बटेर हा जंगली वर्गात मोडत असलेला पक्षी असून राणीखेतसारख्या रोगांना प्रतिकारक असतो. पण इतर रोगांना तो बळी पडतो.
१) अल्सरेटीव इंट्रेटेटीस : हा आजार अंतर्गत रोगांमध्ये मोडतो. या रोगाची लक्षणे प्रामुख्याने लहान वयात आढळतात. हा रोग काही जीवाणूंमुळे होत असून रोगाची लागण दूषित घनपदार्थामुळे होते. या रोगामध्ये लहान पक्ष्याच्या मरतुकीचे प्रमाण जवळपास ८० टक्केपर्यंत असते. या रोगात पक्ष्यांना पाण्यासारखी पातळ हगवण होते आणि पक्षी लवकर कमकुवत होऊन मरतात. या रोगाची लक्षणे दिसून आल्यास पक्ष्यांना बक्ट्रेसीन, स्ट्रेप्टोमायसीन आणि क्लोरोमायसेटीन  या औषधांचा उपयोग करावा. स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट एक ग्रॅम प्रती लिटर पिण्याच्या पाण्यात मिसळून १० दिवस द्यावे. हा रोग पक्ष्यांना न होण्यासाठी पूर्ववत स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट एक ग्रॅम साडेचार लिटर पिण्याच्या पाण्यात चार आठवडय़ाच्या पक्ष्यांना द्यावे.
२) क्वेल ब्राँकायटिस : हा रोग प्रामुख्याने जिवाणूंमुळे होतो. कोंबडय़ांमध्ये होणाऱ्या ब्राँकायटिसपेक्षा हा रोग वेगळा आहे. प्रामुख्याने लहान वयाच्या पिल्लांत हा रोग होतो. त्यामुळे त्यांच्या श्वसनसंस्थेमध्ये बिघाड होतो. हा रोग मुख्यत्वे तीन आठवडय़ांच्या पक्ष्यांमध्ये जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे ६० ते ७० टक्के पक्ष्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण आढळते.
३) एस्पर्जिलोसिस: हा रोग मुख्यत्वे एस्पर्जिलोसिस फ्यूमीगेटस या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार दूषित खाद्य व पिल्लांसाठी लागणारी भुशांची गादी यांतून होतो. या रोगामध्ये पक्ष्यांना श्वसनाच्या ठोक्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन पक्षी कमी खाद्य खातात. त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. पक्ष्यांना ताप येतो. जास्त आठवडय़ांच्या पक्ष्यांमध्ये डोळ्यांच्या पापण्या सुजतात. यासाठी पक्ष्यांना बुरशी विरहीत खाद्य व भुश्याची गादी द्यावी. पक्ष्यांना लागणारी उपकरणे र्निजतुक करावी. अंडी उबवण्याच्या खोलीमध्ये आद्र्रतेचे प्रमाण कमी ठेवावे. पक्ष्यांच्या खाद्यामध्ये कॅल्शियम प्रोपीनेट दोन किलो प्रती टन या प्रमाणात मिसळावे. यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. कॉपर सल्फेट एक ग्रॅम २००  लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळून रोग असेपर्यंत पक्ष्यांना पाजावे. यामुळे रोगाचे प्रमाण कमी होते.
– सागर भुतकर (परभणी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – योगसूत्र
आत्मा, सृष्टी किंवा विश्वाचा उगम याबद्दल सांगण्याचा मक्ता मी घेतलेला नाही, हे बुद्धाने त्याच्या शिष्याला दिलेले रोखठोक उत्तर आणि त्यानंतर ‘‘समजा सांगितले तरी तुला समजायला हवे ना?’’ या वाक्यातला उपरोध वैदिक वाङ्मयातही उमटलेला आहे, हे लक्षात घ्यावे लागते. ‘‘ज्याच्यातून हे चालते-बोलते विचार करणारे मनुष्यत्व किंवा निसर्ग निर्माण झाला त्याला तरी यामधले गूढ समजले की नाही, कोण जाणे?’’ असा स्पष्ट उल्लेख आहे. अर्थात हे सारे लोटून दिले तरी प्रश्न विचारण्याची खोड काही जात नाही. माळ्यावर वस्तू टाकल्या तरी नव्या वस्तूंचा ओघ काही थांबत नाही आणि माळ्यावरच्या वस्तू खाली काढल्या तर घरातल्या आणि माळ्यावरच्या वस्तू सारख्याच आहेत, हे लक्षात येते.
मन जगात असते आणि जगात मन असते. हे विचित्र कोडे सोडवायचे असेल तर दोन्ही वस्त्या एकच असणार, असा एक विचार आहे. त्याने कोडे सुटते. आपण एक, जग दुसरे, देव तिसरा अशा मनोवृत्तीत माणसाला त्रास होत नसेल तर त्याने तसे जरूर जगावे.
माझ्या दूरच्या एक आजीबाई होत्या. त्या म्हणायच्या, मला स्वर्ग किंवा मोक्ष नको. मला इथेच जन्म हवा आहे. माझे इथे उत्तम चालले आहे. जो जे वांछिल तो ते लाहो, हेच खरे; परंतु जग किंवा इतर व्यक्ती किंवा स्वत:चेच मन त्रास देत असेल तर मग इतरांना दावणीला बांधायच्या आधी स्वत:चे मन दावणीला बांधणे श्रेयस्कर असे.
पातंजलीने बौद्धाच्या पश्चात म्हटले खरे; परंतु एका महत्त्वाच्या परंतु सूक्ष्म फरकाने म्हटले. त्यात निखळ चैतन्याशी समरूप होणे म्हणजे मनातली कोळिष्टके झटकून टाकून निरुद्ध होणे, हा उपाय सांगितला आहे. मूढपणात चित्त आळशी असते, चळवळ्या चित्तात जगायची उठाठेव असते. या दोन्हींहून थोडे निराळे सुधरू लागलेले चित्त नादी किंवा विक्षिप्त असते. हा विक्षिप्तपणा ओहोटीस लागला की, चित्त एकाग्र होऊ शकते आणि पुढे एकाच अग्रावर केंद्रित (एकाग्र) असलेले हे चित्त ही एकुलती एक गोष्ट सोडून निरुद्ध होते. रिकामे पडते आणि मग बुद्धी ज्यापासून आली त्या चैतन्याच्या तरंगावर डोलू लागते, अशी ही कल्पना आहे.
आता उत्तम अनुभव घेतलेले हे मनचित्त जेव्हा जगाच्या प्रवासाला निघते तेव्हा प्रसन्नपणे जगाबरोबर राहते. हे प्रसन्नचित्त शरीराला एका अर्थाने चाकर बनविते. आपल्याला वाटते, शरीर अन्न खाते. ते खोटे आहे. आहार-विचार-विकार मनचित्ताची देण आहे.
योगाभ्यास ही गोष्ट श्वासापुरती मर्यादित नाही. आपल्या सगळ्या तृष्णांवर बुद्धीच्या साहाय्याने नजर ठेवावी. घोडय़ाला चाबूक दाखविणे पुरते. त्याला झोडपून काहीही साध्य होत नाही.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – कॅन्सर स्वादुपिंडाचा दुर्मीळ विकार- भाग १४
सिऱ्हॉसिस ऑफ दि लिव्हर या विकारात प्रथम यकृतशोध नंतर यकृतसंकोच; प्रथम कावीळ मग जलोदर अशी कारणपरंपरा असते. हा रोग तुलनेने बरा करायला सोपा आहे. कारण यात आनुवांशिकता नसते, पण स्वादुपिंडाचे विकार हे बहुधा आनुवंशिक असतात. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे या रोगामागे जेनेटिक डिसऑर्डर असते. नेमक्या निदानासाठी सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एफएनएसी, गरज पडली तर बायोप्सी करून तुकडा वा पेशी तपासल्या जातात.
स्वादुपिंडाचे प्रमुख कार्य शरीरातील इन्शुलिनवर नियंत्रण ठेवणे व त्याचबरोबर पाचकस्राव पुरेसे पुरवून चांगले आरोग्याला मदत करणे. स्वादुपिंडाच्या कॅन्सरची सुरुवात चोर पावलाने होते. इन्सुलिनचा डोस कमी अधिक करूनही मधुमेह नियंत्रणात येत नाही. मधुमेह हा विकार प्राचीन काळापासून मानवाला त्रस्त करत आलेला आहे.
आयुर्वेदीय शास्त्रकारांनी प्रमेह विकाराचे म्हणजे वारंवार लघवी होण्याच्या वीस प्रकारच्या रोगांचे वर्णन केलेले आहे. हे वीस प्रकारचे प्रमेह बळावले; खाण्या-पिण्यात हयगय केली तर त्यांचे रूपांतर शेवटी मधुमेहातच होते.
मधुमेहाची औषधे, इंजेक्शने चालू असूनही रक्तशर्करा नियंत्रणाच्या बाहेर जाते किंवा एकदम कमी होते. वजन खूप वाढते किंवा खूप घटते. पचन बिघडते. स्वादुपिंड काढून टाकण्याचा सल्ला वैद्यकीय तपासण्यानंतर दिला जातो.
हे सर्व टाळण्याकरिता एकाच वेळी दोन आघाडय़ांवर आरोग्य अनारोग्याची लढाई लढावी लागते. मधुमेह नियंत्रणात हवा, पचन सुधारावे याकरिता सकाळ सायंकाळी आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, मधुमेहवटी, गोक्षुरादि, त्रिफळा गुग्गुळ, पुष्टीवटी, रसायनचूर्ण, दोन्ही जेवणानंतर पिप्पलादिकाढा, आम्लपित्तवटी, प्रवाळपंचामृत, कटाक्षाने बेलाच्या पानांचा काढा, ज्वारी, पुदिना, आले लसूण, ओली हळद अशी चटणी, चार वेळा विभागून, जेवण, फिरणे, किमान व्यायाम हवाच.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – ५ ऑक्टोबर
१८८८ > ‘मुलांचा महाराष्ट्र’ या इतिहासकथनपर पुस्तकाचे लेखक गोविंद अनंत मोडक यांचा जन्म. ‘युरोपचे आधारस्तंभ’, ‘मर्दानी झाशीवाली’, ‘इंग्लंडचा इतिहास’ ही पुस्तकेही त्यांनी लिहिली होती.
१९२२ > सानेगुरुजींच्या ‘धडपडणाऱ्या मुलां’पैकी एक, अशी ओळख असलेले लेखक, ‘साधना’ साप्ताहिकाचे दीर्घकाळ संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म. ‘चले जाव’ पासून ‘एक गाव एक पाणवठा’, ‘मुस्लीम सत्यशोधक’ अशा अनेक चळवळींशी त्यांचा संबंध होता व त्याचे वैचारिक प्रतिबिंब त्यांच्या राजकीय-सामाजिक लेखांत दिसे. कादंबरी, बालकादंबऱ्या, कथा आणि ‘प्रतिज्ञा’ हे भारतीय प्रतिज्ञेच्या शब्दा-शब्दाचा अर्थ उलगडणारे पुस्तक असे विपुल लेखन त्यांनी केले होते. थत्ते यांचे निधन १९९८ साली झाले.
१९३४ > वैदर्भीय कवी अण्णाजी बोबडे यांचे निधन. ‘बोबडे यांची कविता’ हे संकलन मरणोत्तर प्रकाशित झाले.
१९३५ > कवी डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे यांचा जन्म. ‘आतून बंद बेट’ व ‘थांग अथांग’ आदी सहा काव्यसंग्रहांसह त्यांची १५ पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत.
– संजय वझरेकर