ब्रिटिश सोमालीलॅण्ड आणि संयुक्त राष्ट्र संघटनेकडून संरक्षित सोमालीलॅण्ड यांना १ जुलै १९६० रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नियंत्रणाखाली प्रथम स्वायत्तता देऊन त्यांचे विलीनीकरण करण्यात आले. अशा प्रकारे १९६० साली ‘युनायटेड रिपब्लिक ऑफ सोमालिया’ स्थापन होऊन त्याचे राष्ट्राध्यक्षपद आदेन अब्दुल्ला उस्मान दार यांच्याकडे देण्यात आले.

पुढे १९६९ साली लष्करप्रमुख मोहम्मद सैद बेर याने उठाव करून सोमालियाची सत्ता ताब्यात घेतली आणि पुढची २१ वर्षे स्वत:स राष्ट्राध्यक्ष घोषित करून दडपशाही केली. या काळात अनेक वेळा शेजारच्या इथिओपियाबरोबर झालेल्या युद्धांमुळे हलाखीची परिस्थिती झाल्याने मोहम्मद सैद बेरचे लष्करी सरकार बरखास्त करून युनायटेड सोमाली काँग्रेसने मोहम्मद ऐदिद याच्याकडे सरकारचा कार्यभार सोपविला. पुढच्याच वर्षांत, १९९२ मध्ये पूर्व आफ्रिकेत पडलेल्या भयंकर दुष्काळाने सोमालियाच्या प्रशासनाची आणि जनतेची वाताहत होऊन, नंतरच्या सात-आठ वर्षांच्या काळात विविध गटांमध्ये माजलेल्या यादवीमुळे १९९१ ते २००० या काळात कुठल्याही सरकारशिवाय सोमालियाचा कारभार चालला होता. २००४ साली या देशात निवडणुका होऊन हंगामी सरकार स्थापन झाले.

अन्य आफ्रिकी देशांप्रमाणेच सोमालियातही स्वातंत्र्य मिळविल्यानंतरचे गृहयुद्ध अधिक प्रखर होते. मात्र, सन २०१४ पासून परिस्थिती निवळू लागली आहे. २०१७ सालच्या निवडणुकांमध्ये विजयी होऊन मोहम्मद अब्दुल्लाही फार्माजो या तिथल्या लोकप्रिय नेत्याची राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाली. सोमालियात सध्या संघराज्य प्रजासत्ताक व्यवस्था आहे.

सुमारे दीड कोटी लोकसंख्येच्या सोमालियातले ८५ टक्के लोक हे तिथल्या मूळच्या सोमाली वंशाचे आहेत आणि जवळजवळ सर्वच इस्लाम धर्मीय आहेत. त्यामुळे सोमालियाला आफ्रिकेतील सर्वाधिक सांस्कृतिक एकात्मता असलेला देश मानले जाते. केवळ एक टक्का ख्रिस्ती धर्मीय असलेल्या या देशाच्या सोमाली आणि अरबी या दोन राजभाषा आहेत. मोगादिशु हे राजधानीचे शहर येथील औद्योगिक केंद्र आहे. संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असलेला सोमालिया ‘अरब लीग’, ‘आफ्रिकन युनियन’, ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या आंतरराष्ट्रीय संघटनांचाही क्रियाशील सदस्य आहे. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com