पॅरिस शहराला सध्याची ‘सा रम्या नगरी’ बनविण्यात तेथील दहाव्या शतकापासूनच्या राज्यकर्त्यांचा मोठा हातभार लागलाय! त्यापकी फिलिप ऑगस्टस, लुई आठवा आणि लुई नववा यांनी इ.स. ११८० ते १२७० या काळात सेंट चॅपेल, सेंट डेनिस, नोत्रदामसारख्या धार्मिक वास्तू आणि लुव्र पॅलेससारखे प्रासाद निर्माण केले. पुढे सोळाव्या, सतराव्या शतकात फ्रान्सिस, लुई तेरावा आणि लुई चौदावा यांनी व्हर्साय पॅलेस, ऑपेरा गाíनयरसारख्या देखण्या वास्तूंची निर्मिती करून पॅरिसच्या सौंदर्यात भर टाकली आहे. त्याचप्रमााणे आयतोल, प्लेस द व्होगास, प्लेस द ला काँकार्डसारख्या विस्तृत, शोभिवंत चौकांचीही निर्मिती झाली. बारा रस्ते सुरू होतात त्या आयतोल चौकाच्या पश्चिमेस शाम्स एलिसी ही धनिक लोकांची वस्ती निर्माण झाली आणि पूर्वेस सेंट अँटोनी ही गरीब आणि निर्वासितांची वस्ती बनली. लोकसंख्यावाढ झाल्यावर पॅरिसचे रस्ते अरुंद पडू लागले, वस्ती नियोजनबद्ध नसल्याने शहरात गर्दी, गोंगाट आणि घुसमट वाढली. नेपोलियन तृतीय (कारकीर्द १८५२ ते १८७०) याने या समस्येची दखल घेऊन त्याचा प्रशासक जॉर्ज हॉसमन याच्यावर पॅरिस स्वच्छ, सुंदर करण्याची जबाबदारी टाकली. हॉसमनने गलिच्छ वस्त्यांचे नवीन जागांवर पुनर्वसन करून रस्ते रुंद केले, सांडपाण्याची बंद गटारे बांधून चौकांमध्ये लहान बागा तयार केल्या. घरे बांधण्यासाठी नगर रचनेचे काही नियम करून शहरात पाणी, ताजी हवा आणि सूर्यप्रकाश यांचा मुबलक पुरवठा केला. सध्याचे सुंदर, आखीव रेखीव पॅरिस ही नेपोलियन तृतीय आणि हॉसमनचीच देणगी आहे. सध्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी पॅरिस शहराचे २० विभाग केलेले आहेत. यांना ‘अ‍ॅराँडिसमेंट’ म्हणतात. अ‍ॅराँडिसमेंटमधील नागरिकांकडून एक मंडळ म्हणजे कौन्सिल निवडले जाते. या कौन्सिलमधून ‘अ‍ॅराँडिसमेंट मेयर’ नियुक्त केला जातो. प्रत्येक अ‍ॅराँडिसमेंटचा स्वतंत्र टाऊन हॉल असतो. २० अ‍ॅराँडिसमेंट कौन्सिलमधून पॅरिस म्युनिसिपल कौन्सिल निवडले जाते आणि २० अ‍ॅराँडिसमेंट मेयरमधून एकाची पॅरिसच्या मेयरपदी निवड होते.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

Untitled-3

औषधी कवके : गॅनोडरमा
औषधी कवके आणि कवकांचे औषधी गुणधर्म हाही तितकाच कुतूहलाचा विषय आहे. अमेरिकेत मॅडो मशरूम (अ‍ॅगॅरीकस कॅमपेस्ट्रीस) म्हणून ओळखले जाणारे कवक पौष्टिक व शक्तिवर्धक असून अस्थमा, क्षयरोग अशा असाध्य व्याधींत वापरले जाते. संपूर्ण आशिया खंडात ‘गॅनोडीरमा’ हे कवकही शरीरात प्रतिक्षमता (इम्यूनिटी) वाढविण्यासाठी वापरले जाते. गॅनोडरमा त्यूसीडम हे कवक थेट ऋषीमुनींच्या काळापासून वापरात आहे. यासाठीच या कवकास ऋषी मशरूम म्हणून संबोधले जाते. गॅनोडरमाच्या ७ जातींतील गॅनोडरमा इंडीकम हे जास्त प्रभावी औषधी कवक आहे. याचा उपयोग कॅन्सर, सोरायसिस यांसारख्या रोगात केला जातो. गॅनोडरमाच्या शक्तिवर्धक गुणधर्मामुळे आज ह्य़ा कवकापासून तयार केलेली चहा, कॉफी अशी नित्याची पेये तयार करण्यात आली आहेत. यीस्ट आणि टोरूला या कवकांचा उपयोग ताप, डोकेदुखी, रक्तीआव तसेच जखमांवरील मलम यात आढळतो. फणसोंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवकांचा उपयोग रक्तातील लोहवर्धनासाठी केला जातो हे ज्ञात आहे. फेलीनस फॅक्टोसस आणि फेलीनस मेरोली ही कवके तोंडातील त्वचेच्या व्याधीवरील एक चांगला उपाय आहे. मूत्रविकारात फेलीनस गीलवस गुणकारी आढळून आले आहे. उस्टीलॅगो मेडीस या कवकाने शुक्राचे प्रमाण वाढवता येते. रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लेनटीनस इडोसस या कवकाचा वापर होतो. राई आणि बार्ली यांच्या फुलोऱ्यात क्लॅव्हिसेप्स परप्यूरीया या कवकामुळे तपकिरी अथवा काळसर रंगाचे अरगट किंवा स्केरोशिया तयार होतात. अरगटमधील अरगोटीन या अल्कलॉइडचा स्त्रियांमधील बाळंतपणानंतरचा रक्तस्राव थांबविण्यास अतिशय चांगला उपयोग होतो. स्नफ फंगस म्हणजेच डीडाली ओपसीस फ्लॅव्हिडा या कवकाची पावडर कावीळ झालेल्या माणसास तपकिरीप्रमाणे हुंगावयास देतात. अ‍ॅण्टिबायोटिक्स म्हणून प्रसिद्ध असलेली पेनीसिलिन, ऑरीओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन इत्यादी रोगप्रतिबंधक औषधे बनविण्यात कवकांचा उपयोग व सहभाग फार मोठा आहे. काही कवकांपासून होमिओपथीसाठी लागणाऱ्या अर्काची निर्मिती केली जाते. या औषधात अर्काची मात्रा अतिशय कमी असल्याने काही विषारी कवकांचे अर्क होमिओपथीत औषध म्हणून वापरले जातात. अ‍ॅमानिटा मस्काराय, बोलिटस नायग्रिकन्स, लायकोपरडॉन बोव्हिस्टा, उस्टीलॅगो मेडीस, अ‍ॅगॅरिकस मस्कारीयससारखी विषारी कवके होमिओपथीमध्ये महत्त्वाची म्हणून गणली जातात.
– प्रा. सुरेखा सारंगधर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org