इ.स. १८९६ मध्ये हेन्री बेक्वेरेलने युरेनियममधील किरणोत्साराचा शोध लावला. या किरणोत्साराचा स्रोत नक्की कुठला आहे याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली. याच काळात मारी क्युरी ही पोलिश युवती पॅरिसमधील स्कूल ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री या संस्थेतील, पिअरे या आपल्या नवऱ्याच्या प्रयोगशाळेत संशोधन करत होती. आपल्या संशोधनात ती विविध मूलद्रव्यांतील किरणोत्साराचा सखोल शोध घेत होती. युरेनियमची पिचब्लेंड आणि कॅल्कोलाइट ही खनिजे अभ्यासताना मारी क्युरीला एक विलक्षण गोष्ट आढळली. या खनिजांत, युरेनियमच्या प्रमाणानुसार अपेक्षित असलेल्या किरणोत्सारापेक्षा अधिक किरणोत्सार आढळून येत होता. यावरून मूळ खनिजामध्ये युरेनियमशिवाय आणखी एखादे किरणोत्सारी मूलद्रव्य असावे, असा तर्क मारीने लढवला. मारी व पिअरे क्युरी, दोघेही आता त्या दिशेने प्रयोग करू लागले.

पिचब्लेंडपासून शुद्ध युरेनियम वेगळे केल्यानंतर मागे राहणाऱ्या द्रवातही लक्षणीय प्रमाणात किरणोत्सार अस्तित्वात असल्याचे मारी आणि पिअरे क्युरीला आढळले. त्यांनी या द्रवाचे रासायनिक क्रियेद्वारे दोन भाग केले. यातला एक भाग बिस्मथयुक्त होता, तर दुसरा भाग बेरियमयुक्त होता. क्युरी दाम्पत्याने प्रथम बिस्मथयुक्त भागावर आपले लक्ष केंद्रित केले. अवक्षेपणाची (प्रेसिपिटेशन) क्रिया पुन:पुन्हा करून त्यांनी अखेर बिस्मथपासून हे तीव्र किरणोत्सारी मूलद्रव्य वेगळे केले. जुलै १८९८ मध्ये या मूलद्रव्याचे अस्तित्व नक्की झाले. मारी क्युरीने पोलंड या आपल्या मायदेशाच्या सन्मानार्थ सुचवलेले ‘पोलोनियम’ हे नाव या मूलद्रव्याला दिले गेले. त्यानंतर बेरियमयुक्त द्रावणातही तीव्र किरणोत्सार आढळत असल्याने यावरही स्फटिकीभवनाची क्रिया करून त्यांनी त्यातून बेरियमचे रेडियमयुक्त स्फटिक वेगळे केले. या स्फटिकांचा वर्णपट घेतल्यानंतर त्यात नवे मूलद्रव्य अस्तित्वात असल्याचे नक्की झाले. डिसेंबर १८९८ मध्ये शोधल्या गेलेल्या, बेरियमसारखेच गुणधर्म असणाऱ्या या नव्या किरणोत्सारी मूलद्रव्याला मारी क्युरीच्या सूचनेनुसार ‘रेडियम’ हे नाव दिले गेले.

युरेनियमपेक्षा लक्षावधी पटींनी तीव्र किरणोत्सारी असणाऱ्या, या पोलोनियम आणि रेडियमच्या शोधासाठी क्युरी दाम्पत्याला अथक परिश्रम करावे लागले. अत्यल्प प्रमाणातील हे पोलोनियम आणि रेडियम वेगळे करण्यासाठी क्युरी दाम्पत्याला अक्षरश: टनावारी पिचब्लेंड खनिजावर रासायनिक प्रक्रिया करावी लागली. मादाम क्युरीला पोलोनियम आणि रेडियमच्या शोधाबद्दल रसायनशास्त्राचे १९११ सालचे नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org