प्रादेशिकता आणि त्यावरून होणारे वाद, भांडणे, युक्तिवाद आणि प्रसंगी युद्धदेखील मनुष्यप्राण्याला नवीन नाहीत. उत्क्रांतीच्या वेगळ्या पातळीवर असलेल्या विविध प्राण्यांमध्येसुद्धा अशीच प्रादेशिकता दिसते, परंतु त्याचे पर्यवसान ‘प्राणघातक’ अथवा ‘पर्यावरणघातक’ क्वचितच असते. प्राण्यांतील प्रादेशिकता ही मुख्यत: अन्न, निवारा आणि जोडीदार यांसाठी असते. एखादी जागा योग्य आणि उपयुक्त ठरल्यानेच ती जागा राखण्यासाठी आणि ते इतर प्राण्यांना स्पष्टपणे सांगण्यासाठी, घुसखोरांना थांबविण्यासाठी उत्क्रांतीच्या ओघात प्राण्यांच्या वर्तणुकीत अनेक प्रकारचे बदल घडून आले आहेत. प्राण्यांचा ‘प्रदेश’ हे एक सामाजिक, भौगोलिक क्षेत्र असते. अशा क्षेत्राचे प्राणी नेहमीच रक्षण करतात. प्राण्यांचे कार्यक्षेत्र अथवा त्यांच्या आवासक्षेत्राचा पल्ला (होम रेंज) आणि प्रादेशिकता या दोन भिन्न गोष्टी आहेत. परंतु यामुळेच प्राणी भांडण, हल्ला करण्याऐवजी एकमेकांना टाळू शकतात. प्राणीजगतात प्रादेशिकता सस्तन प्राण्यांत, कीटकांमध्ये, माश्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये खूप व्यापक स्वरूपात दिसून येते. कायमस्वरूपी, जोडी जमविण्यासाठीची, विणीच्या हंगामातील, घरटय़ासाठी, सहनिवासासाठी किंवा अन्नस्थळासाठी अशा विविध कारणांसाठी प्राणी प्रादेशिकतेची वर्तणूक दाखवतात.

कोणत्याही कारणाने आपला प्रदेश राखण्यासाठी प्राणी मुख्यत: तीन टप्प्यांमध्ये प्रयत्न करतात : (१) ‘जाहिराती’साठी सीमेवर चिन्ह, खूण अथवा ‘चौकी’ची व्यवस्था. (२) रागाचे प्रदर्शन आणि (३) प्रत्यक्ष भांडण किंवा हल्ला. प्रत्येक प्राण्याचा प्रादेशिकतेचा पल्ला वेगळा असतो. प्राण्यांचे आपला प्रदेश राखण्यासाठीचे प्रयत्न खूप वेगळे आणि रंजक असतात. प्रादेशिकपणा दाखविणारे वर्तन अनेक प्रकारे प्राण्यांना अनुकूल असते, कारण त्यामुळे गर्दी, स्पर्धा आणि हल्ला या गोष्टी टाळता येतात.

प्रदेशाच्या सीमेवर इशारा देण्यासाठी आणि जाहिरातीसाठी प्राण्यांनी केलेली चिन्हे अथवा खुणा विविध प्रकारच्या असतात. त्या डोळ्यांना सहज दिसतील, ऐकू येतील किंवा गंधाने जाणवतील अशा असतात. अनेक सस्तन प्राणी शरीर झाडाला घासणे, झाडांच्या बुंध्यावर नख्यांनी ओरखडे काढणे, झाडांवर मूत्राचा फवारा सोडणे, वगैरे गोष्टींतून स्वत:चा प्रदेश चिन्हांकित करतात. तर पक्षी, बेडूक, कुत्री, लांडगे लांब अंतरापर्यंत जाणारे छोटे-छोटे आवाज काढून इतरांना त्यांच्या प्रदेशाची जाणीव करून देतात. गेंडे त्यांच्या विष्ठेचा एक ढीग करून त्यांच्या सीमारेषेची सूचना देतात आणि तरसासारखे प्राणी मोक्याच्या ठिकाणी गवताच्या पात्यांना विष्ठा फासतात. नाचण, दयाळ यांसारखे पक्षी त्यांच्या विशिष्ट हालचालींद्वारे, शेपटी हलवीत त्यांच्या प्रदेशाची ‘जाहिरात’ करतात.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org