हल्ली आपल्याला अनेक प्रकारच्या प्रदूषणाशी सामना करावा लागतो आहे. मुख्य म्हणजे हवा आणि पाणी प्रदूषण! शहरांमधली वाढती वाहन-वाहतूक हे  हवा प्रदूषणाचं एक महत्त्वाचं कारण आहे. कोणत्याही समस्येमागचं नेमकं कारण माहीत झालं की त्यावर उपाय करता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहनं चालण्यासाठी इंधनाचं ज्वलन होतं. बऱ्याचदा इंधनाच्या काही भागांचं पूर्ण ज्वलन होत नाही. अशा अपूर्ण ज्वलनापायी, प्रदूषण निर्माण करणारे काही वायू, वाहनांच्या एग्झॉस्टमधून बाहेर हवेमध्ये सोडले जातात. त्यामुळे इंधनांचं पूर्ण ज्वलन होणं आवश्यक असतं. त्यासाठी ‘प्लॅटिनम’ची मोठी मदत होते. गाडय़ांच्या एग्झॉस्ट-पाइपमध्ये प्लॅटिनम वापरतात. हिऱ्यामोत्यांना कोंदण करणं.. एवढाच प्लॅटिनमचा उपयोग सहसा आपल्याला माहीत असतो. पण जगभरात, एका वर्षांत जेवढं ‘प्लॅटिनम’ वापरलं जातं, त्यातलं ५० टक्क्यांहून अधिक प्लॅटिनम हे गाडय़ांच्या एग्झॉस्टमध्ये वापरतात.

प्लॅटिनम हा एक उत्तम ‘उत्प्रेरक’ आहे. गाडय़ांच्या एग्झॉस्ट-पाइपमध्ये, प्लॅटिनम इंधनांचं पूर्ण ज्वलन घडवून आणतो आणि हवेचं प्रदूषण रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचप्रमाणे पेट्रोरसायनांच्या उद्योगातही ‘उत्प्रेरक’ म्हणून प्लॅटिनमचाच वापर केला जातो, ज्यामुळे इंधनाची खूप बचत होते. शिवाय हल्ली हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याचं तंत्रज्ञान विकसित होत आहे; त्यातही उत्प्रेरक म्हणून प्लॅटिनमचा मोठा हातभार आहे. प्लॅटिनम उत्प्रेरक म्हणून कसा काम करतो, त्याचा सविस्तर अभ्यास मांडणाऱ्या, गेऱ्हार्द इर्तल या वैज्ञानिकाला २००७ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला.

उत्प्रेरक म्हणून प्लॅटिनमचं ‘प्लॅटिनम ब्लॅक’ हे रूप वापरलं जातं. ‘प्लॅटिनम ब्लॅक’ म्हणजे ‘प्लॅटिनम’ धातूची काळ्या रंगाची बारीक पूड! ‘पूड’ स्वरूपातले ‘प्लॅटिनम’चेकण रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी गरजेचे असतात.

शिवाय ‘प्लॅटिनम’च्या रासायनिक उदासीनतेमुळे तसेच गंजरोधक गुणधर्मामुळे तारा, प्रयोगशाळेतली उपकरणं, वैद्यकीय उपकरणं अशा अनेक गोष्टी तयार करण्यासाठी ‘प्लॅटिनम’ आणि त्याच्या कुटुंबातल्या इतर मूलद्रव्यांची संमिश्रं वापरली जातात. शिवाय दंतवैद्यक, विद्युत अपघटन, कायमस्वरूपी चुंबकं अशाही काही गोष्टी तयार करण्यासाठी प्लॅटिनमची संमिश्रं उपयोगी पडतात. शिवाय त्याच्या चकचकीत चंदेरी देखण्या रूपामुळे आणि त्याची बारीक तार किंवा पातळ पत्रा करता येत असल्यामुळे दागदागिन्यांच्या क्षेत्रात तर त्याला मोठा मान आहे.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Platinum black
First published on: 21-09-2018 at 00:04 IST