डॉ. श्रुती पानसे

आपल्या मेंदूमध्ये ‘ग्रे मॅटर’ या नावाचा एक भाग असतो. योग्य प्रकारे निर्णय घेणं हे या भागाचं मुख्य काम. ज्या माणसांचा ग्रे मॅटर हा योग्य प्रकारे काम करतो, ती माणसं अधिक नीटनेटकी, सर्व गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करणारी आणि नियोजनाप्रमाणे वेळेत कामं पार पाडणारी अशी असतात. ही माणसं केवळ काम नीट पार पाडतात असं नाही, तर यांची विचारप्रक्रिया अतिशय व्यवस्थित असते.

स्वत:चं आरोग्य, आहार, व्यायाम, आचार-विचार या सर्व बाबतींत अशी माणसं संतुलित असतात. सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे, या माणसांचं आपल्या भावनांवर योग्य प्रकारे नियंत्रण असतं. या सर्व गोष्टींमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व इतर लोकांपेक्षा वेगळं दिसतं, उठून दिसतं. या सर्व सवयींचा फायदा त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी होत असतो. आपल्या मेंदूची काळजी नीट घेतल्यामुळे आणि मेंदूतल्या ग्रे मॅटरनं त्यांना साथ दिल्यामुळे, अशा माणसांचा मेंदू हा वृद्धापकाळीसुद्धा अतिशय निरोगी असतो, कार्यरत असतो.

याउलट बोलायचं, तर जी माणसं अशा प्रकारची काळजी घेत नाहीत, चुकीचा आहार, चुकीची दिनचर्या, चुकीची जीवनशैली अंगीकारलेली असते, त्यांच्या मेंदूतली रसायनं असंतुलित होतात. अशी माणसं चिडचिडी असतात. व्यक्ती आणि प्रसंगांशी जुळवून घेऊ  शकत नाहीत. पटकन भावनांच्या आहारी जातात. स्वत:च्या आरोग्यावर आणि त्यायोगे विचारांवर परिणाम करून घेत असतात. जी माणसं नकारात्मक भावना कवटाळून बसतात, त्या माणसांच्या एकूण आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

संशोधकांच्या मते, अशांच्या मेंदूचा आकार काहीसा आखूडही होतो. चिडचिडणाऱ्या माणसांच्या हातून चुकाही जास्त घडतात. निर्णयक्षमता काहीशी कमी होते. नवीन गोष्टी शिकायला अडचणी येतात. नियोजन करताना काही चुका राहून जातात. सर्व बाजूंनी विचार करायचा असला, तरी महत्त्वाचे मुद्दे निसटून जातात; ते लक्षातच येत नाहीत किंवा विस्मरणात जातात.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी येत असतात; परंतु त्या अडचणींनी खचून जाऊन, स्वत:ला दु:खात – नैराश्यात ठेवणं यामुळे मेंदूवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन मेंदूची आणि विशेषत: आतल्या ग्रे मॅटरची काळजी सर्वानीच घ्यायला पाहिजे.

contact@shrutipanse.com