रेशीम वस्त्राची गुणवत्ता रेशीम कीटकाने निर्माण केलेल्या रेशीम धाग्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यासाठी पूर्ण वाढीच्या रेशीम कोशाची लांबी, रुंदी, कवचाची जाडी, रिळांवर पूर्णपणे गुंडाळता येणाऱ्या अखंड धाग्याची लांबी, जाडी, वजनाचं एकक, ताणक्षमता अशा मोजमापन कसोटय़ांचा गुणवत्ता ठरवण्यासाठी उपयोग होतो. अर्थात ही गुणवत्ता रेशीम कीटकाची जात, संगोपनाचा हंगाम, संगोपनगृहाची व्यवस्था, कोश काढणीच्या वेळची परिस्थिती आणि तुतीची गुणवत्ता अशा घटकांवर अवलंबून असते.

संकरित वाणांच्या सुकवलेल्या कोरडय़ा कोशाचं सरासरी वजन १.५ ते १.८ ग्रॅम असतं. कवचाची सरासरी जाडी एका टोकाकडे ३३६ ते ५९४ मायक्रॉन व मध्य भागात ७१२ मायक्रॉन असते. गुणवत्ता ठरवण्यासाठी (कवचाचं वजन)/(पूर्ण कोशाचं आतील कीटकासह वजन) १०० हे गुणोत्तर वापरतात. यावर गुंडाळण्याजोग्या रेशीमधाग्याची उपलब्धता अवलंबून असते. नरकोशाचं वजन मादीकोशापेक्षा अधिक भरतं.

एका कोशातून रेशीम कीटकांच्या जातीनुसार मिळणारा अखंड रेशीमधागा सरासरी ६०० ते १५०० मीटर लांबीचा असतो. यामध्ये २० टक्के धागा वाया जाऊ शकतो. वस्त्रनिर्मितीसाठी प्रथम- पाच-सहा वा जास्त कोशांच्या धाग्यांची एकत्र गुंडाळणी करून रिळे बनवावी लागतात. कोशांच्या धाग्यांची गुंडाळण क्षमता ठरवण्यासाठी पुढील गुणोत्तर वापरतात.

गुंडाळण क्षमतेची टक्केवारी =  गुंडाळण केलेल्या कोशांची संख्या

एकत्रित गुंडाळणी केलेल्या धाग्यांची संख्या ७ १००

साधारणत: अशी क्षमता सरासरी ४० ते ८० टक्के भरते. रेशीमधाग्यांचा आकार मोजण्यासाठी ‘डेनिअर’ हे एकक वापरतात. एक डेनिअर म्हणजे ४५० मीटर लांबीच्या धाग्याच्या वजनाला ०.०५ ग्रॅमने  भागून मिळणारे गुणोत्तर होय.  कोशाच्या कवचाच्या सर्वात बाहेरील थरातला धागा भरड असतो. तर मध्यावरचा तलम असतो. या ठिकाणचं डेनिअरमापन भिन्न असतं.

रेशीमधाग्याचे रासायनिक घटक टक्केवारीने पुढीलप्रमाणे असतात.  फायब्राइन – ७२ ते ८१, सेरिसीन – १९ ते २८, मेद व मेण – ०.८ ते १  आणि रंगकण १  ते १.४.  धाग्यांचं विशिष्ट गुरुत्व या घटकांच्या प्रमाणावरून ठरतं. ते सर्वसाधारणपणे १.३२ ते १.४ असतं. धाग्याची सरासरी ताणक्षमता २.६ ते ४.८ ग्रॅम/डेनिअर आणि लांब होण्याची क्षमता १८ ते २३ टक्के असते. रेशीमधागा विणकामात वापरताना त्याचा आद्र्रताशोषण गुणधर्मही विचारात घेतात. तो ठरविण्यासाठी  डेनिअर =  (धाग्याचं वजन (ग्रॅम))/(धाग्याची लांबी) ९००० हे गुणोत्तर उपयोगी ठरतं. आद्र्रतेप्रमाणेच प्रकाशाचाही परिणाम धाग्यावर होतो. रेशीमधागा वीजवहनाला अडथळा ठरतो; परंतु तो स्थितिक विद्युतऊर्जा संग्रहित करू शकतो.

डॉ. क. कृ. क्षीरसागर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

कुसुमाग्रजांचे साहित्य

कुसुमाग्रजांचे १७ कवितासंग्रह, १९ नाटके, सहा एकांकिका, ३ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह आणि ५ ललितलेखसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. पण कथा- कादंबरीपेक्षा ते काव्य आणि नाटक या वाङ्मयप्रकारात अधिक रमलेले दिसतात. कविता त्यांनी ‘कुसुमाग्रज’ या नावाने तर बाकीचे गद्यलेखन वि. वा. शिरवाडकर या नावाने केले.

१९४४ पासून शिरवाडकरांनी जी नाटके लिहिली त्यांत काही भाषांतरित- रूपांतरित आहेत. काही ऐतिहासिक, पौराणिक आहेत तर काही स्वतंत्र आहेत, पण ती सर्व भव्यतेची पूजा करणारी नाटके आहेत. त्यांचे गद्यलेखन आशयसंपन्न आणि शैली समृद्ध आहे. त्यांच्या कवितेत नाटय़ आणि नाटकात काव्यात्मकता सहजपणे प्रकट होते. त्यांनी काही एकांकिकाही लिहिल्या. शेक्सपीअरच्या नाटकांची भाषांतरे केली. ‘वैष्णव’ ही स्वातंत्र्यसंग्रामाच्या पाश्र्वभूमीवरची कादंबरी, ‘विरामचिन्हे’सारखा ललितलेखसंग्रह. ‘जादूची होडी’सारखा बालकथासंग्रह, ‘जाईचा कुंज’, ‘श्रावण’सारखे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दूरचे दिवे’, ‘वीज म्हणाली धरतीला’ इ. नाटके, पण प्रचंड गाजले ते त्यांचे ‘नटसम्राट’ हे नाटक. अनेक भारतीय भाषांत या नाटकाचे अनुवाद झाले आहेत. जुलै १९६१ मध्ये त्यांनी ‘कुमार’ हे कुमार वयोगटासाठी मासिक सुरू केले. काही काळ संपादनही केले. ‘सती सुलोचना’ या बोलपटाचे लेखन केले. पदवीधर झाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपटाच्या दुनियेत डोकावून पाहिले, पण तिथे वाव न मिळाल्याने ते पत्रकारितेकडे वळले. आयुष्यभर उपजीविकेसाठी त्यांनी लेखणीचाच आश्रय घेतला.

कुसुमाग्रजांच्या कवितांचे, नाटकांचे गारूड वाचकमनावर इतके आहे की, त्यांच्या ललितलेखनाकडे म्हणावे तसे वाचकांचे लक्ष गेलेले दिसत नाही. पण कवी कुसुमाग्रज, नाटककार वि. वा. शिरवाडकर या लेखकाची माणूस म्हणून ओळख करून घ्यायची, त्यांची विचारधारा, त्यांची भावावस्था जाणून घ्यायची तर त्यांचे लघुनिबंध- ललितलेख वाचायला हवेत. एकूण पाच ललितलेखसंग्रह प्रसिद्ध झाले असून १९५७ मध्ये त्यांचा ‘आहे आणि नाही’ हा पहिला लेखसंग्रह प्रकाशित झाला.

निसर्गातील भव्यता, सौंदर्य, माणूस शोधण्याचा प्रयत्न, थोर व्यक्तिमत्त्वातील छोटय़ा छोटय़ा घटना, प्रसंग हे सारे या ललितलेखांत वाचायला मिळते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com