16 January 2019

News Flash

जे आले ते रमले.. : राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसेन (२)

या मधल्या काळात जामिया इस्लामीची आर्थिक परिस्थिती, प्रशासन आणि शिक्षणाचा दर्जा ढासळून संस्था बंद पडायच्या मार्गावर होती.

पठाण समाजातले उच्चशिक्षित डॉ. जाकीर हुसेन हे विख्यात शिक्षणतज्ज्ञ होते. १९२० साली त्यांनी इतर सहकाऱ्यांसमवेत स्थापन केलेल्या मुस्लीम विद्यापीठाचे रूपांतर पुढे जामिया मिलिया इस्लामियामध्ये झाले. त्याच वर्षी ते पीएच.डी. करण्यासाठी बíलन युनिव्हर्सटिीत गेले. या मधल्या काळात जामिया इस्लामीची आर्थिक परिस्थिती, प्रशासन आणि शिक्षणाचा दर्जा ढासळून संस्था बंद पडायच्या मार्गावर होती. जाकीर हुसेन परत आल्यावर संस्थेची सर्व सूत्रे स्वत:कडे घेऊन पुढची २१ वर्षेचोख प्रशासन आणि उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा, मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन त्यांनी आजची जामिया मिलीया इस्लामिया नावारूपाला आणली. १९४७ पर्यंत ते जामिया मिलीयाच्या कुलगुरूपदावर होते.

विद्यार्थी दशेतच महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या जाकीर हुसेनची गांधींशी भेट प्रथम झाली १९२६ मध्ये. जाकीर हुसेनांच्या धर्मनिरपेक्षता आणि गांधींच्या आदर्शाचे पालन करण्यामुळे जामिया मिलीया संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी असहकार आणि तत्सम स्वातंत्र्य चळवळींमध्ये अनेक वेळा सहभागी झाले. १९३७ साली जाकीर हुसेन भारताच्या राष्ट्रीय शिक्षा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले गेले. या काळात ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कामकाजातही लक्ष देत होतेच. जामिया मिलीयाच्या कुलगुरूपदावरून निवृत्त झाल्यावर १९४७ मध्ये ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर नियुक्त झाले. या काळात या संस्थेचे काही प्राध्यापक, कर्मचारी मुस्लिमांसाठी वेगळा देश, पाकिस्तान व्हावा म्हणून आंदोलन करीत असताना जाकीर हुसेनांनी स्वतंत्र भारत अखंड राहावा म्हणून त्यांचे मन वळवले. यामुळे बॅरिस्टर जिनांचेही शत्रुत्व त्यांनी स्वीकारले. स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. जाकीर हुसेन १९५२ आणि १९५६ असे दोन वेळा राज्यसभेवर निवडून आले पुढे त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. १९६२ साली ते भारताचे उपराष्ट्रपती आणि १९६७ साली प्रजासत्ताक भारताच्या सर्वोच्चपदी म्हणजे राष्ट्रपतिपदी नियुक्त झाले.

धर्मनिरपेक्ष शैक्षणिक कार्य आणि राजकारणातील सहभागाबद्दल १९५४ मध्ये पद्मविभूषण आणि १९६३ मध्ये भारतरत्न हे किताब देऊन त्यांचा बहुमान झाला. १९६९ मध्ये त्यांचे देहावसान झाले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on June 5, 2018 2:05 am

Web Title: president dr zakir husain