07 March 2021

News Flash

रेडॉन खरंच निष्क्रिय आहे का?

रेडिअम, थोरॉन आणि अ‍ॅक्टिनिअमच्या वेगवेगळ्या संयुगांमधून बाहेर पडणारा किरणोत्सारी वायू हा एकच आहे.

रेडिअम, थोरॉन आणि अ‍ॅक्टिनिअमच्या वेगवेगळ्या संयुगांमधून बाहेर पडणारा किरणोत्सारी वायू हा एकच आहे, हे न समजल्याने रेडॉन मूलद्रव्याचा शोध लागूनसुद्धा त्याला मान्यता मिळण्यासाठी वीस वर्षांपेक्षा जास्त काळ जावा लागला.

विल्यम रॅम्झी याने १९०४ साली रेडिअम, थोरॉन आणि अ‍ॅक्टिनिअमच्या संयुगांमधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सारी वायूंच्या वर्णपटाचा अभ्यास केला. या वायूंच्या वर्णपटांची तुलना त्याने अरगॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन या मूलद्रव्यांच्या वर्णपटांशी केली. या तुलनेवरून रॅम्झी याने असं सुचवलं की, रेडिअम, थोरॉन, अ‍ॅक्टिनिअमच्या संयुगांमधून बाहेर पडणारे किरणोत्सारी वायू हे वेगवेगळे नसून एकच असला पाहिजे. एवढंच नव्हे तर रॅम्झी याने वर्णपटाच्या अभ्यासावरून हेसुद्धा सुचवलं की, हा किरणोत्सारी वायू म्हणजे अरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉनसारखं एक निष्क्रिय मूलद्रव्य असलं पाहिजे.

पुढे १९०८ साली रॉबर्ट व्हिटलॉ ग्रे व विल्यम रॅम्झी यांनी पुरेशा प्रमाणात रेडॉन वायू जमा करून त्याच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास केला. १९१० साली त्यांनी रेडॉनची घनता मोजली आणि हा सर्वात जड वायू असल्याचं दाखवून दिलं. त्यांनी या वायूला ‘निटॉन’ हे नाव दिलं. १९२३ साली इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड केमिस्ट्री (आययूपीएसी ) या आंतरराष्ट्रीय संस्थेने ‘रेडॉन’ या नवीन निष्क्रिय वायूला मान्यता दिली.

रेडॉन हा कोणताही वास नसणारा, चव नसलेला, रंगहीन वायू आहे. रेडॉन पाण्यामध्ये विरघळतो. पण, पाण्यापेक्षा हा वायू कार्बनी द्रवकांमध्ये अधिक प्रमाणात विरघळतो. इतर निष्क्रिय वायूंच्या तुलनेत सहजपणे द्रवरूप आणि संघनित होणारा हा वायू आहे.

रेडॉन हा खरोखरच निष्क्रिय वायू आहे का, याचा शोध घेताना १९६२ साली असं आढळलं की, रेडॉन-२२२ हे रेडॉनचं समस्थानिक आणि फ्लोरिन वायू यांचं मिश्रण सुमारे ४०० अंश सेल्सियसला तापवलं की रेडॉन डायफ्ल्युओराइड हे संयुग तयार होतं. रेडॉन ट्रायऑक्साइड या रेडॉनच्या ऑक्सिजनबरोबर असणाऱ्या संयुगाचं अस्तित्वसुद्धा शास्त्रज्ञांना मिळालं आहे. रेडॉनची क्लोरीनबरोबर संयुगं तयार होत असावीत, असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे. अर्थातच, याविषयी संशोधन सुरू आहे. पण या संयुगांचं अस्तित्व सापडलं तर रेडॉनला आवर्तसारणीमध्ये निष्क्रिय वायूंच्या पंक्तीत बसवलं जाईल का नाही, हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 1:58 am

Web Title: radon chemical element 2
Next Stories
1 चार्ल्स विल्किन्स (१)
2 शेवटचं निष्क्रिय मूलद्रव्य
3 जे आले ते रमले.. : एडवर्ड बेलफोर यांचे कार्य (२)
Just Now!
X