16 January 2019

News Flash

जे आले ते रमले.. : भारतात पारशी : दुधात साखर!

सिंधमधून दीव आणि नंतर गुजरातच्या किनारपट्टीवरील संजाण येथे आले.

पारशी समाज

झोराष्ट्रियन हा प्रमुख धर्म असलेल्या इराणवर आपला अंमल बसवून अरब मुस्लीम आक्रमकांनी तिथे सक्तीचा इस्लाम धर्मप्रसार सुरू केला. त्यांनी हे करताना इराणी लोकांचा छळ आणि कत्तलीही सुरू केल्या. या जाचाला कंटाळून काही इराणी लोकांच्या गटाने इराणच्या ईशान्य भागातील खोरासान या प्रांतातून पलायन केले आणि ते प्रथम सिंधमध्ये राहू लागले. पुढे सिंधमधून दीव आणि नंतर गुजरातच्या किनारपट्टीवरील संजाण येथे आले.

संजाण येथे आठव्या शतकात इराणमधून प्रथम पलायन करून आलेल्या या लोकांनी त्या प्रदेशातल्या राजाचा आश्रय कसा मिळवला याबाबतचा एक किस्सा सांगितला जातो. दीवहून निघालेल्या या लोकांनी आपल्या होडय़ा एका ठिकाणी किनाऱ्यावर थांबवल्या आणि आश्रय मागण्यासाठी त्यांचे प्रमुख लोक स्थानिक राजाकडे गेले. तिथला राजा जदीराणा याने या लोकांना प्रथम आश्रय नाकारला; परंतु त्यांनी पुन:पुन्हा विनंती केली, त्या वेळी त्यांचे शिष्टाचारयुक्त संभाषण ऐकून जदीराणाने काही अटींवर त्यांना आश्रय देण्याचे कबूल केले.

जदीराणाने या लोकांना घातलेल्या चार अटी अशा- (१) या इराणी लोकांनी स्थानिक गुजराती भाषा व लिपी आत्मसात करून त्यातच सर्व व्यवहार करावेत, (२) गुजराती स्थानिक स्त्रियांच्या पद्धतीने इराणी स्त्रियांनीही साडीचा पेहराव करावा, (३) कुठल्याही प्रकारचे शस्त्र जवळ बाळगू नये, (४) विवाह समारंभ फक्त संध्याकाळीच करावेत. या सर्व अटी पाळण्याचे आश्वासन इराणी स्थलांतरितांच्या प्रमुखाने दिल्यावर जदीराणाने त्या प्रमुखाला चांदीच्या प्याल्यात वपर्यंत दूध भरून दिले. दूध दिले याचा अर्थ जदीराणाने त्या लोकांना त्या प्रदेशात वसाहत करून स्थायिक होण्यास परवानगी दिली. इराण्यांच्या म्होरक्याने त्या दुधात साखर मिसळली. साखर मिसळताना प्यालातले दूध सांडू न देण्याची खबरदारी घेऊन त्याने त्या प्याल्यातले निम्मे गोड दूध, राजा जदीराणास देऊन उरलेले स्वत: प्राशन केले. ‘दुधात मिसळलेल्या साखरेसारखे आम्ही या भूमीवर सलोख्याने, गुण्यागोविंदाने राहू!’ हे आश्वासन पारशी प्रमुखाने दिल्याचा किस्सा आजही सांगितला जातो.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on January 31, 2018 2:04 am

Web Title: parsi in india iran