मोठा समुद्रकिनारा लाभलेल्या सोमालियात अनेक उत्तम नैसर्गिक बंदरे तयार झाली होती आणि हा प्रदेश एक जागतिक व्यापारकेंद्र बनला होेता. पंधराव्या-सोळाव्या शतकात इथे अरबी व पर्शियन लोकांनी लहान-लहान वस्त्या स्थापल्या होत्या, तसेच या प्रदेशातल्या राज्यकर्त्यांनी आणि बहुतांश जनतेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. सोमालियाच्या शेजारच्या इथिओपियात मात्र बहुतांश ख्रिस्ती धर्मीय होते. धर्मविद्वेषामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये सततचा संघर्ष, सशस्त्र हल्ले होत असत. चौदाव्या-पंधराव्या शतकात सोमालिया इथिओपियाच्या वर्चस्वाखाली होता. इ.स. १५३० मध्ये इमाम अहमद गुरे या कणखर नेत्याचा सोमालियात उदय झाला. त्याने सोमालियातील सर्व मुस्लीम राज्यकत्र्यांना एकत्र आणून त्या प्रदेशातल्या मुस्लीम सैन्याची फौज इथिओपियावर नेत समोर दिसेल त्या ख्रिस्ती माणसाची कत्तल सुरू केली. इथिओपियात हा मोर्ठा हिंसाचार चालू असतानाच, पेड्रो-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी त्याच्या जहाजांचा तांडा घेऊन इथिओपियात दाखल झाला आणि तिथल्या ख्रिस्ती बांधवांकडे काही मदत मागू लागला. इथिओपिआच्या नेत्यांनी पोर्तुगीजांना मदत केलीच; पण त्यांच्या ताज्या दमाच्या सैन्याच्या साहाय्याने सोमालियाच्या सैन्यावर चढाई केली.

१५४३ साली झालेल्या युद्धात सोमालियाचा पराभव होऊन त्यांचा नेता इमाम गुरे मारला गेला. त्यानंतर पोर्तुगीज व्यापारी सोमालियाच्या किनारपट्टीवर येऊन त्यांनी त्यांच्या लहान लहान वस्त्या स्थापल्या. पुढे सन १७२८ मध्ये त्या प्रदेशात आलेल्या ऑटोमन तुर्कांनी सोमालियाच्या बऱ्याच प्रदेशाचा ताबा घेतल्यावर पोर्तुगीजांनी सोमालियामधून काढता पाय घेतला. सोमालियाचा उत्तर प्रदेश तुर्कांच्या अमलाखाली आला; परंतु त्याच काळात इजिप्तने ऑटोमन तुर्कांचे स्वामित्व झुगारून स्वतंत्र इजिप्तची स्थापना केली आणि सोमालियाच्या उत्तरेचा तुर्की ताब्यातील प्रदेश इजिप्तच्या अमलाखाली आला.

अठराव्या शतकाच्या अखेरीस सोमालियाच्या व्यापारी बंदरपट्ट्याचा लाभ मिळवण्याकरिता तेथील जमेल तेवढा प्रदेश बळकावण्यासाठी अनेक युरोपीय आणि आफ्रिकी देशांमध्ये चढाओढ निर्माण झाली. या स्पर्धेत इजिप्त, इथिओपिया, ब्रिटन, इटली आणि फ्रान्स होते. १८८४ साली बर्लिन येथे पार पडलेल्या युरोपीय आणि आफ्रिकी नेत्यांच्या परिषदेनंतर मात्र या स्पर्धेतून इथिओपिया व इजिप्त बाहेर पडले. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com