शेतजमीन खरेदी करताना व त्या जमिनीचा वापर करताना कोणकोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात, कोणती सावधगिरी बाळगावी म्हणजेच काय करावे व काय टाळावे या शंका मनात असतात.
शेतकरी नसलेल्या व्यक्तीने (शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय) शेतजमीन खरेदी करू नये. महाराष्ट्र शेतजमीन कायद्यानुसार जी व्यक्ती शेतकरी या संज्ञेत येत नाही, अशी व्यक्ती या व्यवहारास पात्र नसते.
कुळ वहिवाट (कलम ३२-ग) या वर्गवारीमध्ये असलेली शेतजमीन तसेच आदिवासी जमीन यांची खरेदी सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय करू नये.
या व्यवहारास पात्र अशा व्यक्तीने इसार पावती अथवा साठेखत करण्यापूर्वी खरेदी करावयाच्या शेतजमिनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहावी. त्यात उभी असणारी पिके, दरवर्षी घेतली जात असलेली पिके, जमिनीवरील एकूण उभी झाडे, पाणीपुरवठय़ाचे साधन, विहिरी यांच्या बारीकसारीक नोंदी टिपून घ्याव्यात. या तपशिलाची नोंद खरेदी पत्रामध्ये करणे फायद्याचे ठरते.
जो शेतकरी जमीन विक्री करणार आहे, त्याला ती विक्री करण्याचे अधिकार आहेत, याची खातरजमा करावी. त्याचे हक्क अबाधित आहेत, हेदेखील तपासावे. यासाठी संबंधित जमिनीचे मालकी हक्काचे सातबारा व सहाबाराचे उतारे तलाठी कार्यालयाकडून मिळवून त्यातील मजकूर व फेरफार नोंदी स्वत: तपासून घ्याव्यात. आवश्यकता वाटल्यास यातील माहीतगाराची मदत घेण्यास विसरू नये. हे उतारे नजीकच्या काळातील म्हणजेच ताजे असावेत.
खरेदी-विक्रीमध्ये सरकारी मंजुरी म्हणजेच खरेदी करण्याचा परवाना व परवानगी घेणे आवश्यक असेल तर ती किती दिवसांत मिळू शकते, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागेल यांची महसूल अधिकाऱ्याकडून माहिती घ्यावी व ती पूर्ण करावी.
शेतजमिनीवर गहाण, कर्जवसुली, बँक अथवा इतर आíथक व्यवहार करणाऱ्या सरकारी व निमसरकारी खासगी संस्थांचा वसुली बोजा नसल्याची खात्री करावी. असल्यास त्यानुसारच त्याचे निवारण व पूर्तता करून इतर हक्क स्वच्छ करून मगच खरेदीचे पुढचे पाऊल टाकावे.
-भरत कुलकर्णी (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  –   जयंत नारळीकर विज्ञान आणि धर्म(गुरू)
सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी १३ एप्रिल २०१३ रोजी मुंबई विद्यापीठात दिलेल्या भाषणाचा सारांश दुसऱ्या दिवशीच्या (रविवार, १४ एप्रिल) लोकसत्तात आला होता, तो अनेकांनी वाचला असेल.  हे विश्व स्फोटातून उद्भवलेले नाही तरीसुद्धा या विश्वातल्या घडामोडींचा अनुक्रम त्या विश्वाच्या विकसनात दडला आहे आणि त्यातून विश्वाचे (निराळे) सूत्र उकलता येते, असा तो सारांश आहे. हे तत्त्व त्यांनी त्यांचे गुरू हॉइल यांच्यासोबत संशोधन करून गणिती पद्धतीने सिद्ध केले; परंतु ते तत्त्व जाहीरपणे मांडताना स्फोटवादाची बाजू मांडणाऱ्या शास्त्रज्ञाला तीस मिनिटे देण्यात आली. मात्र यांना आठच मिनिटे असा उल्लेख आहे. वैज्ञानिकांमधल्या दुराग्रहाचा हा नमुना हे माणूस असल्याचेच लक्षण; परंतु वैज्ञानिक क्षेत्रात ही दडपशाही फार काळ चालत नाही आणि शेवटी सत्याचा शोध आणि ओघ सुरळीत चालू राहतो हेही तेवढेच खरे आहे. नारळीकरांचे ते संशोधन विष्णू खरा आणि शंकर खोटा, अशा स्वरूपाचे नाही. कारण विष्णू आणि शंकर या कल्पनांचे काही पुरावे नाहीत. तरीही या संप्रदायांमधून विस्तव जात नसे, म्हणून दत्त संप्रदाय जन्माला आला, अशी गोष्ट सांगतात. वैज्ञानिकाची जातकुळी वेगळी असते. तो एखादी गोष्ट शोधली की त्याला कंटाळतो, मग या शोधामागचे रहस्य शोधण्याच्या मार्गाला लागतो. गूढ गोष्टींमधले गूढ आधी प्रश्न विचारून मग प्रयोग करून मग आकडेमोड करून उकलतो आणि मग परत नव्या गूढाकडे वळतो. गूढ गोष्टी त्याला वाकुल्या दाखवितात. त्याच्यासमोर आव्हाने असतात.
वैज्ञानिक आपले अज्ञान लपवीत नाही. त्याचे अज्ञान त्याला स्फुरण देते. याउलट धर्मगुरूंचे अज्ञानाचे किंवा गूढ गोष्टीचे आकर्षण निराळ्या प्रकारचे असते. गूढत्वाचा बाडबिस्तरा बांधून ठेवण्यात त्यांना धन्यता वाटते. आणि हे गूढत्व असेच टिकू दे अशी त्यांची इच्छा आणि धारणा असते आणि या गूढत्वाबद्दल अशी भूमिका घेणे आणि त्याबद्दल समाधानी असणे हे चांगल्यापणाचे लक्षण समजले जाते.
..डॉकिन्सच्या ‘देव नावाचा भ्रम’ या पुस्तकातील एका परिच्छेदाचा हा सारांश आहे. ज्यात रिडले या भाष्यकाराचेही मत आहे.
त्या पुस्तकात राइस नावाच्या जीवाष्म (Fossill) संशोधकाची गोष्ट आहे. त्याच्या संशोधनात बायबलमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे आपल्या विश्वाचे वय दहा हजार वर्षांचे नाही हे स्पष्ट दिसू लागते तेव्हा तो बायबलच्या चिंधडय़ा करतो. मग त्याला उपरती होते आणि शेवटी स्वत:च्या संशोधनावर बोळा फिरवून तो बायबलच स्वीकारतो, अशी एक खरी गोष्ट सांगितली आहे. आपल्या दरिद्री आणि अज्ञानी देशात असली वैज्ञानिकाची गोष्ट ऐकिवात नाही, त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – रसायनप्रयोग (भाग ६)
आधुनिक वैद्यक तापाकडे थर्मामीटरच्या मापनाने बघत असते. आयुर्वेदिय शास्त्रकार तापाचे प्रमुख लक्षण सांगताना ‘संतापो देह मानस:!’ असा अधिक व्यापक  सांगावा सांगतात. तापाकरिता रसायनचिकित्सा म्हणून विचार करण्याची  खूपच नितांत गरज, आताच्या आधुनिक राहणीमुळे सर्वांकरिताच आवश्यक आहे.
इथे तापाचा खूप तपशीलवार विचार न करता रुग्णाने आपल्याला आलेला ताप घाम येऊन उतरतो का? अ‍ॅनासिन, अ‍ॅस्प्रो अशी अ‍ॅस्परिन गटातील औषधे, आयुर्वेदातील त्रिभुवनकीर्ती, लक्ष्मीनारायण अशा घाम काढणाऱ्या औषधांनी कमी होतो का याचा मागोवा घ्यावा. नव्वद टक्के लोकांना नेहमी याच प्रकारच्या तापाने त्रस्त केलेले असते. हा ताप आसपासच्या हवामानावर, प्रदूषणावर, इतरांच्या संपर्कावर, डासांसारख्या बाह्य़ घटकांवर अवलंबून असतो. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की तुम्ही-आम्ही या प्रकारच्या तापाच्या विळख्यात सापडतो.
दुसऱ्या प्रकारच्या तापात तापाचे मान जास्त असते. घाम काढणाऱ्या नेहमीच्या औषधांनी या प्रकारचा ताप उतरण्याऐवजी उलट वाढतोच. या प्रकारच्या तापात चक्कर येणे, उलटी होणे, थकवा, आम्लपित्त, डोलल्यासारखे होणे अशी लक्षणे असतात. हा ताप पित्तप्रधान असतो.
आयुर्वेदाच्या सुरुवातीच्या काळात आतासारखी खूप खूप औषधे नव्हती. घाम काढणे, गरम पाणी पिणे, लंघन करणे, थोडी वाट पाहणे व सर्वात शेवटी  कडू रसाच्या वनस्पतींचा काढा घेणे असे उपचार सुचविलेले आहेत. तापमान नॉर्मल झाल्यानंतर पुन्हा पुन्हा या रोगाची लागण होऊ नये म्हणून कफप्रधान व्यक्तींनी लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, अभ्रकमिश्रण, नागरादिकषाय यापैकी एक वा दोनाचीच निवड करावी. पित्तप्रधान ज्वराची पाश्र्वभूमी असल्यास लघुसूतशेखर, चंद्रकला यातील एक वा दोघांची सर्वाकरिताच लमावसंत, गुळवेलसत्त्व, नागरमोथा पाणी ही परम रसायन औषधे आहेत.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १६ ऑक्टोबर
१८८६ > विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील स्त्री-समस्या व कौटुंबिक समस्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून मांडणाऱ्या लेखिकांच्या पहिल्या फळीतील एक, गिरिजाबाई महादेव केळकर यांचा जन्म. ‘पुरी हौस फिटली’ , ‘पुस्तकी शीक आणि व्यवहाराची भीक’ या कादंबऱ्या, अंगठीचा प्रवास ही दीर्घकथा, पुरुषांचे बंड आणि समाजचित्रे हे कथासंग्रह तसेच द्रौपदीची थाळी हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. काही नाटकेही त्यांनी लिहिली होती व अ. भा मराठी नाटय़संमेलनाचे (१९२८ -मुंबई) अध्यक्षपद भूषविले होते.
१९०७ > महात्मा गांधींवर पोवाडा आणि अनेक निसर्गकविता लिहिणारे कवी सोपानदेव चौधरी यांचा जन्म. ‘काव्यकेतकी’, ‘अनुपमा’ या संग्रहांनंतर त्यांच्या समग्र कवितांचे ‘सोपानदेवी’ हे संकलन प्रकाशित झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी या त्यांच्या आई. ‘आमच्या आईच्या कविता- बहिणाबाईची गाणी’ हा संग्रह साकारण्यामागे सोपानदेवांचे प्रयत्न होते.
२००२ >  ऐतिहासिक कादंबरीकार नागनाथ संतराम इनामदार यांचे निधन. झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त आणि छ. शिवाजी महाराजांवर ‘राजश्री’ या त्यांच्या सर्वच कादंबऱ्या लोकप्रिय ठरल्या.
– संजय वझरेकर