03 December 2020

News Flash

कुतूहल – जैविक खत : स्वयंपूर्ण ‘परिसंस्था’

आपल्या खताच्या बादलीतील अन्न झुरळे, मुंग्या, डास आणि उंदीर या प्राण्यांच्या उपयोगाचे नसते

‘शून्य घनकचरा’ या संकल्पनेचा मार्ग जैविक खतनिर्मिती प्रक्रियेतून जातो असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण आपण निर्माण करीत असलेल्या कचऱ्यातील ८० टक्के कचरा जैविक आणि विघटनशील असतो, ज्याची विल्हेवाट बऱ्याच प्रमाणात आपण ‘कम्पोस्टिंग’च्या माध्यमातून लावू शकतो. अलीकडच्या काळात ‘ओल्या’ कचऱ्याचे वैयक्तिक अथवा घरगुती पातळीवर वा स्थानिक रहिवाशांच्या सहभागाने सामूहिकरीत्या जैविक विघटन घडवून आणण्याचे प्रयत्न/प्रयोग ठिकठिकाणी होताना दिसतात. परंतु अशा तऱ्हेने, विशेषत: घरातल्या घरात जैविक कचऱ्याचे ‘कम्पोस्टिंग’ करण्यास सुरुवात केल्यानंतर एक-दोन महिन्यांनी आपल्या खताच्या बादलीत सजीवांचे अस्तित्व जाणवू लागते आणि मग आपण अस्वस्थ होऊ लागतो. परंतु अशा तऱ्हेची सजीव सृष्टी या खताच्या बादलीत अथवा खताच्या खड्डय़ात निर्माण होणे याचा अर्थ आपल्या घरात एक सुदृढ, जिवंत परिसंस्था जन्माला येते आहे आणि खतनिर्मिती प्रक्रिया नैसर्गिकरीत्या पार पडते आहे.

कोणत्याही परिसंस्थेप्रमाणे या परिसंस्थेतदेखील एक सशक्त अन्नसाखळी किंवा अन्नजाल तयार झालेले आढळून येते. या अन्नसाखळीत प्राथमिक उत्पादक, प्राथमिक भक्षक जीव, दुय्यम भक्षक जीव आणि अपघटन करणारे जीव (डीकॉम्पोझर) असे सजीव घटक असतात. यात सेंद्रिय पदार्थाचे जैविक प्रक्रियेद्वारे ज्वलन होऊन त्यातून मुख्यत्वे उष्णता, कर्बवायू, नायट्रेट आणि नायट्राइट तयार होतात. सेंद्रिय कचऱ्यातील कार्बन मुख्यत्वे ऊर्जा देतो. ‘कम्पोस्ट’ परिसंस्थेच्या तळाशी जैविक विघटनशील कचरा असतो. यातील सर्व जीव जैविक कचऱ्यातील विविध प्रमाणातील नत्र, फॉस्फरस, कार्बन यांचा अन्न आणि ऊर्जास्रोत म्हणून उपयोग करतात. हे घटक जीवांच्या वाढीसाठी गरजेचे असतात. विविध प्रकारचे जीवाणू, बुरशी, काही किडे किंवा अळ्या हे प्राथमिक भक्षक जीव म्हणून काम करतात. हे जीव जैविक कचऱ्याचा प्राणवायूच्या उपस्थितीत खाद्य म्हणून उपयोग करतात अथवा अपघटन करतात. प्रत्यक्ष अपघटनाची क्रिया मुख्यत्वे जीवाणू करतात.

या सर्व सजीवांचा जैविक अपघटन घडवून आणण्यात मोलाचा सहभाग असतो, त्यामुळे या आगळ्यावेगळ्या सजीव सृष्टीच्या अस्तित्वाने घाबरून न जाता, उलट आनंद मानावा. खत तयार होत असताना आद्र्रता, तापमान, खेळती हवा, सामू (स्र्ऌ) हे अजैविक घटक योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. आपल्या खताच्या बादलीतील अन्न झुरळे, मुंग्या, डास आणि उंदीर या प्राण्यांच्या उपयोगाचे नसते, त्यामुळे हे प्राणी या ‘परिसंस्थे’त कधीच आढळून येणार नाहीत.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 2:38 am

Web Title: organic fertilizer self ecosystem zws 70
Next Stories
1 मनोवेध : प्रतिमा आणि स्मरण
2 मनोवेध : आरोग्यासाठी कल्पनादर्शन
3 कुतूहल : प्लास्टिक केरपिशव्या हानिकारकच
Just Now!
X