मौल्यवान धातूंच्या गटातल्या रुथेनिअम, ऱ्होडिअम, पॅलॅडिअम आणि चांदी या चार धातूंची तर यापूर्वीच आपल्याला ओळख झालेली आहे. तेव्हा आता जरा आपण उरलेल्या चार जणांविषयी जाणून घेऊ या.

२१ जून १८०४ या दिवशी रॉयल सोसायटी, लंडन इथे एका पत्राने दोन नवीन मूलद्रव्यांचा शोध लागल्याचं कळवलं गेलं. ती मूलद्रव्यं होती इरिडिअम आणि ऑस्मिअम! अणुक्रमांक ७६ असलेल्या ऑस्मिअमला ‘ऑस्मिअम’ हे नाव दिलं गेलं, ते त्याचा शोध लागत असताना आलेल्या त्याच्या वासावरून! प्रयोग करता करता अतिशय नकोसा वाटणारा वास या मूलद्रव्याच्या एका संयुगाला आला आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव स्मिथसन टेनंट या वैज्ञानिकाला झाली. ग्रीक भाषेत, ऑस्मे म्हणजे वास.. आणि म्हणून ते मूलद्रव्य ‘ऑस्मिअम’ ठरलं!

स्मिथसन टेनंट याने यापूर्वी ‘हिरा’ म्हणेज कार्बनचंच दुसरं शुद्ध रूप आहे हे प्रयोगानिशी सिद्ध करून दाखवलं होतं. १८०३ मध्ये तर त्याने आपल्या लंडन इथल्या प्रयोगशाळेत, इरिडिअमचा शोध लावला होता आणि इरिडिअमचा शोध लागल्यावरही त्याचं मौल्यवान धातूंवरचं काम थांबलं नव्हतं. एकदा काही प्रयोग करण्यासाठी टेनंट याने प्लॅटिनमचं खनिज, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल यांच्या मिश्रणात (या मिश्रणाला ‘आम्लराज’ म्हणजेच ‘अ‍ॅक्वेजिया’ असं म्हणतात) विरघळवलं. तेव्हा काही रासायनिक अभिक्रिया होऊन, धातुसदृश काळ्या रंगाची पावडर तयार झाली. याही आधी इतर अनेक वैज्ञानिकांना असाच प्रयोग करताना, अशीच काळी पावडर मिळाली होती, पण त्यांना ती पावडर म्हणजे ‘ग्रॅफाइट’ (शुद्ध कार्बनचं आणखी एक रूप) आहे असं वाटलं होतं. पण कार्बनच्या शुद्ध रूपांवर टेनंटने बरंच संशोधन केलं होतं. तेव्हा आता मिळालेली काळी पावडर म्हणजे ‘ग्रॅफाइट’ नाही हे त्याच्यातल्या संशोधकाने अगदी अचूक जाणलं होतं.

या काळ्या पावडरमध्ये त्याने सोडिअम हायड्रॉक्साइड या अल्कलीचं द्रावण घातलं, ते मिश्रण चांगलं तापवलं आणि ते अल्कली स्वरूपात असलेलं द्रावण गाळून त्याच्या अवक्षेपापासून  वेगळं केलं. नंतर उरलेल्या अवक्षेपात हायड्रोक्लोरिक आम्ल घातलं. तेव्हा आधीच्या अल्कली स्वरूपात असलेल्या द्रावणात त्याला ‘ऑस्मिअम’ आढळलं. या द्रावणाला खूप घाणेरडा वास येत होता, त्यावरूनच तर ‘ऑस्मिअम’चं नामकरण करण्यात आलं. नंतर अवक्षेपात आम्ल घातल्यावर तयार झालेल्या द्रावणात त्याला ‘इरिडिअम’ मिळालं.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org