News Flash

कुतूहल – सर्वाधिक घनता असलेला धातू

ऑस्मिअमच्या अनेक विशिष्ट गुणधर्मामुळे त्याचे बऱ्याच क्षेत्रांत अनेकविध उपयोग आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अणुक्रमांक ७६ असलेल्या ‘ऑस्मिअम’ या धातूचा अणुभार आहे १९० एएमयू! ऑस्मिअम हा प्लॅटिनमच्या गटातला एक सदस्य आहे. निळसर पांढऱ्या रंगाचा हा धातू कठीण आहे, पण तेवढाच ठिसूळही! सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर कोणत्याही धातूपेक्षा ‘ऑस्मिअम’ची घनता सर्वात जास्त आहे.

ऑस्मिअमच्या अनेक विशिष्ट गुणधर्मामुळे त्याचे बऱ्याच क्षेत्रांत अनेकविध उपयोग आहेत. पूर्वी म्हणजे साधारणपणे १८९८ साली ओउर वेल्सबॅक या ऑस्ट्रियन रसायनतज्ज्ञाने ऑस्मिअमची तार वापरून दिवा तयार केला होता. १९०२ सालापर्यंत तर त्याने अशा दिव्यांचं व्यावसायिक उत्पादन सुरू केलं. पण त्यानंतर काही वर्षांतच ‘टंगस्टन’ या धातूचा शोध लागला. एकतर सगळ्या धातूंमध्ये ‘टंगस्टन’ हा धातू सर्वात उच्च तापमानाला वितळतो आणि ‘टंगस्टन’चा दिवा जास्त प्रखर प्रकाश देतो, हे समजल्यामुळे ऑस्मिअमचे दिवे मागे पडले आणि टंगस्टनचेच दिवे मोठय़ा प्रमाणात वापरले जाऊ लागले.

त्यामुळे दिव्यांमध्ये नाही पण इतर अनेक गोष्टींमध्ये ऑस्मिअमचा वापर होऊ लागला. फोनोग्राफच्या सुया किंवा विद्युत उपकरणांचे संपर्क-िबदू यांसाठी ऑस्मिअम वापरलं जातं, परंतु ते शुद्ध स्वरूपात नाही. मात्र ऑस्मिअमची घनता अतिशय जास्त असल्यामुळे, बहुतेक वेळा मौल्यवान धातूंच्या गटातल्या दुसऱ्या एखाद्या धातूबरोबरच ऑस्मिअमचं संमिश्र हे अशा गोष्टींसाठी वापरलं जातं. बऱ्याच उत्तम दर्जाच्या फाऊंटन पेनांचं निब, इरिडिअम आणि ऑस्मिअम यांच्या संमिश्रापासून तयार केलेलं असतं. पेसमेकर्स किंवा हृदयात बसवल्या जाणाऱ्या कृत्रिम झडपा अशा काही अति महत्त्वाच्या वैद्यकीय वस्तू ९० टक्के प्लॅटिनम आणि १० टक्के ऑस्मिअम या प्रमाणातल्या संमिश्राच्या केलेल्या असतात.

ऑस्मिअमचं टेट्रॉक्साइड हे काहीसं स्पंजसारख्या स्वरूपाचं असतं. त्यामुळे बोटांचे ठसे मिळवण्यासाठी त्याचा खूप मोठा वापर होतो. शिवाय सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करण्यासाठी काही प्रकारच्या ऊतींच्या स्लाइड्स तयार करण्यासाठी ऑस्मिअमच्या संयुगाचा उपयोग होतो.

अगदी अलीकडे म्हणजे साधारणपणे २०११च्या सुमारास ऑस्मिअमच्या काही संयुगांमध्ये कर्करोग-रोधक गुणधर्म असल्याचं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं आहे. त्यावर अधिक संशोधन चालू आहे आणि नजीकच्या भविष्यात ऑस्मिअमपासून कर्करोगावर गुणकारी असं एखादं औषध उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:41 am

Web Title: osmium chemical element article 2
Next Stories
1 जे आले ते रमले.. : वेरियर एल्विन- एक महान भारतीय (2)
2 ऑस्मिअम-१
3 वेरियर एल्विन (१)
Just Now!
X