पोलोनिअम या मूलद्रव्याशी दोन महान संशोधकांचं नाव कायमचं जोडलं गेलं आहे. त्यातली एक व्यक्ती आहे नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला वैज्ञानिक; जिने एकदा नव्हे तर चक्क दोन वेळा विज्ञानाच्या दोन वेगळ्या शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवलं ती मारी क्युरी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे विपरीत परिस्थितीमध्येसुद्धा जिद्दीने संशोधन करणाऱ्या मारी क्युरीला तितकीच तोलामोलाची साथ देणारा तिचा पती पियर क्युरी.

क्युरी दाम्पत्य पिचब्लेंड या युरेनियमच्या खनिजाच्या किरणोत्सारी गुणधर्माचा अभ्यास करत होतं. पिचब्लेंडपासून युरेनियम आणि थोरियम वेगळं काढल्यावर उरलेलं खनिज किरणोत्सारी असण्याची काहीच शक्यता वाटत नव्हती. पण प्रत्यक्षात घडलं मात्र उलटं. युरेनियम आणि थोरियम वेगळं काढल्यावर उरलेलं खनिज जास्त प्रमाणात किरणोत्सारी गुणधर्म दाखवायला लागलं. क्युरी दांपत्यासाठी हे एक आश्चर्य होतं. त्यांनी या खनिजावर अथकपणे प्रयोग केले आणि जुलै १८९८ मध्ये या खनिजापासून एक मूलद्रव्य वेगळं काढण्यात यश मिळवलं. हे मूलद्रव्य यापूर्वी कधीच कुणाला सापडलं नव्हतं. या नव्याने शोधल्या गेलेल्या मूलद्रव्याचं नाव मारी क्युरीने पोलंड देशाच्या नावावरून ‘पोलोनिअम’  असं ठेवलं.

पॅरिस इथे शोधल्या गेलेल्या या नव्या मूलद्रव्याचं नामकरण पोलोनिअम करण्यामागे दोन कारणं होती. पहिलं म्हणजे मारी क्युरीचा जन्म पोलंड इथे झाला होता. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, त्यावेळी पोलंड हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हतं. पोलंडवर रशिया, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरी या देशांची राजवट होती. पोलंड देशाच्या नावावरून नामकरण केलेल्या मूलद्रव्याला जगभर मान्यता मिळाली की पोलंडच्या समस्येकडे जगाचं लक्ष जाईल आणि पोलंडला स्वातंत्र्य मिळणं सोपं होईल; अशी मारी क्युरीची धारणा होती. राजकीय परिस्थितीची अशी पाश्र्वभूमी लक्षात घेऊन नामकरण केलेलं पोलोनिअम हे पहिलं मूलद्रव्य.

पोलोनिअम वेगळं काढल्यावरसुद्धा ते खनिज किरणोत्सारी गुणधर्म दाखवत होतं. आणखी पाच महिन्यांच्या संशोधनानंतर क्युरी दाम्पत्याने त्यातून आणखी एक नवीन मूलद्रव्य वेगळं केलं; त्याचं नाव रेडिअम.

किरणोत्साराविषयी केलेल्या संशोधनाबद्दल क्युरी दाम्पत्याला हेन्री बेक्वेरेलसह १९०३ साली भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं; तर १९११ साली पोलोनिअम आणि रेडिअमच्या शोधाबद्दल मारी क्युरीला रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं.

 हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org