23 February 2019

News Flash

सेंद्रिय कर्ब (कार्बन)

पृथ्वीतलावर आणि भूगर्भात सर्वात जास्त आणि मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य म्हणजे कर्ब (कार्बन).

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पृथ्वीतलावर आणि भूगर्भात सर्वात जास्त आणि मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य म्हणजे कर्ब (कार्बन). कर्बाचे जरी विविध प्रकार असले तरी कृषीक्षेत्रात सर्वात जास्त सहभाग असतो तो सेंद्रिय कर्बाचा. चांगल्या कुजलेल्या जैविक खतामधून  वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व मूलद्रव्ये त्यांना सहज उपलब्ध होतात आणि यामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास ६० टक्के असते. म्हणून यास सेंद्रिय कर्ब असे म्हणतात. जमिनीची सुपीकता ही सेंद्रिय कर्बाच्या मूल्याद्वारे ठरविली जाते. ज्या जमिनीमध्ये हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असते ती जमीन शेतीसाठी अयोग्य ठरते. शेतजमिनीमधील सेंद्रिय कर्ब जेव्हा चार टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असते. तेव्हा तिला सेंद्रिय जमीन अथवा सुपीक जमीन असे म्हणतात.

जैविक सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या वरच्या थरात असलेल्या जिवाणू आणि विविध कीटकांच्या माध्यमात कार्यरत असतो. हे उपयोगी जीव सेंद्रिय घटकांमध्ये असलेली सर्व मूलद्रव्ये विघटन क्रियेमधून वनस्पतींच्या मुळांना उपलब्ध करून देत असतात आणि ती मृत झाल्यावर त्यांच्या विघटनामधून ही सर्व मूलद्रव्ये पिकांना पुन्हा सहजपणे उपलब्ध होतात. सुपीक जमिनीमध्ये निसर्गाची ही निरोगी अन्नसाखळी अखंडित चालू असते. मात्र जेव्हा रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर होतो तेव्हा ही अन्नसाखळी तुटते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ लागते. शेतजमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे झपाटय़ाने कमी होत असलेले प्रमाण हा सध्या कृषीक्षेत्रासाठी संवेदनशील विषय आहे.

मातीचे भौतिक गुणधर्म, कणांची रचना, घनता, पाण्याचे शोषण, वहन तसेच मुळाभोवती हवा खेळती राहण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण नेहमीच प्रमाणात असावे लागते, म्हणूनच शेतीमध्ये शेणखत, कम्पोस्ट, गांडूळ खत, हरित खते, जिवाणू खते यांचा नियमित वापर हवा, शेतबांधावर वृक्षलागवडसुद्धा हवी. कृषी उत्पादन घेतल्यावर पिकांचे अवशेष त्याच शेतात परत गाडणे हे सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. शेत जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवून त्या माध्यमामधून शाश्वत शेती करण्यासाठी केंद्र व राज्यशासन शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे प्रोत्साहित करत आहेत. मातीची आरोग्य पत्रिका आणि त्यामधील सेंद्रिय कर्बाचा ठळक आकडा हा यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो.

-डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on February 8, 2018 2:20 am

Web Title: organic curb and carbon