, आकार, विस्तार यांसारखे प्रकाशीय संकेत विशिष्ट वर्तणुकीशी (बिहेव्हियर) निगडित करून त्यांची व्याप्ती वाढविली जाते, ज्यामुळे प्रकाशीय संदेशन प्राण्यांमध्ये अधिक प्रमाणात वापरले जाते.

– डॉ. पुरुषोत्तम गो. काळे 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी, मुंबई २२  office@mavipamumbai.org