06 July 2020

News Flash

कुतूहल: खाद्यतेल बनवण्याची प्रक्रिया

वनस्पतिजन्य पदार्थापासून तेल मिळविण्याची पद्धत माणसाला प्राचीन काळापासून अवगत होती. सूर्याची उष्णता, भट्टी, शेकोटी यांमध्ये तेलबिया, फळे यांना तेल पाझरेपर्यंत उष्णता देत. पाझरलेले तेल गोळा

| July 22, 2014 01:01 am

कुतूहल
खाद्यतेल बनवण्याची प्रक्रिया
वनस्पतिजन्य पदार्थापासून तेल मिळविण्याची पद्धत माणसाला प्राचीन काळापासून अवगत होती. सूर्याची उष्णता, भट्टी, शेकोटी यांमध्ये तेलबिया, फळे यांना तेल पाझरेपर्यंत उष्णता देत. पाझरलेले तेल गोळा करून त्याचा वापर स्वयंपाकात करीत असत. त्यानंतर तेलबिया भाजून, कुटून पाण्यात उकळवून, पाण्यावर जमा झालेले तेलाचे तवंग गोळा करीत व जमा केलेले तेल वापरीत. यांत्रिक क्रांतीनंतर चक्की किंवा जाते याचा वापर तेलबियांचे बारीक चूर्ण करण्यासाठी होऊ लागला. सुरुवातीला या जात्यांचा दांडा माणसे किंवा जनावरे ओढीत असत. नंतर पाण्याच्या दाबाचा, विद्युत शक्तीचा, स्क्रूपेसचा उपयोग करून चक्की किंवा जाते फिरविले जात असे. विद्रावकाचा उपयोग करून तेल निष्कर्षणाची पद्धती १८४३ पासून जर्मन, इंग्लंडमध्ये प्रचलित आहे. घाणीच्या पद्धतीचा वापर केल्याने २० ते ३० % तेल मिळते, निष्कासन पद्धतीत ३४ ते ३७ % तर विद्रावक निष्कासन पद्धतीत ४० ते ४५ % तेल मिळते. तेल हे वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांपासून मिळवितात, उदा. बियांपासून (सूर्यफूल, तीळ, भुईमूग, सोयाबीन, बदाम), फळातील गरापासून (खोबरेल तेल, पाम तेल, ऑलिव्ह तेल), धान्याच्या कोंबापासून, भ्रूणापासून (कॉर्न तेल)ही तेल मिळवितात.
घाणीचे तेल मिळविण्याच्या पद्धतीमध्ये उष्णता न देता सामान्य तापमानाला तेल मिळविले जाते. या तेलात मूळपदार्थाची चव व वास राहतो, परंतु रंग व काही अशुद्ध घटक शिल्लक राहतात. हे तेल स्वयंपाकात वापरण्यास योग्य असते. श्रम जास्त व उत्पादन कमी यामुळे ही पद्धती आता मागे पडली आहे. निष्कासन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राइंडर तेलबियाच्या प्रकारानुसार वापरले जातात. काढलेले तेल दोनतीन वेळा गाळून अशुद्ध घटक दूर केले जातात. उष्णतेचा वापर नसल्यामुळे रंग, वास कायम असतो. द्रावकाचा उपयोग करून यंत्राच्या सहाय्याने काढलेल्या वनस्पती तेलात पेट्रोलजन्य पदार्थ हेक्झेन मिसळले जाते. हे मिश्रण उकळवितात त्यामुळे त्यातील अशुद्ध घटक घनरूप होऊन तळाशी जातात आणि वरील तेल बाजूला करून तापविले जाते. उष्णतेमुळे हेक्झेनचे वाफेत रूपांतर होते. शिल्लक तेल रंगहीन करण्यासाठी अल्कलीचा वापर करतात. अल्कली तेलातील मेदाम्लाशी संयोग पावते व साबण तयार होतो, तो अपकेंद्री पद्धतीने वेगळा करतात. खालील तेल परत पाण्याने स्वच्छ धुऊन मुक्त कार्बन आणि ०.०१ % सायट्रिक आम्ल वापरून शिल्लक अशुद्ध घटक दूर करतात. अशा प्रकारे तयार झालेले रिफाइंड तेल पिशवीत, बाटलीत हवाबंद करून दुकानात येते.

मंगला कुलकर्णी (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
भारतीय अर्थव्यवस्थेची क्रयशक्ती शेतकऱ्यांवर अवलंबून
‘केवळ संख्याबळामुळे नव्हे तर, श्रेष्ठतम कार्यामुळे या भारत देशात कृषकांना (शेतकऱ्यांना) पूर्वापार प्राधान्य मिळत आलेले आहे. .. .. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाचे स्वरूप हे कृषकांच्या शोषणविरहित संप्रेषणावर अवलंबून आहे.. आर्थिक विकासात पशुधनाचा सिंहाचा वाटा आहे. वैज्ञानिक प्रगतीच्या माध्यमातून कृषिक्षेत्राताला सुधारित यंत्रे प्राप्त झाल्यानंतरही भारतीय शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीवर निर्भर राहावे. बैलजोडी ही शेतकऱ्यांसाठी अतिशय स्वस्त आणि उपयोगी साधन आहे. पण गाईचे महत्त्व त्याहून अधिक आहे. भारताला पौष्टिक व स्वास्थ्यकारक दुधाचा पुरवठा गाईच्या माध्यमातून होतो..कर्जाचे ओझे, पेरण्या उलटणे, पावसाची अनिश्चिती, सिंचनाचा अभाव, हमी भावाची घसरण, नैसर्गिक आपत्ती, सावकाराकडून होणारी फसवणूक आणि सरकारी धोरण या गोष्टी शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत ठरतात. यासाठी जनप्रतिनिधींनी उपाययोजना अंमलात आणण्याची खरी गरज आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेची क्रयशक्ती संपूर्ण कृषकांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे..’’
डॉ. पंजाबराव देशमुख यांना कृषिप्रधान भारताचे इंगित नेमकेपणाने माहीत होते. म्हणून १९५५ साली ते लिहितात – ‘‘शेतात राबणारा शेतकरी वर्गच नष्ट झाला तर या प्रदेशाची काय भयानक अवस्था होईल? कारण शेतकरी संपला तर उद्योगपतीही संपेल आणि त्यामुळे भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन या घटकावर विपरित परिणाम होईल. असे होऊ नये म्हणून सहकारी क्षेत्राच्या आधारे देशातील ग्रामीण स्तरावर बाजारपेठेचे, अधिकोषाचे आणि शिक्षणाचे संप्रेषण करण्यात यावे. शोषणविरहित पोषणव्यवस्था निर्माण करण्यासाठी ग्रामीण स्तरापर्यंत झिरपणाऱ्या आर्थिक योजना संप्रेषित केल्या पाहिजेत.. आपली भूमी सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे, आपण तिला वाचविले पाहिजे, तिची निगा राखली पाहिजे, ती सुपिक बनविली पाहिजे. भूमी ही राष्ट्राचा रक्तप्रवाह आहे, तिला सुदृढ करण्याकरिता शिक्षणाची गरज आहे..’’

मनमोराचा पिसारा
नेमेचि येतो..
कुठेही वळसे नाहीत, बाकदार वळणे नाहीत, गर्भित गूढ अर्थ नाहीत, कठीण शब्दांची गुंफण नाही.. अगदी साधी, सोपी प्रेमळ वाटावी अशी ही कविता. कवी (मला तरी) अनामिक. फक्त यातले दोन चरण सुप्रसिद्ध आणि ‘नेमेचि’ वापरले जाणारे आहेत. कोणते ते सांगायला नकोच. खरं म्हणजे आणखी काही भाष्य करायला नको. विशेष म्हणजे या कवितेवर ‘बाळबोध’पणाचा शिक्का न मारता वाचली तर निखळ आनंद मिळेल. तीन पिढय़ांपूर्वीच्या क्रमिक पुस्तकांत, आणि मग ‘आठवणीतल्या कविता’च्या दुसऱ्या भागात संग्रहित झालेली ही कविता बऱ्याच जणांच्या संग्रही नसावी म्हणून संपूर्ण कविता उद्धृत*  करतोय. खास माझ्या मित्र वाचकांच्या या कट्टय़ावर..

सृष्टीचे चमत्कार

(श्लोक : उपजाति)
वैशाखमासी प्रतिवर्षि येती,
आकाशमार्गी नव मेघपंक्ती;
नेमेचि येतो मग पावसाळा,
हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा ।। १।।
पेरूनियां तें मण धान्य एक,
खंडींस घे शेतकरी अनेक;
पुष्पें फळें देति तरू कसे रे?
हे सृष्टिचे कौतुक होय सारें ।। २।।

ऋतू वसंतादिक येति, जाती,
तैसेचि तेही दिन आणि राती;
अचूक चाले क्रम जो असा रे,
हे सृष्टिचे कौतुक, जाण सारें ।। ३।।

पाणी पाहा मेघ पितात खारें,
देती परी गोड फिरूनि सारे;
तेणेंचि हा होय सुकाळ लोकी,
हे सृष्टिचे कौतुक, बा, विलोकी ।। ४।।

ते तापले डोंगर उष्णकाळी
पाने तृणें वाळुनि शुष्क झाली;
तथापि तेथे जळ गार वाहे
झऱ्यांतुनी, कौतुक थोर, बा, हे! ।। ५।।

वठोनि गेल्या तरुलागिं पाणी,
घालावया जात न कोणि रानी;
वसंति ते पालवतात सारे,
हे सृष्टिचे कौतुक होय, बा, रे! ।। ६।।

ऐसे चमत्कार निजप्रभावें
दावी प्रभू, त्यास अनन्यभावें
प्रार्थीत जा सांजसकाळ नित्य
जोडी सुखाची मिळवाल सत्य. ।। ७।।

डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
ही कविता स्वामित्वहक्कमुक्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2014 1:01 am

Web Title: procedure to make edible oil
Next Stories
1 कुतूहल: तूप आणि त्यातील घटक
2 कुतूहल: तेलाचा धूम्रांक (स्मोक पॉइंट)
3 कुतूहल: खाद्यतेलातील घटक
Just Now!
X