इटलीत जन्मलेला पाओलो एवीटेबिल हा शेतकऱ्याचा मुलगा प्रथम नेपोलियनच्या इम्पिरियल आर्मीत आणि पुढे इराणच्या शहाच्या लष्करात काम करून आपले नशीब अजमावण्यासाठी पूर्वेकडे लाहोरच्या शीख साम्राज्याचे अधिपती महाराजा रणजीतसिंग यांच्या प्रशासकीय सेवेत दाखल झाला. पाओलोच्या हरहुन्नरी स्वभावाने महाराजा प्रभावित झाले आणि पाओलोची नियुक्ती महाराजांच्या नवनिर्मित तोफदलात झाली. त्याची कार्यक्षमता पाहून महाराजांनी त्याची, तोफांचे लोखंडी भाग ओतण्याच्या फाऊंड्रीच्या आणि शस्त्रागाराचे प्रमुख या पदांवर नियुक्ती केली.

फाऊंड्री आणि शस्त्रागार प्रमुख म्हणून पाओलेने तीन वर्षे जबाबदारी चोख सांभाळताना स्थानिक पंजाबी लोकांना या कामात चांगले शिक्षण देऊन तो स्वत: या कामातून वेगळा झाला आणि पंजाबच्या प्रशासकीय सेवेत आला. महाराजांनी त्याला १८२९ मध्ये वझिराबादचा गव्हर्नर नेमून त्या परगण्याची सर्व सूत्रे त्याच्याकडे सोपवली. गव्हर्नर म्हणून पाओलोच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत त्याने अत्यंत चोख प्रशासन देऊन वझीराबादचा महसूल वाढवला. तत्पूर्वी तिथे कराची वसुली वस्तूंच्या स्वरूपात केली जाई. पाओलोने फक्त चांदीच्या नाण्यात करवसुली सुरू केली.

१८३५ साली हरिसिंग नलवाच्या मृत्यूनंतर महाराजांनी पाओलोला पेशावरचा ‘करदार’ म्हणजे गव्हर्नर या पदावर नेमले. त्या काळात पेशावरातली सामाजिक परिस्थिती अत्यंत अस्थिर होती. पेशावरातील संख्येने आधिक्य असलेले पश्तून मुस्लीम आणि राज्यकत्रे यांच्यात वरच्या वर चकमकी झडत, तसेच चोऱ्या, मारामाऱ्या, अफवा पसरवणे याला उधाण आले होते. पाओलोने या बाबतीत अत्यंत कठोर कारवाई सुरू केली. गावाच्या बाहेर खांब (वधस्तंभ) उभारून अशा गुन्हेगारांना फासावर लटकवणे, लहान गुन्ह्य़ांसाठी जीभ, कान, हात, नाक तोडून शहरातून धिंड काढणे अशा कडक शिक्षा सुरू करून वचक बसवला. यामुळे अगदी वर्षभरात गुन्हेगारी, दंगे बंद होऊन शांतता निर्माण झाली. त्याच्या या कार्यपद्धतीने पाओलोची गुन्हेगारांना दहशत बसून सर्वसामान्य जनता निश्चिंत झाली. त्याचा गुन्हेगारांनी एवढा धसका घेतला की, त्याला ‘अबू तबेला’ असे नाव पडले. १८५० साली पाओलो एवीटेबिलचा मृत्यू झाला.

sunitpotnis@rediffmail.com