News Flash

मनमोराचा पिसारा: पटसंख्येचं मानसशास्त्र

शाळेतल्या वर्गात किती मुलं असावीत? म्हणजे मुलांना शिकण्याची, आपापसांत मैत्री करून एकमेकांकडून मस्ती आणि अभ्यासाचे धडे गिरविण्याची सर्वाधिक संधी मिळविण्यासाठी वर्गाच्या

| March 27, 2014 01:58 am

शाळेतल्या वर्गात किती मुलं असावीत? म्हणजे मुलांना शिकण्याची, आपापसांत मैत्री करून एकमेकांकडून मस्ती आणि अभ्यासाचे धडे गिरविण्याची सर्वाधिक संधी मिळविण्यासाठी वर्गाच्या पटावर आणि प्रत्यक्ष हजर राहणाऱ्या मुलांची संख्या किती असावी? हा निर्णय शिक्षण खात्यांमधल्या एखाद्या ‘बाबू’नं घ्यायचा? नाही, शिक्षण
मानसशास्त्राच्या विभागानं देशोदेशीच्या शाळांमध्ये फिरून, शिक्षकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाची पाहणी करून घ्यायचा, असा शासकीय निर्णय झाल्यानंतर अमेरिकेतल्या विद्यापीठांनी त्यावर कष्टानं संशोधन करून काही बाबी समोर ठेवल्या. त्या कोणत्या त्याचा विचार माल्कम ग्लॅडवेलनं आपल्या पुस्तकात अतिशय रंजकपणे मांडला आहे. मुळात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी
मानसशास्त्र महत्त्वाची कामगिरी पार पाडतं, हाच आपल्याकडे नवा विचार असेल.
या संशोधनामध्ये टेरेसा दिब्रिटो नावाच्या शाळा मुख्याध्यापिकेचा सहभाग आहे आणि या संशोधनाला स्टुडण्ट टीचर अचिव्हमेंट रेशिओ रळअफ असं नाव आहे. टेनेसी विद्यापीठानं यात पुढाकार घेतला. टेरेसाच्या शाळेतल्या मुलांची संख्या त्या गावातल्या लोकांचं स्थलांतर झाल्यामुळे (घोस्ट टाऊन) कमी होत गेली. आपल्या वर्गात मुलांची संख्या कमी झाल्यानं शैक्षणिक दर्जा खालावला असं तिला वाटलं. आपल्याला (भारतीय वाचकांना) त्याचा धक्का बसतो, कारण आपल्याकडे मुलांची संख्या सहजच ६०-७० इतकी असते. अर्थात इतका मोठा क्लास असावा असं तिचं म्हणणं नव्हतं. १०-१२ मुलांना घेऊन हवं तसं शिक्षण देता येत नाही, असं वाटलं. मुळात वर्गात (प्राथमिक शाळेतदेखील) मुलांच्या सहभागानं शिक्षण होतं. छोटय़ा ग्रुपमध्ये शाळेतच पूर्ण करण्याचे प्रकल्प, राबवायचे असतात! (पालकांनी प्रकल्प करायचे नसतात!) इथून सुरुवात झाली आणि लक्षात आलं की, वर्गामध्ये किती मुलं असावीत याचा सर्वोत्तम (ऑप्टिमम) आकडा शोधला पाहिजे आणि तो आकडा आहे अठरा ते चोवीस! सहा-सहा जणांचे तीन ते चार गट केले आणि गटामधली मुलं बदलत राहिलं तर मुलांची परस्परांत उत्तम देवाणघेवाण होते. वर्गात काही मुलं विशेष हुशार असतात, तर बरीचशी सामान्य आणि काही त्यांच्यापेक्षाही कमी हुशार असतात. या सर्व मुलांच्या मानसिक, भावनिक गरजा अर्थातच भिन्न असतात. त्या ओळखून त्यांच्याशी ‘वन ऑन वन संवाद साधणं शिक्षकांना सहजसाध्य होतं. वर्गात २० ते २४ मुलं असली तर त्या सगळ्यांची मिळून तयार होणारी सामूहिक ऊर्जा वर्गाला रसरशीत जिवंतपणा देते.
विशेष म्हणजे, शिक्षकाला वर्गात खऱ्या अर्थानं ‘इंटरअ‍ॅक्टिव्ह’ पद्धतीने शिक्षण देता येतं वर्गामधली शिस्त अथवा पाटय़ा टाकणे हा उद्योग करावा लागत नाही.
आणि अठरापेक्षा कमी संख्या असेल तर? मुलांमध्ये परस्पर देवाणघेवाण कमी होते, क्लास आनंदमय करण्यासाठी ऊर्जा कमी पडते!!
ग्लॅडवेलनं मांडलेला हा रिसर्च वाचून थक्क व्हायला होतं आणि मानसशास्त्राचे अपरिचित आयाम लक्षात येतात, मनात थरार उमटतो. शिक्षणाचा इतका शास्त्रशुद्ध, मनोवैज्ञानिक विचार करण्याची आपली तयारी..

कुतूहल: नायट्रोग्लिसरिन- रॉकेटचे घनइंधन
१८४६ मध्ये इटलीमधील अ‍ॅसकॅनिओ सोब्रेरो यांनी सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल आणि ग्लिसरिन वापरून नायट्रोग्लिसरिन हे रसायन प्रथम तयार केले. त्याला ग्लिसरिन ट्रायनायट्रेट असेही एक नाव होते. काहीसे तेलकट आणि पाण्यापेक्षा दीडपट जड असलेले रसायन एक स्फोटक पण असल्याचे लक्षात आले. ते १३ अंश सेल्सिअस तापमानाला गोठते, हा एक दोष होता. त्यात एथिलिन ग्लायकॉलनायट्रेट टाकल्यावर त्याचा गोठणिबदू उणे २९ अंश सेल्सिअस झाला आणि दोषही गेला. मात्र ते सुरक्षित नव्हते. हे एक उपयुक्त धूरविरहित स्फोटक आहे आणि त्याचा उपयोग रचनात्मक कामासाठी करता येईल अशी खात्री आल्फ्रे ड नोबेल यांना होती. त्याचा वापर सुरक्षित होण्यासाठी त्यांनी काही प्रयोग केले. कीसेलगर नामक मृत्तिकेमध्ये नायट्रोग्लिसरिन मळले तर त्याची पेस्ट तयार होते. त्यांनी त्याच्या कांडय़ा केल्या. त्या खनिजाच्या खाणीमध्ये वापरायला सोयीच्या होत्या. आता त्याचे उत्पादन सुरक्षित झाल्याने मोठय़ा प्रमाणात खपू लागले. कारण त्या काळात जगात अनेक ठिकाणी विधायक कामे चाललेली होती. गनकॉटन, नायट्रोग्लिसरिन आणि क्वचित १०% कापूर वापरून नोबेल यांनी बॅलिस्टाइट नावाचे आणखी एक उत्पादन सुरू केले.
लष्करामध्ये धूम्रविरहित प्रॉपेलंट म्हणून ते अतिशय उपयुक्त ठरले. नोबेल यांनी १८८७ साली याचे पेटंट घेतले. रॉकेटसाठीचे घनइंधन म्हणून ते अजूनही वापरतात. उष्णता, दणका आणि ज्योत यापकी काहीही वापरले तरी त्याचा स्फोट होतो.
मात्र फक्त नायट्रोग्लिसरिनचा वापर करून अग्निबाणाला आवश्यक असतो तेवढा रेटा (जोर) मिळत नाही. यासाठी त्याच्या जोडीला विशिष्ट प्रमाणात नायट्रोसेल्युलोज मिसळले जाते. या मिश्रणात जर नायट्रोक्वानिडिन हे अजून एक तिसरे रसायन मिसळले तर तोफा डागण्यासाठीचा दारूगोळा तयार करता येतो. नायट्रोग्लिसरिन जर शरीरात गेले तर त्यापासून नायट्रिक ऑक्साइड तयार होते. परिणामी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. हे १८७८ मध्ये विल्यम मुरेल यांच्या लक्षात आले. तेव्हापासून विशिष्ट प्रकारच्या हृदयविकारांवर एक औषध म्हणूनही नायट्रोग्लिसरिनचा उपयोग होत आहे.
डॉ. अनिल लचके (पुणे), मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org  

प्रबोधन पर्व: तोडून टाका या स्वदेशी आपत्तींच्या बेडय़ा
‘‘आपल्या राष्ट्राच्या पायात ज्या बाह्य़ विदेशी आपत्तींच्या बेडय़ा आहेत त्या तोडण्याचें सामथ्र्य, ह्य़ा आपल्या पायात आपणच हौशीने, धर्म म्हणून घेतलेल्या ‘स्वदेशी’ बेडय़ा तोडल्याने अधिकच संचरणारें आहे. त्यातही ह्य़ा सात स्वदेशी बेडय़ा तोडणे हे स्र्वस्वी आपल्या स्वत:च्याच हाती आहे. ‘तूट’ म्हटले की त्या तुटणाऱ्या आहेत. ह्य़ा पायात आहेत तोवर आपणास चालता चढता ठोकरीमागून ठोकरी खाण्यास विपक्षाला लावता येते. पण आपण त्या तोडून टाकू निघालो तर त्या बळेच आपल्या पायास डांबून टाकण्याचे सामथ्र्य मात्र विपक्षात नाही. अस्पृश्यता आम्ही ठेवीत आहोत तोंवर आमच्या हिंदुराष्ट्रात स्पृश्य नि अस्पृश्य हे भेद विकोपास नेऊन जातवार प्रतिनिधित्व देऊन परस्पर कलह पेटवून राष्ट्रशक्तीची छकले विपक्षीय उडविणारच. पण जर आम्ही, जे बोट कुत्र्यास विटाळ न मानता लावतो तेच आपल्या स्वत:च्या बीजाच्या, धर्माच्या, राष्ट्राच्या सहोदरांस, त्या अस्पृश्यांना लावून ह्य़ा अत्यंत सोप्या युक्तीने ती अस्पृश्यताच काढून टाकली नि स्पर्शबंदीची बेडी तोडून टाकली, तर ते तीन चार कोटी धर्मबंधू आपणांपासून कोणाचा विपक्षीय लिगवू शकेल? स्पृश्य अस्पृश्य हा एक विघटक विभाग तरी चुटकीसारखा बोट लागताच नामशेष होऊ शकेल. तीच गोष्ट इतर विघटक ब्यादींची होय!’’ वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी अशी या सात बेडय़ांची वर्गवारी करत स्वा. सावरकर पुढे म्हणतात –
‘‘ह्य़ा सात बेडय़ा तोडल्या पाहिजेत. पण त्या बेडय़ा आपल्या आपणच आपल्या पायांत ठोकून घेत आलो. कोण्या विदेशीय शक्तीने त्या ठोकलेल्या नाहीत. तसे असते तर त्या तोडणे कठीण गेले असते. पण त्या आपणच केवळ हौशीने पायांत वागवीत आहोत, म्हणून तर त्यांस ‘स्वदेशी’ बेडय़ा म्हणावयाचे. ती हौस आपण सोडली की त्या तुटल्याच. ज्याने त्याने आपापल्यापुरता तरी निर्धार केला आणि त्या निर्धाराप्रमाणे आपापल्या व्यवहारात या सात बेडय़ा जुमानल्या नाहीत की झाले!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 1:58 am

Web Title: psychology of number of schools
टॅग : Psychology
Next Stories
1 कुतूहल: बंदुकीची दारू
2 टीएनटी आणि डायनामाईट स्फोटके
3 कुतूहल: खत आणि स्फोटकदेखील!
Just Now!
X