रतलाम राज्याचा संस्थापक राजा रतनसिंह याची कारकीर्द इ.स. १६५२ ते १६५८ अशी झाली. शाहजहानचा मुलगा शाहजादा दारा शिकोव्ह आणि औरंगजेब यांच्यात वारसा हक्कावरून झालेल्या युद्धात रतनसिंहाचा मृत्यू झाला. त्याच्या १२ राण्यांपकी ७ राण्या सती गेल्या. रतनसिंहच्या मृत्यूनंतर वाताहत झालेल्या रतलाम राज्यावर इ.स. १६५८ ते १६९५ या काळात रामसिंह, शिवसिंह, केशवदास यांची कारकीर्द झाली. परंतु ही कारकीर्द केवळ जुजबी होती. त्याचे कारण म्हणजे राज्याचा बहुतेक प्रदेश औरंगजेबाने मोगल राज्यात जोडला होता.
पुढे १६९५ मध्ये राजपदावर आलेल्या छत्रसालने मात्र मोगलांशी संबंध जोडून आपले गेलेले राज्य प्रयत्नपूर्वक पूर्ववत उभे केले. १८ व्या शतकाच्या मध्यावर रतलाम शासकांनी ग्वाल्हेरच्या िशदेंचे मांडलिकत्व मान्य करून त्यांना १५% महसूल खंडणी म्हणून दिला.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात राजा साजेतसिंहाच्या मराठय़ांबरोबर झालेल्या युद्धात विजय मिळविल्यावर खंडणी देणे बंद झाले. परंतु १८१९ साली राजा परबतसिंग याने कंपनी सरकारबरोबर संरक्षण करार केल्याने, इ.स.१८१९ ते १९४८ या काळात रतलाम हे १३ तोफ सलामींचा मान असलेले ब्रिटिश संरक्षित संस्थान बनून राहिले.
१८२९ साली कॅप्टन बोर्थवीक याने रतलाम शहरात रस्ते आणि इमारती बांधून सुशोभित केले. रतलाम राज्यात भरपूर पिकणाऱ्या तंबाखू आणि अफूच्या पिकांची शास्त्रोक्त लागवड आणि मिठाचे उत्पादन बोर्थवीकने सुरू करून मध्य भारतातील या वस्तूंची सर्वात मोठी बाजारपेठ निर्माण केली. या व्यापारावर रतलाम हे एक संपन्न संस्थान बनण्यात बोर्थवीकचा महत्त्वाचा वाटा आहे. फेब्रुवारी १९४७ मध्ये राजे साजनसिंह यांचे निधन झाले आणि त्या पाठोपाठ लोकेंद्रसिंह यांचे राज्यारोहण झाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी लोकेंद्रसिंहांनी रतलाम राज्य स्वतंत्र भारतात विलीन करण्याचे जाहीर केल्यामुळे त्यांची कारकीर्द अवघी सहा महिन्यांची ठरली!
sunitpotnis@rediffmail.com