13 December 2019

News Flash

कुतूहल : रेणूंची प्रतिबिंबे

सन १८१९ सालाच्या सुमारास फ्रान्सच्या पॉल केस्टनरने या दुसऱ्या क्षारापासून रेसेमिक आम्ल तयार केले.

( संग्रहित छायाचित्र )

द्राक्षांचा रस आंबवण्यासाठी पिंपात ठेवल्यावर त्याच्या तळाला गाळ जमा होतो. या गाळात मोठय़ा प्रमाणात टार्टारिक आम्लाचा क्षार आढळतो. १७६९ साली स्वीडिश संशोधक कार्ल शील याने या क्षारापासून टार्टारिक आम्ल तयार केले. याच पिंपात रेसेमिक आम्ल या दुसऱ्या एका आम्लाचा क्षारही जमा झालेला आढळतो. सन १८१९ सालाच्या सुमारास फ्रान्सच्या पॉल केस्टनरने या दुसऱ्या क्षारापासून रेसेमिक आम्ल तयार केले. त्यानंतर १८२८ साली या दोन्ही आम्लांची रासायनिक घडण सारखीच असल्याचे गे-लुझाक या फ्रेंच रसायनतज्ज्ञाने दाखवून दिले. त्यामुळे ही दोन्ही आम्ले एकच असल्याचे मानले गेले. सन १८१०च्या सुमारास पदार्थाचा एक वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म शोधला गेला. प्रकाश हा विद्युतचुंबकीय लहरींच्या स्वरूपात असल्याने विद्युतचुंबकीय क्षेत्रांची ठरावीक प्रतलांत आंदोलने चालू असतात. प्रकाश काही पदार्थातून पार होताना, या आंदोलनांच्या प्रतलाची दिशा बदलते. जियाँ बायो या फ्रेंच संशोधकाने १८३२ साली केलेल्या प्रयोगांत, त्याला टार्टारिक आम्लाचे द्रावण या आंदोलनांचे प्रतल उजव्या बाजूस फिरवत असल्याचे आढळले, तर रेसेमिक आम्लाच्या बाबतीत असा कोणताही बदल आढळला नाही.

फ्रेंच संशोधक लुई पाश्चर याने १८४७ साली याचा छडा लावण्याचे ठरवले. त्याने रेसेमिक आम्लाचे सोडियम अमोनियम क्षार तयार करून त्याचे स्फटिक तयार केले. या स्फटिकांचे त्याने सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले. या एकाच प्रकारच्या क्षारातील काही स्फटिकांची रचना, एकमेकांच्या तुलनेत उलटी असल्याचे त्याला दिसले.. म्हणजे आरशातील प्रतिबिंबांसारखी! त्यानंतर पाश्चरने हे दोन्ही प्रकारचे स्फटिक चिमटय़ाने वेगळे करून त्यांचे प्रकाशीय गुणधर्म तपासले. या दोन्ही क्षारांच्या द्रावणांनी प्रकाशलहरींच्या आंदोलनांचे प्रतल एकमेकांच्या तुलनेत वेगवेगळ्या दिशेने फिरवले होते. मात्र जेव्हा या दोन्ही प्रकारचे क्षार सारख्याच प्रमाणात एकत्र केले, तेव्हा त्यांच्या द्रावणामुळे मात्र या प्रतलाच्या दिशेत कोणताही बदल झालेला आढळला नाही. या शोधामुळे रसायनाचे रेणू हे त्रिमितीयदृष्टय़ा दोन प्रकारचे असू शकतात हे दिसून आले. कालांतराने इतर अनेक कार्बनी संयुगांमध्ये हा गुणधर्म असल्याचे आढळले. अनेक रसायनांच्या संश्लेषणाच्या दृष्टीने रेणूंची ही ‘प्रतिबिंबे’ आणि त्यांचे परिणाम महत्त्वाचे ठरून त्रिमिती रसायनशास्त्राची एक वेगळी शाखा उदयाला आली.

डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

First Published on August 6, 2019 12:09 am

Web Title: reflection of molecules abn 97
Just Now!
X