News Flash

सेकंदाचे अचूक मोजमाप

ज्या नैसर्गिक घटनांना ठरावीक वेळ लागतो, अशा घटनांचा आधार घेऊन काळाची एकके विकसित होत गेली.

 

एक ऋतुचक्र पूर्ण होते तो काळ म्हणजे एक वर्ष, आणि सूर्य पुन्हा उगवेपर्यंतचा काळ म्हणजे एक दिवस, ही नैसर्गिक वारंवारता आदिमानवालाही परिचित असावी. समाजजीवन जसजसे अधिक प्रगल्भ होत गेले, तसे रोजच्या व्यवहारासाठी वेळ ठरवणे व ती इतरांना कळवणे किती महत्त्वाचे आहे हेदेखील त्याला कळले असणार. ज्या नैसर्गिक घटनांना ठरावीक वेळ लागतो, अशा घटनांचा आधार घेऊन काळाची एकके विकसित होत गेली. ठरावीक वेळात बुडणारी घटिकापात्रे, आतील वाळू रिकामी करणारी वालुकायंत्रे, सावलीवरून वेळ दर्शवणारी सूर्यघडय़ाळे, आणि पुढे लंबकावर चालणारी यांत्रिक घडय़ाळे असा कालमापनाचा प्रवास होत गेला.

सेकंद या एककाची सुरुवात सोळाव्या शतकात, एका ठरावीक लांबीच्या लंबकाचा दोलन-कालावधी अशा संकल्पनेतून झाली. ‘सेकंद-दोलक’ (seconds pendulum) या नावाचे, २ सेकंद दोलनकाल असलेले दोलक त्या काळी प्रचलित होते. घडय़ाळे बनविणाऱ्या दोन कारागिरांनी या सेकंदाची अचूकता टिकवून धरण्यात सिंहाचा वाटा उचलला.

पण लंबकाचा दोलनकाल हा त्या त्या ठिकाणच्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतो, त्यामुळे कोणतेही एक उपकरण सेकंदाच्या व्याख्येसाठी पुरेसे नाही. अगदी १९६० पर्यंत, पृथ्वीचे परिवलन हा मापदंड धरून सेकंदाची व्याख्या ‘सरासरी दिवसाचा ८६४०० वा भाग’ अशी केली जात होती. याच सुमारास शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की, पृथ्वीचे परिवलनाची वारंवारता पूर्वी वाटली होती तेवढी अचूक नाही. सेकंदाची व्याख्या मग इसवी सन १९०० या वर्षांच्या   १/३, १५, ५६, ९२५.९७४७ वा भाग अशी केली गेली. मात्र हे अर्थातच फारसे समाधानकारक नव्हते. सेकंदाचे मापन तर अधिक स्थिर आणि अचूक व्हायला हवे.  यासाठी अणुभौतिकशास्त्राचा अभ्यास कामी आला. गतिशून्य अवस्थेत असलेल्या सिझिअमच्या, १३३ इतका वस्तुमानांक असणाऱ्या अणूच्या केंद्रात (सिझिअम-१३३) घडणाऱ्या एका विशिष्ट क्रियेत (हायपरफाइन ट्रान्झिशन) निर्माण होणाऱ्या प्रकाशलहरींची वारंवारता अतिशय स्थिर असते. ‘सिझिअम-१३३’ या अणूतून उत्सर्जति होणाऱ्या या प्रकाशलहरींतील ९,१९,२६,३१,७७० आंदोलनांना लागणारा, पृथ्वीवरील समुद्रसपाटीवरचा कालावधी’ अशी एका सेकंदाची व्याख्या करणे यामुळे शक्य झाले. अर्थात हे मापन समुद्रसपाटीवरच करायला हवे, कारण व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार कालावधीचे हे मोजमाप गुरुत्वाकर्षणावरही अवलंबून असते. (आजही GPS प्रणालीमध्ये आपण या तत्त्वाचा उपयोग करतो.)

काळ हे अत्यंत अचूकतेने मोजता येणारे एकक आहे. आज आपण सेकंदाचे मोजमाप त्याच्या काही हजार कोटी भागाएवढय़ा अचूकतेने करू शकतो. म्हणूनच, आज जेव्हा एककांच्या व्याख्या बदलत आहेत, व इतर एककांच्या व्याख्यांसाठी वैश्विक स्थिरांक वापरले जात आहेत, तेव्हा सेकंदाची व्याख्या ही एका नैसर्गिक घटनेच्या (प्रकाशलहरींची वारंवारता) मोजमापाने ठरवली जाते आहे. लवकरच, मोजमापाने ठरवले जाणारे सेकंद हे एकमेव मूलभूत एकक असेल.

डॉ. अमोल दिघे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२  office@mavipamumbai.org

डॉ. भालचंद्र नेमाडे- कादंबरी लेखन

‘कोसला’पासून ‘हिंदू’पर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यकृतीने आणि लेखकाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक उक्तीने मराठी साहित्यविश्वात वादाचे मोहोळ उठविणारे भालचंद्र नेमाडे हे प्रखर भाषिक आत्मभान असलेले लेखक आहेत. १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘कोसला’ या कादंबरीने मराठी कादंबरीलेखनाची परिमाणेच बदलून टाकली.

‘कोसला’तले दिवस हे जवळपास माझेच त्या वेळचे दिवस आहेत,’ असे नेमाडे  यांनी म्हटले आहे. ‘कोसला’ प्रथमपुरुषी निवेदनात लिहिली आहे. त्याचा नायक पांडुरंग सांगवीकरच ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो, अशी आहे. म्हटलं तर ही स्वत:ची कहाणी आणि म्हटलं तर त्या पिढीतल्या लोकांची कहाणी आहे.’

कॉलेजचे शिक्षण घेणारा पांडुरंग सांगवीकर चित्रित करताना नेमाडे यांनी केवळ आपल्या शैक्षणिक पद्धतीतला पोकळपणा चित्रित केला असे नव्हे तर जीवनाच्या इतर अंगांतही असलेला सच्चेपणाचा अभाव त्यांनी दाखवला. नेमाडेंनी ‘कोसला’ची निर्मिती केली ती वयाच्या चोविसाव्या-पंचविसाव्या वर्षी. कादंबरीचा रूढ पारंपरिक साचा टाळून महानुभाव, संत, शाहिरी, चिपळूणकरी-फुले अशा जुन्या-नव्या शैलींचा आकर्षक वापर त्यांनी ‘कोसला’मध्ये केला आहे. निवेदनासाठी विविध तंत्रे वापरली व भाषा ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तोंडची वाटावी अशी अनौपचारिक स्वरूपात उपयोगात आणली. नवी अभिरुची निर्माण केली. ‘कोसला’ कादंबरी अत्यंत लोकप्रिय झाली. तिने केवळ मराठी मनेच भारावली नाहीत तर ‘कोसला’ची हिंदी, गुजराती, कन्नड, उर्दू, आसामी, पंजाबी, उडिया, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.

‘कोसला’नंतर १९७५ मध्ये ‘बिढार’ ही कादंबरी  प्रकाशित झाली. त्यानंतर ‘जरिला’, ‘हूल’ व ‘झूल’ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनुभवाचा भाग या कादंबऱ्यांत आला आहे. महाराष्ट्रातल्या या भागातील जीवनाचे-त्यातील भाषाविशेषासकट चित्रण आहे. हे लेखन शैक्षणिक व सामाजिक जीवनाचे अंतर्भेदी चित्रण करून वाचकांना अंतर्मुख करायला लावते. त्यांच्या मते कादंबरीने वाचकांना अस्वस्थ केले पाहिजे. शिवाय या कृतीने समाजाची इंचभर का होईना प्रगती झाली पाहिजे. या भूमिकेतूनच नेमाडे यांनी आपले कादंबरीलेखन केले.

यानंतरची त्यांची कादंबरी आहे- ‘हिंदू.’ या कादंबरीतून विविध जागतिक संस्कृती व अन्य ज्ञान विषयांच्या त्यांच्या सखोल व्यासंगाचा प्रत्यय येतो.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 1:58 am

Web Title: perfect measurement of the second
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय एककांचे मापदंड
2 ज्यूलचे प्रयोग
3 उष्णतेचे स्वरूप
Just Now!
X