पृथ्वीवरच्या मूलद्रव्यांमध्ये ४४व्या क्रमांकावर असलेलं रुथेनिअम! हे मूलद्रव्य तसं देखणं, चकचकीत पांढऱ्या शुभ्र रंगाचं! प्लॅटिनम या मौल्यवान धातूच्या गटातलं!

या मूलद्रव्याचा शोध एकदा नाही, दोनदा नाही तर चक्क तीनदा लागला. १८०८ साली दक्षिण अमेरिकेत, प्लॅटिनम या मूलद्रव्यावर संशोधन करणाऱ्या, स्नियाडेक्की या वैज्ञानिकाला प्लॅटिनमच्या खनिजामध्ये अगदी थोडय़ा प्रमाणात हे नवीन मूलद्रव्य आढळलं. त्याने नवीन मूलद्रव्य आढळल्याचं जाहीर करत, त्याचं ‘व्हेस्टीअम’ असं नामकरणही केलं. त्यानंतर अनेक वैज्ञानिकांनी प्लॅटिनमच्या खनिजामध्ये ‘व्हेस्टीअम’ शोधण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. स्वत: स्नियाडेक्कीलाही परत ते मूलद्रव्य मिळवता आलं नाही आणि शेवटी त्याने नवीन मूलद्रव्य शोधल्याचा दावा मागे घेतला.

या घटनेनंतर साधारण वीस वर्षांनी, ओसान या रशियन वैज्ञानिकाला, पुन्हा एकदा अणुक्रमांक ४४ या मूलद्रव्याच्या अस्तित्वाची कुणकुण लागली. त्याने तसं घोषितही केलं. पण इतिहासाची पुनरावृत्ती झाली. इतर संशोधकांनाही हे मूलद्रव्य परत मिळू शकलं नाही आणि त्यामुळे या शोधाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

अखेरीस कार्ल क्लोस या रशियन वैज्ञानिकाला, प्लॅटिनमच्या खनिजावर काम करताना परत हे मूलद्रव्य आढळलं. त्याने यशस्वीरीत्या ते खनिजापासून वेगळं केलं आणि ते नवीन मूलद्रव्य असल्याचं प्रयोगांती सिद्धही केलं. प्राचीन काळी रशियाचं नाव ‘रुथेनिया’ असं होतं. तेव्हा देशाभिमानी कार्लने या नवीन मूलद्रव्याचं नाव ‘रुथेनिअम’ असं ठेवलं. अशा प्रकारे इजा-बिजा-तिजा झाला! ‘रुथेनिअम’ मूलद्रव्य पहिल्या दोन वैज्ञानिकांना नुसतं दर्शन देऊन गेलं आणि तिसऱ्या वेळेला मात्र कार्लने या मूलद्रव्याला प्रगट व्हायला भाग पाडलं.

पण या सगळ्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर रुथेनिअम हे प्लॅटिनमच्या कुटुंबातल! त्याचे सगळे गुणधर्म प्लॅटिनमशी मिळते-जुळते असल्यामुळे त्याला प्लॅटिनमच्या खनिजापासून वेगळं करणं खूप जिकिरीचं काम असतं. त्यामुळेच तर पहिल्या दोन वैज्ञानिकांना रुथेनिअमच्या अस्तित्वाची झलक दिसूनही ते परत मिळवू शकले नाहीत.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org