६ ऑगस्ट १९६२ रोजी जमैका ब्रिटिश वसाहतीच्या जोखडातून मुक्त झाले. मात्र, या नवस्वतंत्र जमैकाने राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व राखले व देशाचे औपचारिक राष्ट्रप्रमुखपद ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ-द्वितीयला देण्यात आले. बुस्तामांटे यांची निवड जमैकाचे पहिले पंतप्रधान म्हणून झाली. सार्वभौम जमैकात सध्या संसदीय लोकशाही व सांविधानिक राजेशाही राज्यव्यवस्था आहे. पंतप्रधानाने नियुक्त केलेला गव्हर्नर जनरल हा जमैकात वास्तव्याला राहून राणीचे प्रतिनिधित्व करतो. २०२० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले अ‍ॅण्ड्र्यू होलनेस हे जमैकाचे सध्याचे पंतप्रधान आहेत, तर पॅट्रिक अ‍ॅलन हे गव्हर्नर जनरल आहेत. जमैका अलिप्ततावादी राष्ट्रसंघटनेचा सदस्य असून ब्रिटन-अमेरिकेबरोबरच शेजारच्या कम्युनिस्ट क्युबाशीही सौहार्दाचे संबंध जपले आहेत.

जमैकन संसदेची वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी दोन प्रतिनिधीगृहे आहेत. लोकनिर्वाचित संसद सदस्यांमधून योग्य संसद सदस्याची नियुक्ती पंतप्रधानपदी केली जाते. सुमारे २८ लाख लोकसंख्या असलेल्या जमैकात आजवर मोठ्या प्रमाणात दूरवरच्या प्रदेशांमधून स्थलांतरे झाली आहेत. त्यामुळे येथे विभिन्न वंशांचे लोक स्थायिक झालेले आहेत. यामध्ये आफ्रिकी वंशाचे ७७ टक्के, आफ्रो-युरोपीय वंशाचे १५ टक्के, भारतीय वंशाचे चार टक्के आणि दोन टक्के चिनी वंशाचे आहेत. इंग्रजी ही जमैकाची राजभाषा असून तीच तिथे अधिक प्रमाणात बोलली जाते, त्याचबरोबर पाटवा ही स्थानिक भाषाही प्रचलित आहे. ७० टक्के जमैकन नागरिक प्रोटेस्टंट ख्रिस्ती, तर २२ टक्के लोक निधर्मिक आहेत.

स्वतंत्र झाल्यापासून जमैकन सरकारने शेती व साखर उत्पादनापेक्षा औद्योगिक उत्पादन, खाण व पर्यटन उद्योग यांवर भर दिला. तिथे विपुल प्रमाणात असलेल्या बॉक्साइटच्या निर्यातीतून जमैकाला मोठे उत्पन्न मिळते. क्रिकेट हा जमैकातील लोकप्रिय क्रीडाप्रकार. या देशाने क्रिकेट विश्वाला अनेक प्रसिद्ध खेळाडू दिले. सध्याचा ख्रिस गेल हा त्यांपैकी एक! आधीच्या खेळाडूंमध्ये मायकेल होल्डिंग, कोर्टनी वॉल्श, जॉर्ज हेडली यांचा समावेश होतो. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com