बटेरपालन हा व्यवसाय अत्यंत सोपा व फायदेशीर आहे. बटेर पक्षी कुक्कुटपालन व्यवसायातील लहान वर्गात मोडणारा पक्षी आहे. जगात व्यवसायाच्या दृष्टीने बटेर पक्षी जपानने प्रथम पाळला. हा व्यवसाय प्रामुख्याने चवदार मांस व अंडी उत्पादनासाठी केला जातो.
बटेरपालनासाठी जागा कमी लागते. त्यामुळे जागेसाठी जास्त खर्च येत नाही. मादी पक्षी सहा ते सात आठवडय़ांत अंडी देण्यास सुरुवात करते. पहिल्या वर्षांत मादी जवळपास ३०० अंडी देते व नंतर दुसऱ्या वर्षी १६०-१७० अंडी देते. बटेर पक्ष्याच्या अंडय़ांमध्ये स्निग्धांश कमी असतो. त्यामुळे या अंडय़ांना बाजारात वाढती मागणी आहे. हे पक्षी पाच आठवडय़ांत विक्रीस उपलब्ध होतात. त्यामुळे पक्ष्यांची विक्री लवकरात लवकर करता येते व फायदा लवकर मिळतो.
बटेरचे मांस चवदार व रुचकर असून रक्तदाब व मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. हे पक्षी जंगली प्रकारात मोडणारे असल्याने त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. त्यांच्या अंडय़ांपासून लोणचे, खारवट अंडे असे विविध पदार्थ बनवले जातात. त्यांना बाजारात वाढती मागणी आहे.
बटेर भारतास फार थोडय़ा काळापूर्वी परिचित झाला असला तरी लवकरच लोकप्रिय झाला आहे. साधारणत: १९७४ पासून भारतात बटेरपालनाची सुरुवात झाली.
बटेरपालनासाठी बटेर पक्ष्यांच्या प्रामुख्याने पाच जाती आहेत :
१) फोरोह : या जातीच्या पक्ष्यांच्या पिसांचा रंग काळा व तपकिरी असा संमिश्र स्वरूपाचा असतो. नराच्या गळ्याचा भाग तपकिरी असतो तर मादीमध्ये राखाडी रंगाचा असतो.
२) इंग्लिश व्हाइट : या जातीच्या पक्ष्यांच्या पिसांचा रंग पांढरा तर डोळ्यांचा रंग गडद काळा असतो.
३) ब्रिटिश रेंज : या जातीच्या पक्ष्यांमध्ये नर व मादी दिसायला सारखेच असतात. त्यांच्या पिसांचा रंग गडद असतो.
४) मंचुरियन गोल्डन : यांच्या पिसांचा रंग सोनेरी असतो.
५) तुक्सेडो : ही जात दोन रंगांत आढळते. पक्ष्यांच्या गळ्याखालील भाग गडद काळ्या रंगाचा असतो. उर्वरित भाग पांढऱ्या रंगाचा असतो.
-आचल शंभरकर , रितेश निकम (परभणी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – पाणिनी
असे म्हणतात की माणूस जसजसा बोलतो किंवा लिहितो तसतसा तो उघडा पडत जातो. यावर आणखी कडी अशी की जर एखादा माणूस दुसऱ्यांबद्दल बोलू लागला तर त्या दुसऱ्याच्या ऐवजी तो स्वत:चेच दर्शन जगाला घडवतो याचे कारण सगळे बोलणे किंवा लिहिणे शेवटी प्रथमपुरुषी एकवचनी असते. सभेत बोलताना आपण सारे किंवा स्वत:च्या समाजाविषयी बोलताना आम्ही हा शब्द शेवटी स्वत:च्या कल्पना मांडण्यातच यशस्वी होतो. प्रथमपुरुषी एकवचनी ही शब्द रचना व्याकरणाचा भाग असते.
शंकराचार्याकडे एक विद्यार्थी शिकायला म्हणून गेला तेव्हा त्याला त्यांनी पाच वर्षे व्याकरण शीक मग माझ्याकडे ये असे म्हटल्याची कथा सांगतात. हल्ली हल्ली विटगनस्टाइन नावाच्या तत्त्वज्ञानेही भाषा व्याकरण आणि अर्थ आधी पक्के करा मग बोला, असा आग्रह केला होता. जगातला सर्वात समर्थ व्याकरणकार म्हणून पाणिनी प्रसिद्ध आहे. त्याने त्या काळच्या संस्कृत वाङ्मयाला व्याकरणाने बांधले आणि म्हणूनच पुढे संस्कृतात सुसंबद्ध रचना तयार झाल्या असे इतिहास सांगतो. योगसूत्राचे रचनाकार पातंजलीने हे पाणिनीचे ऋण मान्य केले आहे. हे व्याकरण तयार करायचे ठरल्यावर ते एका खोलीत बसून करता येणार नाही त्यासाठी जनतेत जावे लागेल ही जाणीव पाणिनीला प्रथम झाली. गावांमधून, आश्रमांमधून मंत्रीपरिषदेच्या बैठका, सैन्य, व्यापारी आणि श्रम करणाऱ्यांच्या बोलीभाषेतून असंख्य शब्द, वाक्प्रचार, म्हणी त्याने गोळा केल्या. तसेच शेती, निरनिराळे खेळ, नृत्य, अर्थव्यवहार, चालीरीती या आणि अशा अनेक गोष्टींमधून त्याने शब्दांचा ढीग आधी रचला आणि मग त्यातून ते जोडून वापरण्यासाठीचे जे नियम तयार केले ते अष्टाध्यायी नावाच्या ग्रंथात एकत्र केले आणि जगातल्या सर्वच भाषाकारांनी पाणिनीचे हे अद्वतीयत्व मान्य केले आहे.
संस्कृत ही अनेक भाषांची पुढे जननी ठरली ते या व्याकरणामुळे घडले. पाली आणि अर्धमागधी या भाषा संस्कृतच्या अपभ्रंशातून निर्माण झालेल्या भाषा आहेत आणि त्यातूनच बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञान सांगण्यात आले.
योग किंवा मानसशास्त्राचा लेखक पातंजली आणि नंतर गौतमाने सांगितलेले न्याय किंवा तर्कदर्शन व त्याची मांडणी या व्याकरणाच्या मुशीतूनच बाहेर पडू शकली. आणि मग भौतिक पदार्थाविषयी जे शास्त्र कणाद ऋषीने सांगितले होते ते समजण्यासाठी तर्कशास्त्र आणि ही भाषाच उपयोगी पडली.
परमाणू हा शब्द कणादाने वापरला आणि प्रत्येक पदार्थ परमाणूंचा बनतो असेही तत्त्व मांडले.
या सगळ्यांमधून शेवटी वेदांताचा जन्म झाला. ते वेदांत शास्त्र आजही दोन हजार वर्षांनंतर तितकेच टवटवीत राहिले आहे. त्याबद्दल लवकरच.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – कॅन्सर : गुदाचा असाध्य विकार- भाग १२
वर्ष- सहा महिन्याने आलेला एखादा गुद कॅन्सरचा रुग्ण आपली हकीकत सांगू लागला की, माझे पोटात धस्स होते. कारण माझी मोठी मावशी याच विकाराने ग्रस्त होऊन ‘गेली.’  मावशीच्या रागाला घाबरून मी सुखसारकचूर्ण, गंधर्वहरितकी, मलशुद्धीचूर्ण, कपिलादिवटी, अश्वकंचुकी, इच्छाभेदी, नाराचरस अशी औषधे ‘मागणीप्रमाणे’ देत असे. काही वेळेस ही कुटकी, बाहवामगज, बाळहिरडा, सोनामुखीपाला, शेंगा यांच्या काढापुडय़ा वापरत असे. खूपच तीव्र जुलाबांनी अशक्तपणा आला तर इसबगोल भुशी घेत असे. मधून मधून एरंडेल तेलाची पोळी, काळ्या मनुका यांचा मारा चालत असे. अशी खूप खूप पोट साफ होण्याची आयुर्वेदिय व अ‍ॅलोपॅथीतील काही स्ट्राँग औषधे घेऊनही गुदअवयवाचे आरोग्य पूर्णपणे कोलमडल्यावर तिच्या गुदतपासणीत कॅन्सरची बाधा आढळली. डॉक्टरांच्या मते तो ‘थर्ड स्टेज कॅन्सर’ होता. ‘राजा हा माझा कॅन्सर तुला बरा करता येणार नाही का?’ अशी आळवणी तिने केली. मी तिला सर्व स्ट्राँग औषधे थांबवून सौम्य औषधे घेशील का, असे विचारले. गुदभागात असह्य़ वेदना, लाली, स्पर्शासत्व खूपच असल्यामुळे पिचकारी, मात्रा बस्ती, निरुहबस्ती देणे अशक्यच होते.
गुलाबद्राक्षासव, अभयारिष्ट, बाहवामगज, बाळहिरडा, आवळकाठी, कुटकी अशा सौम्य औषधांचा काढा नि:काढा काही काळ दिला. तात्पुरता आराम मिळाला. गुदवाटे रक्त पडणे थांबण्याकरिता प्रवाळ, कामदुधा, मौक्तिकभस्म दिले असो.
मावशीचे वय त्यावेळी ८५ होते. खूप खूप औषधांना, वेदनांना ती कंटाळली होती. जैन पंथियांच्या प्रथेप्रमाणे तिने एक दिवस सर्व औषधे बंद केली. हळूहळू अन्नत्याग करून ती शांतपणे मृत्यूला सामोरी गेली. तिच्या या विकाराने मला औषधी वापराबद्दल खूप खूप शिकायला मिळाले. मलावरोध या विकारात सुरुवातीपासूनच खूप स्ट्राँग औषधे घेतल्यामुळे विशेषत: जमालगोटा, सोनामुखी अशांमुळे रुग्णाला ‘वरचे बोलावणे’ लवकर कसे येते हे शिकायला मिळाले!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –  ३ ऑक्टोबर
१९०० > पत्रकार व ‘प्रभात’ चे संपादक श्रीपाद शंकर नवरे यांचा जन्म. नवरे यांनी अन्य वृत्तपत्रांतही लेखन केले. सिद्धहस्त पत्रकार म्हणून ख्याती असलेल्या नवरे यांनी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल लिहिलेले मृत्युलेख विशेष गाजले.
१९०७ > निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि ‘मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास’ म्हणून गौरविले गेलेले नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म.
१९५९ > विडंबनकार व विनोदी लेखक दत्तू बांदेकर यांचे निधन. चित्रा साप्ताहिक व अत्र्यांच्या ‘नवयुग’मधून त्यांनी लिहिलेली सदरे लोकप्रिय झाली. ‘सख्याहरी’, ‘अति-प्रसंग’, ‘बहुरूपी’ हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह, ‘विचित्र चोर’, ‘जावईशोध’ ही नाटके, ‘चुकामूक’ ही लघुकादंबरी यांना पुस्तकरूप लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्त्व व लेखनकार्याचा आढावा घेणारे ‘कारुण्याचा विनोदी शाहीर’ हे पुस्तकही पुढे प्रसिद्ध झाले.
१९८६ > लेखक, समीक्षक सदाशिव शिवराम भावे यांचे निधन. मराठी व इंग्रजी नियतकालिकांत विपुल लेखन (सुमारे ३०० लेख) त्यांनी केले. ‘अमेरिका नावाचे प्रकरण’ हे त्यांचे एकमेव गाजलेले पुस्तक, परंतु अनेक पुस्तकांच्या संपादनात स.शिं.चा वाटा होता.
– संजय वझरेकर