07 December 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : परफेक्शन

आईबाबा जोरजोरात रागावतात, ओरडतात ही गोष्ट वेगळी, पण मुलांनी रागावलेलं, ओरडलेलं चालत नाही.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

आपलं मूल ‘क्ष’ पद्धतीने वागावं अशी प्रत्येक आईबाबांची मनापासूनची इच्छा असते. काही जण म्हणतात, ‘मुलांकडून आमच्या काहीही अपेक्षा नाहीत, फक्त त्यांनी योग्य पद्धतीने वागायला हवं’ हे ‘योग्य पद्धतीने वागणं म्हणजे नक्की काय असतं. त्यांच्यासमोर कोणत्या व्यक्ती नेहमी योग्य त्याच पद्धतीने वागत असतात?

आपली मुलं अतिशय ‘परफेक्ट’ असावीत असं प्रत्येकाला वाटतं; पण काही घरं ही फारच टोकाची असतात. त्यांना मुलांचा खोडकरपणा मुळीच सहन होत नाही. आईबाबांकडे फारसा वेळ नसतो, त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे खेळ आणून दिलेले असतात. लवकरच्या वयात कॉम्प्युटर्स हाताळायला दिले जातात आणि मोबाइल फोन तर असतोच. अधूनमधून आईबाबांच्या लक्षात येतं की, आपलं लहानगं मूल फारच वेळ मोबाइल बघत बसलंय किंवा आपलं ऐकत नाहीये किंवा अभ्यास करत नाहीये. त्या वेळेला अचानक बंदी घातली जाते किंवा अनेकदा तर आईबाबांच्या सोयीनुसार कधी परवानगी मिळते तर कधी मिळत नाही.

आईबाबांना वेळ नसतो तेव्हा जंकफूडलाही सहज परवानगी मिळते आणि वेळ असतो तेव्हा ताटभरून भाजी-कोशिंबिरी-फळं खायलाच पाहिजे, हा नियम मोडून चालत नाही!

आईबाबा जोरजोरात रागावतात, ओरडतात ही गोष्ट वेगळी, पण मुलांनी रागावलेलं, ओरडलेलं चालत नाही.

अशा फटी प्रत्येक घरात असतात. त्या मुलांना बरोबर कळतात. याचा योग्य वेळेला फायदा किंवा गैरफायदा मुलं घेत असतात.

त्यामुळेच कदाचित, जगात कोणीच परफेक्ट नसतं हे मुलांना बरोबर कळतं. मुलं कितीही लहान असली तरी व्यक्तींचं, घटनांचं विश्लेषण करण्याची क्षमता त्यांच्यात असते.

काही मुलं आईबाबांच्या बहुतांश अपेक्षा पूर्ण करतात असं दिसतं. तेव्हा त्यांची मानसिकता, विचार करण्याची पद्धत, निर्णयक्षमता, जगाकडे आणि स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन, आवडीनिवडी, इच्छा- आकांक्षा त्यांच्या आईबाबांसारख्याच किंवा त्याजवळ जाणाऱ्या असतात. मिळत्याजुळत्या असतात तेव्हा एकमेकांचे दृष्टिकोन स्वीकारायला अवघड जात नाही. परस्परांमध्ये कोणताही संघर्ष होत नाही; पण काही मुलं मिळतंजुळतं घेत नाहीत; पण याचा अर्थ ते नेहमी चुकीच्या मार्गाला लागतात असं नाही.

मुलांचा मेंदू स्वतंत्र पद्धतीने विचार करत असतो, विश्लेषण करत असतो आणि त्याप्रमाणे योग्य वाटेल असं वागत असतो.

First Published on August 14, 2019 2:15 am

Web Title: perfectionism in children zws 70
Just Now!
X