कोंबडय़ांना प्रतिकूल हवामानापासून वाचविण्यासाठी, इतर प्राण्यांपासून संरक्षणाकरिता व रोजचे काम सुलभ होण्यासाठी घराची आवश्यकता असते. मोठय़ा कोंबडय़ांना साधारणपणे १८ ते २५ अंश सेल्सियस तापमान सुखकर असते. घरातील तापमान फार कमी किंवा जास्त झाल्यास कोंबडय़ांचे उत्पादन, वाढ यांच्यावर विपरीत परिणाम होतो.
तापमानात जे नसíगक चढउतार होतात, त्यांच्याशी जळवून घेऊन शरीराचे तापमान स्थिर ठेवण्याची क्षमता कोंबडय़ांमध्ये असते. तापमानात जास्त बदल झाल्यास त्याचा कोंबडय़ांवर प्रतिकूल परिणाम होतो. परिणामी वाढ, अंडीउत्पादन कमी होते. याशिवाय कोंबडय़ांचे त्यांच्या शत्रूंपासून म्हणजे इतर प्राण्यांपासून संरक्षण करावे लागते. कोंबडय़ा अधिक संख्येत पाळल्यास त्यांची खाद्य, पाणी इत्यादी व्यवस्था सोयीस्कर असावी लागते. धंदेवाईक कोंबडीपालनात अधिक उत्पादन हे उद्दिष्ट असल्यामुळे कोंबडय़ांना सुखकर वातावरण मिळण्यासाठी घराची गरज असते. अशा वातावरणात थंड हवामानात कोंबडय़ांना ऊब पुरवावी लागते. उष्ण हवामानात थंडावा द्यावा लागतो. घरातील आद्र्रता कमी करावी लागते. घरातील अमोनिया वायूचे प्रमाण कमी करावे लागते आणि घरात सदैव शुद्ध हवेचा पुरवठा करावा लागतो.
कोंबडय़ांची घरे बांधण्याकरिता जागा निवडणे महत्त्वाचे असते. पडिक घरांची जागा म्हणजे जमीन असावी. ती काहीशा उंच जागी किंवा उतरणीवर असावी. आसपास पाणी साचू नये. घरात ओल झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा व्हावा. आजूबाजूस सावलीची झाडे असावीत, जेणेकरून उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होईल. पिण्याचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असावे. वीजपुरवठा सहज उपलब्ध असावा. घरांच्या परिसरात हवा स्वच्छ व खेळती असावी. घराच्या जागेपासून रस्ता जवळ असावा. घरे शक्यतो बाजारपेठेला जवळ असावीत.
मोठी घरे पक्क्या बांधणीची असून यात उघडय़ा बाजूंची घरे आणि वातावरण नियंत्रित घरे असे दोन प्रकार आढळतात. बहुतेक ठिकाणी उघडय़ा बाजूंची घरे आढळतात. अशा घरांमध्ये नसíगक हवेचा भरपूर पुरवठा व्हावयास हवा.

जे देखे रवी.. –  एक दारुण हसवणूक – पाश्र्वभूमी
१९५७ साली फिरता विद्यार्थी म्हणून मी त्या काळच्या सायन हॉस्पिटलमध्ये (आताचे लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव) आलो तेव्हापासून १९९७ पर्यंत दोन-तीन वर्षे सोडली तर मी इथलाच रहिवासी होतो. फिरता विद्यार्थी अशासाठी की त्या काळात नायर रुग्णालयाचे विद्यार्थी इथे शिकण्यासाठी पाठविले जात असत. या रुग्णालयाचे आणि त्याच्या आसमंताचे विद्रूपीकरण झालेले मी पाहिले होते. या रुग्णालयाचे टिळक रुग्णालय असे नामकरण झाले तेव्हा मी हजर होतो. पुढे इथे वैद्यकीय महाविद्यालय आले आणि वैद्यकीय विज्ञानाने झपाटय़ाने प्रगती केली. रुग्णांची संख्या वाढली. नव्या इमारती झाल्या, धारावीतले आणि इतर प्रांतांतून आलेल्या लोंढय़ांमधले लोक आजारी पडले की, इथे हजेरी लावू लागले आणि ऑपरेशन थिएटर्समध्ये उत्तमोत्तम शस्त्रक्रिया; परंतु रुग्णालयाच्या आवारात, दालनांमध्ये, व्हऱ्हांडय़ात पसारा, गलिच्छपणा आणि घाण यांचे प्रमाण दुपटीने वाढले. इथे पावसाळ्यात रात्री बेवारशांना झोपण्यासाठीचा ‘दर’ ठरला होता. कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. एके काळची रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांची जरब हळूहळू मावळली आणि ते अधिष्ठाते महानगरपालिकेच्या आयुक्तांसमोर तर सोडाच; परंतु उपआयुक्तांच्या समोरही नमू लागले. नगरसेवक तर होतेच. हे नगरसेवक की नगरभक्षक, असा प्रश्न पडावा इथवर परिस्थिती निर्माण झाली. कर्मचारी संघटनांचा इतका भयंकर पगडा आमच्या रुग्णालयावर होता की, कोठल्याही बेशिस्त आणि कामचुकार कर्मचाऱ्याला काढणे एक अग्निदिव्यच ठरत असे.
 सार्वजनिक संस्था सर्वाच्याच म्हणून कोणाच्याच नाहीत या न्यायाने त्या काळात मुंबई जशी काळवंडली, तेच याही रुग्णालयाचे झाले. जुन्या मुंबईतही चाळी होत्या, त्या चाळींमध्ये राहणाऱ्या लोकांमध्येही गरीब असूनही काहीतरी स्वामित्व आणि सत्त्व होते ते आता सर्वत्र पसरणाऱ्या झोपडय़ांमध्ये पार ढासळते. तेव्हाच पूर्वीचे मिश्र स्वरूपाचे शहर आता बकाल झाले आणि त्याचे सगळ्यात मूर्तिमंत स्वरूप टिळक रुग्णालयात उमटले. हे चित्र मी बघत होतो, त्याने व्यथित होत होतो. चाळीस वर्षे इथे काढली होती. प्राध्यापक होतो तेव्हा जे करणे शक्य नव्हते, ते आता करावे आणि माझे टिळक रुग्णालय स्वच्छ करावे या इच्छेपोटी मी या गटारगंगेत हात घालायचे ठरविले तेव्हा माहीत नव्हते की माझ्या पदरात दारुण अनुभव पडणार आहेत, पण हे अनुभव हसविणारेही ठरले, कारण इथेही मनुष्यस्वभावाचे मस्त दर्शन घडले. प्रत्येक गोष्टीला हसता आले पाहिजे हेच खरे.
एक कर्मचारी या प्रयोगाच्या वेळी मला म्हणाला, ‘साहेब तुम्ही भले मोठी ऑपरेशन करीत असाल, पण हे ऑपरेशन तुम्हाला भारी जाणार आहे.’ आणि तेच खरे ठरले.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस- औदासीन्य : वाढता मानसरोग
दिवसेंदिवस मानसरोगाची कमीअधिक लक्षणे असणाऱ्या तरुण वयातील मुलामुलींना, वैद्यकीय चिकित्सकांकडे नेणाऱ्या पालकांची संख्या लक्षणीय आहे. एक म्हणाले- ‘माझा मुलगा दहावी, बारावी भरपूर मार्क मिळवून पास झाला. टॉप क्रमांकाच्या कॉलेजमध्ये मोठी देणगी देऊन मुलाकरिता प्रवेश घेतला. चांगला कोचिंग क्लास शोधला. जुलै महिन्यात मुलाकडे लक्ष द्यायला आम्हा दोघांना वेळ झाला नाही. नेहमी अभ्यासात मग्न असणारा मुलगा कॉलेजची पुस्तके घरी वाचताना दिसेना. थोडी चौकशी केली, तर नीट उत्तर देईना, आठ दिवस गेले, १५ दिवस गेले. मुलाच्या कॉलेजच्या वह्या पाहिल्या. ‘किरकोळ नोटस्’ सोडल्यास जवळपास कोऱ्या होत्या. मुलाच्या नकळत कॉलेजात दोन अध्यापकांकडे चौकशी केली. ‘तुमचा मुलगा मागच्या बाकावर बसतो, त्याला पुढे बसायला सांगा, म्हणजे आम्हाला लक्ष देता येईल, असे उत्तर मिळाले.’
पूर्वीच्या शिक्षण काळात मुलाला अनेक मित्र लहानपणापासून साथ देत होते. नवीन कॉलेजात जुन्या मित्रांची संगत नव्हती. एकदमच नवीन वातावरण, विषय, नवीन शिक्षक. एरवी हुशार वाटणाऱ्या मुलाच्या डोक्यावरून शिक्षकांची लेक्चरबाजी जात होती. एरवी अभ्यासात रस घेणाऱ्या मुलाचा उदासीनतेने ताबा घेतला. ‘या कॉलेजात ४ वर्षे, त्यानंतर पुन्हा २ वर्षे असे लांबलचक शिक्षण घेणे आपणास झेपणार का?’, अशा शंकाकुशंकांनी मन खिन्न, उदासीन झाले. त्या मुलाला बोलवून घेऊन, विश्वासात घेऊन थोडा शोध घेतला. ‘तुला वडिलांपेक्षा मोठे करीअर करायची इच्छा आहे का?’ असे विचारून; औषधोपचार कमी, शारीरिक श्रम, व्यायाम असा नित्यक्रम सुचविला. मुलाला मारूतीदैवत फार प्रिय. ‘बजरंगबलीकि जय’ असे म्हणून भल्यापहाटे सहा सूर्यनमस्कार सुरूवात करून दीर्घश्वसन प्राणायाम; नंतर दोरीच्या उडय़ा असा व्यायाम सुचविला. रात्रौ जेवणानंतर अर्धातास फिरून यावयास सांगितले. बुध्यांक वाढविण्याकरिता सारस्वतारिष्ट, ब्राह्मीवटी अशी औषधे सुरू केली. दीड महिन्यात मुलाचे औदासीन्य केव्हा गेले, हे कळलेच नाही
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – ३० ऑगस्ट
१८५० > मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी ‘महाराष्ट्र भाषा संवर्धक मंडळा’ची स्थापना करणारे, भर्तृहरीचे नीतिशतक आणि वैराग्यशतक यांच्या प्रती छपाईसाठी संपादित करणारे न्यायाधीश काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. अवघ्या ४३ वर्षांच्या हयातीत ‘स्थानिक स्वराज्यव्यवस्था’, ‘शहाणा नाथन’ आदी समाजप्रबोधनपर मराठी पुस्तके आणि ‘मुद्राराक्षस’ नाटकासह संस्कृत ग्रंथांची संपादने असे कार्य त्यांनी केले.
१८८९ > पाली भाषेचे तज्ज्ञ व बौद्ध साहित्याचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचा जन्म. त्यांनी ‘श्री सयाजी साहित्य माले’साठी ‘दीर्घनिकाय (दोन खंड)’ पालीतून मराठीत भाषांतरित केले.
१९४७ > ‘जन विषयाचे किडे, त्यांची धाव बाह्य़ाकडे, आपण करू शुद्ध रसपान रे..’ असे मनातल्या चाफ्याला विनवून मराठी कविता फुलवणारे कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांचे निधन. ‘चाफा’, ‘माझी कन्या (गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या)’ अशा त्यांच्या कविता आजही अनेकांच्या ओठी आहेत. ‘फुलांची ओंजळ’ हा त्यांच्या अवघ्या ३८ कवितांचा संग्रह आचार्य अत्रे यांच्या दीर्घ प्रस्तावनेनिशी १९३४ साली प्रकाशित झाला. दुसऱ्या आवृत्तीत (१९४७) आणखी ११ कवितांची भर पडली.
– संजय वझरेकर