रामपूर संस्थानाचा पहिला नवाब फैजुलखान याची कारकीर्द २० वर्षांची झाली. विद्वान, पंडितांचा आश्रयदाता फैजुलखान स्वत: अरेबिक, पíशयन, टर्की आणि उर्दू भाषांचा जाणकार होता. या भाषांमधील दुर्मीळ हस्तलिखितांचा संग्रह करण्याचा त्याचा छंद होता. त्याच्या पुढच्या नवाबांनीही हा छंद जोपासला. नवाब मोहम्मद सईद खान (१८४०-१८५५) याने या सर्व हस्तलिखितांची नीट जोपासना करण्यासाठी त्या त्या भाषांचे विद्वान नेमून ‘रामपूर रझा किताबखाना’ या ग्रंथालयाची स्थापना केली. नवाब अहमद अलीखान आणि नवाब युसूफ अलीखान हे तर स्वत: उत्तम उर्दू कवी, चित्रकार आणि संगीतकार होते. ते प्रख्यात कवी मिर्जा गमलिबम् याच्या मार्गदर्शनाखाली काव्य तयार करीत. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतर ठिकठिकाणच्या कवी, लेखक, संगीतकारांनी रामपूरमध्ये आश्रय घेतला. नवाब युसूफ अलीखानच्या काळात तर संस्कृत, िहदी, दाक्षिणात्य भाषा यांची हस्तलिखिते आणि पुस्तकांचाही संग्रह वाढला. नवाब काल्ब अलीखानाने तज्ज्ञ चित्रकार, संगीतकारांना नेमून त्यांच्या देखरेखीखाली दुर्मीळ चित्रे, शिल्पे, संगीताची वाद्य्ो यांचाही संग्रह करून निराळे दालन सुरू केले. हजची यात्रा करून सातव्या शतकातील कुराणाची हस्तलिखित प्रत त्याने रझा ग्रंथालयात ठेवली. १९०४ साली नवाब हमीद अलीखान याने ‘हमीद मंजील’ ही भव्य इमारत बांधून तेथे हे ग्रंथालय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सुरू केले. १९७५ साली भारत सरकारने प्रो. नुरूल हसन यांच्या देखरेखीखाली सांस्कृतिक विभागाकडे रझा ग्रंथालयाचे व्यवस्थापन सोपविले. सध्या या ग्रंथालयात २४ हजार हस्तलिखिते, ३० हजारांहून अधिक पुरातन दुर्मीळ ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तावेज आणि अगणित कलावस्तू जतन केलेल्या आहेत. रझा ग्रंथालय हे जगातील दुर्मीळ साहित्याचा संग्रह असलेल्या ग्रंथालयांमध्ये गणले जाते.

 सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

रंगाईच्या पद्धती

रंगाईच्या अनेक पद्धती वापरतात, त्यापकी एक पद्धत म्हणजे पॅड पद्धत. त्यामध्ये कोरडय़ा पद्धतीचा आणि पाण्याच्या वाफेचा वापर केला जातो. ही अखंडपणे केली जाणारी रंगाई आहे. ब्लीचिंग आणि मर्सराइिझग केलेला कपडा एका बाजूने रंगाईयंत्रात पाठवला जातो आणि दुसऱ्या बाजूने रंगवलेला कपडा मिळतो. हा कपडा पुढल्या फिनििशगसाठी एकदम तयार असतो. कापडाचे मोठय़ा प्रमाणातील उत्पादन, एका रंगाची मोठी बॅच यासाठी उपयुक्तता आणि खर्च वाचवणारी अशी ही पद्धत आहे. या पद्धतीने रंगवलेले कापड एकसारखे रंगवलेले मिळते. याचा उत्पादनाचा वेगही उत्तम असतो. याचबरोबर पाण्याची बचत होऊन मनुष्यबळही कमी लागते. पाण्याचा कमी वापर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. वेळ, रंग, पाणी आणि मनुष्यबळ या सर्वाची बचत होते. त्याचा परिणाम म्हणून प्रतिमीटर रंगाईचा खर्च कमी होतो. याचबरोबर या पद्धतीच्या काही मर्यादा आहेत, त्यात काही दोषही आहेत. लहान बॅच (कमी कापड) रंगवायचे असल्यास ही पद्धत वापरता येत नाही. याचे कारण जो खर्च होतो तो छोटय़ा बॅचकरिता परवडू शकत नाही. या मशीनकरिता लागणारी गुंतवणूक मोठी आहे. याचबरोबर या पद्धतीच्या रंगाईचे निकषही खूप कडक आहेत ते सांभाळावे लागतात. या पद्धतीने रंगाई करताना कापड प्रथम रंग आणि जलशोषक घटकाच्या द्रावणातून पाठवले जाते आणि मग ते सुकवले जाते. मग ते रंग पक्का बसावा अशा रसायनांच्या द्रावणातून पाठवून मग वाफेने गरम केले जाते. हा रंगवलेला कपडा धुऊन, उदासीन करून वाळवून त्याच मशीनमधून बाहेर पडतो.
यापेक्षाही प्रगत अशी रंगाईची पद्धत पॅड स्टीम किंवा इलेक्ट्रॉनिक नियंत्रित रंगाई म्हणून ओळखली जाते. ही अतिशय प्रगत अशी सलग रंगाई करण्याची पद्धत आहे. या पद्धतीत रंगाई आणि त्याच्या पक्केपणासाठी प्रक्रिया एकाच वेळी केली जाते. त्यानंतर वाफेचा वापर केला जातो. त्या वेळी रंगाई पूर्ण आणि पक्की होते. या पद्धतीत तापमान, आद्र्रता वगरे सगळे घटक अतिशय काटेकोरपणे सांभाळावे लागतात. याच दृष्टीने या मशीनची रचना केलेली असते. यामध्ये रंगाई खूप कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने पार पडते. लहान बॅचसाठी ही पद्धत वापरता येतेच, शिवाय खर्चही मर्यादित राहतो.

सतीश दिंडे (इचलकरंजी)

मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org