मध्य अमेरिकेत, पॅसिफिक व अ‍ॅटलांटिक महासागरांना जोडणारा ‘पनामा कालवा’ अनेकांना माहीत असतो, पण उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला आपल्या चिंचोळ्या भूमीने सांधणारा पनामा या नावाचा देश अस्तित्वात आहे हे  काहींना माहीतही नसावे. या लेखमालेच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे विसाव्या शतकात जगभर मोठी राजकीय उलथापालथ होऊन नवीन सार्वभौम देश अस्तित्वात आले. अशा नवदेशांपैकी प्रजासत्ताक पनामा हा पहिला देश. ३ नोव्हेंबर १९०३ रोजी हा स्वायत्त देश अस्तित्वात आला.

पनामाच्या उत्तरेला कॅरिबियन समुद्र, दक्षिणेला पॅसिफिक महासागर, कोस्टा रिका हा देश पश्चिमेला आणि कोलंबिया हा देश अग्नेयेला अशा याच्या चतु:सीमा आहेत. विषुववृत्ताच्या उष्ण कटिबंधात असलेल्या पनामाचा चाळीस टक्के प्रदेश घनदाट जंगलांनी वेढलेला असल्यामुळे तेथे वनस्पती आणि इतर जीव वैविध्यही भरपूर आहे. पनामा या नावाच्या छोटय़ा खेडय़ावरून हे नाव घेण्यात आले असे म्हटले जाते. स्थानिक भाषेत पनामा म्हणजे भरपूर मासे आणि भरपूर फुलपाखरे!

रॉड्रिगो बॅस्तिदा हा स्पॅनिश खलाशी १५०१ मध्ये सोन्याच्या शोधात या उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या संयोगभूमित आला. सध्याच्या पनामात प्रवेश केलेला हा पहिला युरोपियन. वर्षभराने ख्रिस्तोफर कोलंबस इथे येऊन काही दिवस राहिला. या प्रदेशात त्याने छोटीशी स्पॅनिश वसाहत स्थापन केली. वास्को बल्बोआ या साहसी वसाहतवादय़ाने १५१३ मध्ये  अ‍ॅटलांटिकच्या किनारपट्टीवरून सुरू करून पनामाचा चिंचोळा प्रदेश पार केला आणि पॅसिफिक सागराच्या किनाऱ्यावर पोहोचला. अ‍ॅटलांटिक व पॅसिफिक महासागरांमधील पनामाचा हा जमिनीचा चिंचोळा पट्टा व्यापारासाठी मोठे वरदान आहे हे बल्बोआच्या संशोधनामुळे स्पॅनिश लोकांना कळले आणि या प्रदेशाचे महत्त्व वाढले. पेरू, चिली, अर्जेटिना या दक्षिण अमेरिकेतील देशांमधून मिळालेले सोने, चांदी पनामाच्या या चिंचोळ्या संयोगभूमीत आणून तिथल्या स्पॅनिश व्यापारी ठाण्यावर जमा केले जाई आणि तेथून जहाजे भरून अ‍ॅटलांटिकमार्गे स्पेनकडे रवाना होई. स्पॅनिश साम्राज्यात त्यामुळे पनामाचे महत्त्व वाढतच गेले. या व्यापारी वाहतुकीचा मार्ग ‘कॅमिनो रिआल’ उर्फ ‘रॉयल रोड’ या नावाने ओळखला जात असे.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com