05 April 2020

News Flash

तत्त्वबोध : जगण्याचा हेतू

माणसालाच मृत्यूची भीती का वाटते? एखाद्या विषाणूची बाधा होऊ नये, असे इतर जीवांना वाटत नाही का?

मनुष्य वगळता इतर पशु-पक्ष्यादि योनींत जीवावर बेतणाऱ्या गोष्टी रोखण्याची बुद्धी जरूर आहे, पण माणसासारखी  कल्पनाशक्ती, चिंतन-मनन क्षमता नाही.

चैतन्य प्रेम
जीवनाचा प्रवाह सुरळीत सुरू असतो तेव्हा जगण्याची खरी किंमत बऱ्याचदा लक्षात येत नाही. या सृष्टीत किती अनंत प्रकारचे पशु-पक्षी आहेत, ते त्यांच्या परीनं जगतच आहेत, पण ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या न्यायानं ते सदैव आपल्याहून बलिष्ठ जीवाचं भक्ष्य बनताहेत. पण त्याही स्थितीत, जन्म-मृत्यूच्या अंतराळातलं त्यांचं जे जगणं आहे ते अनेक अंगांनी निसर्गावलंबीच आहे. एका साधकानं फार वेगळाच प्रश्न विचारला. तो म्हणाला, ‘‘देहामध्ये जे चतन्य आहे तसे सर्व सृष्टीमधील सजीवांमध्ये आहे. मग माणसालाच मृत्यूची भीती का वाटते? एखाद्या विषाणूची बाधा होऊ नये, असे इतर जीवांना वाटत नाही का? आणि तो संसर्ग झालाच तर पाळीव प्राणी सोडून अन्य प्राण्यांवर कुणी उपायही करणार नाही, असं का?’’ या प्रश्नाचा विचार करताना लक्षात येतं की, जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा अविरत प्रवाह आहे. मनुष्य वगळता इतर पशु-पक्ष्यादि योनींत जीवावर बेतणाऱ्या गोष्टी रोखण्याची बुद्धी जरूर आहे, पण माणसासारखी  कल्पनाशक्ती, चिंतन-मनन क्षमता नाही. त्यामुळे एखाद्या रोगाची, त्यानं होणाऱ्या संभाव्य मृत्यूची भीती त्या प्राण्यांत नाही. त्यामुळेच निसर्गप्रवाहावर विसंबून ते जगतात. पण जेव्हा एखादी वस्तू वा गोष्ट आपल्या जिवावर बेतते हे त्यांना अनुभवानं कळतं तेव्हा त्या गोष्टीपासून, औषधापासून, उपकरणापासून आपला बचाव करण्याचं सामूहिक शहाणपणही हे पशु-पक्षी आश्चर्यकारकरीत्या शिकतात आणि संक्रमितही करतात. त्यामुळे माणसाआधी एखाद्या विषाणू संसर्गासारख्या संकटावर हे पशु-पक्षी अगम्य उपायांनी मात करत असतीलही! असो. मुद्दा हा की, या सृष्टीत पशु-पक्षी आणि माणूस या दोघांचं अस्तित्व हे सत्य आहे, पण त्या अस्तित्वाचं भवितव्य प्रत्येक काळी, प्रत्येक क्षणी अज्ञात आणि अनिश्चितच होतं आणि या काळातही त्यात बदल झालेला नाही. पण अगदी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे, जीवन अनिश्चित, अशाश्वत आहे, हे पूर्ण माहीत असतानाही आणि आजूबाजूला दृष्टी टाकल्यानं उमजत असतानाही आपण जगण्याची अपूर्वाई खऱ्या अर्थानं जाणतोच असं नाही. जीवनाचा प्रवाह सुरळीत सुरू असतो तेव्हा या जगण्याची किंवा जगू शकण्याची खरी किंमत, खरं मोल बऱ्याचदा लक्षात येत नाही. ते मोल आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण जगतो खरं, पण का जगतो आणि कशासाठी जगतो, हे उमगलं असतं का हो? श्रीगोंदवलेकर महाराज यांचं एक वचन आहे की, ‘‘ज्याचं ध्येय ठरलं, त्यालाच खरा आनंद आहे!’’ आणि गमतीचा भाग असा की, ‘आनंद’ हेच आपलं जगण्याचं ध्येय आहे! माणसाचं सोडा, या चराचरातला प्रत्येक जीव खरं तर आनंदासाठीच जगतो आणि आनंद आहे तोवरच खऱ्या अर्थानं जगतो! म्हणजे जीवनात दु:ख नसतं का? असतंच असतं, पण ते दुखही आनंदाच्या आशेवर सोसलं जातं. जगण्यातला आनंद पूर्ण ओसरला अशी भावना झाली, तर ते जगणं मृतवतच भकास भासू लागतं. तेव्हा आनंद हेच आपलं ध्येय आहे आणि जगणं जोवर आनंदाचं होत नाही, तोवर आपल्याला चनही पडणार नाही. मग हा आनंद कुणी आपल्या कलोपासनेतून मिळविण्याचा प्रयत्न करतो, कुणी समाजाला आनंदी करण्याचा वसा जोपासत मिळवू पाहतो, कुणी काही तत्त्व उरी बाळगून त्यानुसार जगून तो मिळवू पाहतो, कुणी स्वच्छंदी जगून मिळवू पाहतो. मार्ग भिन्न भिन्न असतात, पण हेतू म्हणा, ध्येय म्हणा, एकच असतं ते म्हणजे आनंद!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:05 am

Web Title: purpose of life dd70
Next Stories
1 मनोवेध : वेदनामुक्तीसाठी पूर्णभान
2 कुतूहल : जंगल
3 मनोवेध : एकाग्रता ध्यान
Just Now!
X