पहिले प्लास्टिक १८६०च्या दशकात बनवले गेले. बिलियर्ड्स खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चेंडूंतील हस्तिदंताला पर्याय म्हणून या पदार्थाची प्रथम निर्मिती केली गेली. जॉन ह्याट या अमेरिकन संशोधकाने यासाठी कापसाच्या तंतूंतील सेल्यूलोज या पिष्टमय पदार्थाचा वापर केला. ह्याट याने प्रथम नायट्रिक आणि सल्फ्युरिक आम्लाच्या मिश्रणाशी सेल्यूलोजची प्रक्रिया करून त्याचे रूपांतर सेल्युलोज नायट्रेट या संयुगात केले. त्यानंतर या सेल्युलोज नायट्रेटला लवचीकता आणण्यासाठी त्याचे कापराबरोबर मिश्रण केले. हे मिश्रण ह्याटने त्यानंतर उच्च दाबाखाली साच्यामध्ये तापवले. या प्रक्रियेतूनच ‘सेल्युलॉइड’ या प्लास्टिकची निर्मिती झाली. जॉन ह्याटचे  हे प्लास्टिक कापूस व कापूर या नैसर्गिक पदार्थापासून बनवले होते. परंतु संपूर्णपणे कृत्रिम अशा प्लास्टिकचा शोध लागण्यास त्यानंतरची चार दशके जावी लागली.

सन १८७०च्या दशकात जर्मन संशोधक बायर याने फिनॉल या जंतुनाशकाच्या, फॉरमॅल्डिहाइड या रसायनाबरोबरच्या मिश्रणातून अत्यंत घट्ट, कशातही न विरघळणाऱ्या पदार्थाची निर्मिती होत असल्याची नोंद केली. लाकूड अधिक टिकाऊ  होण्यासाठी त्यावर थराच्या स्वरूपात वापरल्या जाणाऱ्या शेलॅक या राळेला, हा पदार्थ पर्याय ठरण्याची शक्यता होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस या पदार्थावर अमेरिकन संशोधक लिओ बेकेलँड हासुद्धा संशोधन करत होता. या पदार्थाच्या निर्मितीसाठी, त्यामागच्या अभिक्रियेचा वेग घटवण्याची आवश्यकता होती. त्यासाठी बेकेलँडने वाफेवर चालणारे, आतले तापमान व दाब नियंत्रित करता येऊ  शकणारे एक वैशिष्टय़पूर्ण हवाबंद भांडे बनवले. या भांडय़ात केलेल्या प्रक्रियेद्वारे, उच्च तापमानाला हवा तो आकार देता येईल असा एक पदार्थ निर्माण झाला. ‘बॅकेलाइट’ हे नाव दिले गेलेला हा पदार्थ म्हणजेच पहिलेवहिले कृत्रिम प्लास्टिक. बॅकेलाइटचा हा शोध १९०७ सालचा.

प्लास्टिक हा बहुवारिक (पॉलिमर) प्रकारचा पदार्थ आहे. प्लास्टिकच्या निर्मितीला सुरुवात झाल्यानंतरही दीर्घकाळापर्यंत, बहुवारिकाचे रेणू म्हणजे छोटय़ा रेणूंचे समूह असल्याचा समज होता. परंतु जर्मनीच्या हर्मान स्टॉडिंगेरने विविध रासायनिक क्रिया, विष्यंदतेचे (व्हिस्कॉसिटी) मापन, यांसारख्या विविध मार्गानी त्यांच्यावर तपशीलवार संशोधन केले. या संशोधनातून हे बहुवारिक म्हणजे छोटे रेणू एकमेकांना पुन:पुन्हा जोडून निर्माण झालेल्या लांबलचक साखळ्या असल्याचे स्पष्ट झाले. स्टॉडिंगेरला या संशोधनासाठी १९५३ सालचे नोबेल पारितोषिक दिले गेले. – डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org