News Flash

कुतूहल – पोचमपल्ली

पोचमपल्ली साडी मुख्यत्वे तेलंगण राज्याच्या भूदान, पोचमपल्ली आणि नलगोंडा या जिल्ह्य़ामध्ये तयार होते.

| August 20, 2015 03:56 am

पोचमपल्ली साडी मुख्यत्वे तेलंगण राज्याच्या भूदान, पोचमपल्ली आणि नलगोंडा या जिल्ह्य़ामध्ये तयार होते. या साडय़ांमधील भौमितिक रचना आणि रंगाईच्या वैशिष्टय़ामुळे ही साडी मान्यता पावलेली आहे. एअर इंडियाच्या हवाईसुंदरी पोचमपल्ली साडय़ा नेसूनच कामावर असतात. त्यांच्यासाठी खास नक्षीकाम केलेल्या साडय़ा तयार करून दिल्या जातात. एवढेच नव्हे तर प्रसिद्ध सिनेतारका ऐश्वर्या राय-बच्चन तिच्या लग्नात तसेच स्वागत समारंभात पोचमपल्ली साडी नेसली होती याचा उल्लेख करायला हवा.
अठराव्या शतकापासून प्रसिद्ध असलेल्या या साडय़ा पूर्ण सुती, पूर्ण रेशमी आणि सुती अधिक रेशमी मिश्र अशा तिन्ही स्वरूपांत विणल्या जातात. ताणा आणि बाणा रंगवण्यासाठी ‘टाय अँड डाय’ ही पद्धत अवलंबली जाते. या विशिष्ट पद्धतीमुळे साडीच्या नक्षीकामाला वेगळेपण येते. बहुतांश रंगाई नसíगक रंग आणि त्यांची मिश्रणे वापरून केली जाते.
तीन ते चार रंगांचा वापर करताना आलेख कागदावर नक्षी काढून मग ताण्याची आणि बाण्याची घनता ठरवली जाते. नंतर ताणा आणि बाणा रंगवला जातो. जितक्या रंगांचा वापर केला असेल तितक्या रंगानुसार बांधणी केली जाते. या पद्धतीमुळे एक वैशिष्टय़पूर्ण रंगसंगतीचा अनुभव या हाती विणलेल्या साडीत अनुभवायला मिळतो. रंगाई आणि विणाई या दोन्ही कामांमुळे दोन महिन्यांत फक्त आठच साडय़ा तयार होतात. दोन्ही बाजूंनी एकसारख्या नक्षीकामाचा वापर, साडीबरोबर दुपट्टा, स्कार्फ आणि स्टोल विणायलाही केला जातो. विणकरांची कारागिरी आणि वापरले जाणारे भरवशाचे रंग यामुळे साडीचे महत्त्व टिकून आहे.
सुमारे ८० ते १०० गावांत राहणारे विणकर पोचमपल्ली साडी विणण्यात सहभागी आहेत. त्यामुळे सुमारे १०,००० कुटुंबांचा उदरनिर्वाह या उत्पादनामुळे होतो. हातमागावर होणारे हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी विणकरांच्या सहकारी संस्था तयार करून, त्यांनी उत्पादित केलेल्या साडय़ा शासकीय महामंडळातर्फे विकण्याची व्यवस्था आता उभी करण्यात आली आहे. या साडीचे वैशिष्टय़पूर्ण स्थान बाजारात टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. याचबरोबर भारत सरकारच्या येऊ घातलेल्या हँडलूम पार्क उभारणीच्या योजनेमुळे या साडय़ांना विक्रीचा चांगला आधार मिळेल.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – साहित्य सांस्कृतिक केंद्र टोंक
राजस्थानातील टोंक येथील अमीरखान या पठाणाने स्वतचे सनिक ब्रिटिश फौजेत सामील करून १८१७ साली कंपनी सरकारच्या आशीर्वादाने टोंक या संस्थानाची स्थापना केली. त्याने ब्रिटिशांचे सार्वभौमत्व पत्करल्यावर ब्रिटिशांनी आणखी काही प्रदेश टोंक राज्यात सामील करून हे राज्य सहा परगण्यांमध्ये विभागले. अमीरखान त्याच्या मृत्यूपर्यंत ब्रिटिशांचा मित्र आणि शुभचिंतक बनून राहिला. २५५० चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या टोंक संस्थानाला १७ तोफसलामींचा मान मिळाला होता.
अमीरखाननंतर त्याचा मुलगा वजीरखान याची कारकीर्द इ.स. १८३४ ते १८६४ अशी झाली. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात याने ब्रिटिशांनाच मदत केल्यामुळे ब्रिटिशांनी काही प्रदेश इनाम दिला. त्यानंतर मोगल सत्तेचा अस्त सुरू झाल्यावर अनेक साहित्यिक, संगीतकार, कलाकार दिल्लीतून बाहेर पडले. त्या बहुतेकांना वजीरने आश्रय दिला. अनेक कलाकार, विद्वान, बादशाहचे नातेवाईक टोंक संस्थानात स्थायिक होऊन टोंक हे साहित्य, संस्कृती आणि कला यांचे प्रमुख केंद्र झाले.
टोंकचा प्रत्येक नवाब उच्चशिक्षित होता. इथल्या संपन्न वाचनालयात मुस्लीम साहित्यातील उच्च दर्जाची पुस्तके, मध्ययुगीन जुन्या कुराणाची प्रत होती. टोंक शहरात उर्दू शिक्षणाचे केंद्र होते. देशभरातून इस्लामचे अभ्यासक, विद्वान येथे वसतीला येत.
टोंकमधल्या इमारतींचे स्थापत्य, लोकांचा पेहेराव यावर मोगल संस्कृतीची छाप पडली होती. या राज्याचे अर्थकारण प्रामुख्याने कापूस आणि अफू यांच्या उत्पादन आणि निर्यातीवर अवलंबून होते. वजीरखानाच्या काळात स्वातंत्र्यसमराच्या धामधुमीत सेनापती तात्या टोपे यांनी टोंकवर हल्ला करून शाही खजिन्याची लूट केली होती.
स्वातंत्र्योत्तर काळात, इंदिरा गांधींनी सत्ता हाती घेतल्यानंतर संस्थानिकांचे तनखे (प्रिव्ही पर्स) बंद केल्यामुळे, तत्कालीन नामधारी नवाब हाफीज महम्मद याला प्रचंड मोठे कुटुंब पोसावे लागल्याने त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 3:56 am

Web Title: pochampalli sarees
टॅग : Navneet
Next Stories
1 कुतूहल – कांजीवरम साडी
2 कुतूहल – बनारसी साडी / शालू
3 भारतातील वस्त्रविविधता
Just Now!
X