29 November 2020

News Flash

कुतूहल – बंदिवासातील प्रजननाद्वारे संवर्धन

बंदिवासातील प्रजननाद्वारे प्रजातींच्या संवर्धनाला ‘शेवटचा उपाय’ समजतात.

मानवी संस्कृतीच्या विकासाशी समांतर व समप्रमाणात नैसर्गिक अधिवास आक्रसले, विखंडित झाले. नैसर्गिक निवडीच्या विपरीत मानवी निवडीमुळे आपल्याला हव्या त्याच वनस्पती व प्राणी यांची संख्या वाढत गेली आणि इतर वन्य वनस्पती व प्राणी यांची संख्या तसेच एकंदर जैवविविधता कमी होत गेली. मानवी लोकसंख्येची अनियंत्रित वाढ आणि अत्याधिक उपभोग घेण्याच्या प्रवृत्तीमुळे नैसर्गिक संतुलन ढळून असंख्य सूक्ष्म जीव, वनस्पती व प्राणी प्रजातींवर लोप पावण्याची वेळ आली. अमर्याद अरण्यतोड, अनियंत्रित शिकार/ मासेमारी, जमिनीचा अयोग्य वापर, शहरीकरण, औद्योगिकीकरण अशा अनेकविध ताणांमुळे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नैसर्गिकपणे प्रजातींच्या लोप पावण्याच्या वेगाच्या तुलनेत सध्याचा प्रजाती विलुप्ततेचा वेग एक ते दहा हजारपट जास्त आहे.

अधिवासाबाहेरील किंवा ‘एक्स सिटू’ संवर्धनात वनस्पती/ प्राणी-संग्रहोद्याने बनवून ज्या प्रजातींचे अस्तित्व चिंताजनकरीत्या धोक्यात (क्रिटिकली एण्डेंजर्ड) आलेले असते, अशांचे बंदिवासातील प्रजनन घडवून त्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न केले जातात. बंदिवासातील प्रजननाद्वारे प्रजातींच्या संवर्धनाला ‘शेवटचा उपाय’ समजतात. या पश्चात त्यांचे मूळ अधिवासात पुन:स्थापन केले जाते किंवा त्यांना नव्याने बनविलेल्या अधिवासात सोडण्याचे यथाशक्ती प्रयत्न केले जातात.

विलोपनाचा धोका असणाऱ्या प्रजातींना अनुकूल अशी नियंत्रित परिस्थिती उपलब्ध करून त्यांना प्रजननासाठी उद्युक्त केले जाते. यात त्या प्राण्यांची वर्तणूक बदलून त्यांच्या पुढील पिढय़ा नैसर्गिक रीतीने अन्न मिळवण्यास व जीवनसंघर्षांत टिकून राहण्यास अपात्र होऊन त्यांचे संवर्धन नैसर्गिक अधिवासात किंवा नव्या अधिवासात सोडून करणे अशक्यप्राय होते.

बंदिवासात प्रजनन घडवून आणताना जनक (पेरेंट्स) किमान २० ते ३० भिन्न ठिकाणांहून मिळविले जातात, जेणेकरून त्यांच्या अनुवांशिक गुणांमध्ये वैविध्य असल्याने पुढील पिढीची जीवनसंघर्षांतील यशस्विता समाधानकारक असते. अंत:प्रजनन (इनब्रीडिंग) होऊन निर्माण झालेली प्रजा अशक्त व जनुकीय दृष्टीने एकसुरी असल्याने ते प्रजाती संवर्धनासाठी कुचकामी ठरते. परस्परांशी नातेसंबंधांचा गुणकांक (कोइफिसिएंट ऑफ रेलेटेडनेस) जेवढा कमी, तेवढी जनुकीय विविधता अधिक असल्याने विविध क्षेत्रांतील जनक जीवांचे बहि:प्रजनन (आऊटब्रीडिंग) करून अधिक जोमदार, निरोगी आणि नैसर्गिक अधिवासांतील जीवनसंघर्षांत टिकाव धरण्यास सक्षम पिढी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात.

एकंदरीत बंदिवासातील प्रजाननाद्वारे आपण विलोपनाच्या कडय़ावर पोहोचलेल्या, किंबहुना, आपणच पोहोचविलेल्या किमान काही प्रजातींचे संवर्धन करण्यात यशस्वी झालो आहोत.

– डॉ. पुरुषोत्तम गो. काळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 1:00 am

Web Title: plant and animal species conservation zws 70
Next Stories
1 मनोवेध : सकारात्मक मानसशास्त्र
2 मनोवेध : स्वीकार आणि निर्धार
3 कुतूहल : वन्यजीवांची तस्करी