23 September 2020

News Flash

कुतूहल- प्लुटोनिअम

नेप्च्युनिअमनंतर येणाऱ्या या मूलद्रव्याला प्लुटो ग्रहावरून प्ल्युटोनिअम म्हटले गेले.

प्लुटोनिअम

प्लुटोनिअमचं नाव घेतलं की डोळ्यासमोर १९४५चे नागासाकीवरच्या ‘मशरूम क्लाऊड’चे चित्र उभे राहाते. १० सेंटिमीटर व्यास असलेल्या आठ किलो फॅटमॅन नामक बाँबच्या विध्वंसक शक्तीची प्रचीती जगाला (नागासाकी शहराला) ९ ऑगस्ट १९४५ या दिवशी आली. या बाँबचा गाभा प्लुटोनिअम होता. प्लुटोनिअमचा शोध १९४० साली ग्लेन सीबोर्ग, जोसेफ केनेडी, एडविन मॅकमिलन आणि आर्थर वाही यांनी लावला. १९५१ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन ग्लेन सीबोर्ग यांना गौरविण्यात आले. युरेनिअमवर डय़ुटेरिअमचा मारा करून पहिले नेप्च्युनिअम व त्यातून बीटा कण बाहेर पडल्यावर प्ल्युटोनिअम तयार झाला. नेप्च्युनिअमनंतर येणाऱ्या या मूलद्रव्याला प्लुटो ग्रहावरून प्ल्युटोनिअम म्हटले गेले. १९४० साली तयार झालेल्या या प्लुटोनिअमची मात्रा ही एक मायक्रोग्रॅमपेक्षाही कमी होती. १९४२ मध्ये मात्र ही मात्रा जवळपास एक मायक्रोग्रॅम इतकी झाली. १९४५ पर्यंत बाँब तयार करण्याइतका प्लुटोनिअम साठवून ठेवला होता, पण या धातूच्या शोधाची अधिकृत माहिती जगाला १९४८ साली देण्यात आली.

प्ल्युटोनिअम हा कृत्रिमरीत्या तयार केला गेला असला तरी कित्येक ताऱ्यांच्या जीवनचक्राच्या शेवटच्या टप्प्यात- ज्याला आपण सुपरनोव्हा एक्सप्लोजन म्हणतो- अशा ताऱ्यांच्या गाभ्यात प्ल्युटोनिअम आढळतो. राखाडी चंदेरी रंगाचा प्लुटोनिअम हवेच्या संपर्कात आल्यास गडद करडय़ा रंगाचा होतो. याचा वितलनांक ६४० अंश सेल्सिअस, तर उत्कलनांक ३२२८ अंश सेल्सिअस आहे.

प्लुटोनिअमची सहा अपरूपे आहेत. सर्व अपरूपे विविध तापमानाला आपल्या वैविध्यपूर्ण गुणधर्मासह आढळतात. कक्ष तापमानाला अतिशय ठिसूळ असणारे हे मूलद्रव्य १०० अंश सेल्सिअस तापमानाला वर्धनीय ठरते. कक्ष तापमानाला गॅलिअममिश्रित प्लुटोनिअम तशीच वर्धनीयता दर्शवितो. ठिसूळपणा कमी झाल्याने प्लुटोनिअम सहज हाताळता येतो.

किरणोत्सारी असल्याने ऱ्हास होताना प्लुटोनिअम उष्णतेच्या स्वरूपात प्रचंड प्रमाणात ऊर्जा देतो. या ऊर्जेचा वापर विद्युत ऊर्जानिर्मितीसाठी करावा, असा ग्लेन सीबोर्ग यांचा आग्रह होता. आज जगातील एकूण अणुऊर्जेच्या एकतृतीयांश ऊर्जा प्लुटोनिअमपासून मिळविली जाते. यामुळे प्लुटोनिअमने लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. सुरुवातीच्या काळात पेसमेकरमध्ये प्लुटोनिअमचा वापर होत असे. आज त्याच्या जागी उच्च प्रतीचे विद्युत घट वापरले जातात. कॅसिनी व गॅलिलिओसारख्या अवकाश यानांमध्ये प्लुटोनिअमचा वापर ऊर्जा पुरवण्यासाठी होतो.

सुधा सोमणी 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:02 am

Web Title: plutonium element information
Next Stories
1 जे आले ते रमले.. : नृत्यांगना मासाको ओनो
2 नेपच्युनिअम
3 मदर तेरेसांच्या कार्याची व्याप्ती
Just Now!
X